मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही आपली वेगळी छाप पाडणार्या क्रांती रेडकर-वानखेडे यांनी ‘मैत्रेया’च्या माध्यमातून तरुणाईच्या भावविश्वाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘काकण’सारख्या भावनिक चित्रपटानंतर त्यांनी यावेळी वेगळ्या धाटणीचा, संगीत, नृत्य, प्रेम आणि मैत्रीने सजलेला विषय निवडला आहे. ‘मैत्रेया’ हा केवळ प्रेमकथेवर आधारित चित्रपट नसून, मैत्रीच्या नात्यात निर्माण होणार्या बदलांचा, अपेक्षांचा, गैरसमजांचा आणि भावनिक गुंतागुंतीचा वेध घेणारा चित्रपट आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीला एक वेगळे स्थान असते. काही मैत्री बालपणापासून जपलेली असते, तर काही मैत्री काळाच्या ओघात अधिक घट्ट होत जाते. मात्र, जेव्हा या मैत्रीमध्ये प्रेमाची भावना प्रवेश करते, तेव्हा नात्यांची समीकरणे बदलू लागतात. एकमेकांना समजून घेणारे मित्र अचानक एकमेकांच्या भावनांबाबत अनभिज्ञ होतात. मनातल्या गोष्टी बोलून दाखवायच्या की, मैत्री टिकवण्यासाठी त्या मनातच ठेवायच्या, असा प्रश्न निर्माण होतो. याच भावनिक वळणावर ‘मैत्रेया’ची कथा आकार घेते.
चित्रपटाचा विषय आजच्या तरुणाईला जवळचा वाटणारा. सोशल मीडिया, सततचा संपर्क आणि बदलती जीवनशैली, यामुळे नाती जोडणे सोपे झाले असले; तरी ती टिकवणे तितकेच कठीण झाले आहे. अशा काळात मैत्रीमधील विश्वास आणि संवाद किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव हा विषय करून देतो.
चित्रपटात चार प्रमुख व्यक्तिरेखांच्या माध्यमातून मैत्री, प्रेम आणि नात्यांमधील स्थित्यंतरे दाखवण्यात आले आहेत. मैत्रीच्या प्रवासात नव्याने निर्माण होणार्या नात्यांमुळे होणारी भावनिक उलथापालथ हा कथेचा महत्त्वाचा भाग. कोणाची भावना खरी, कोणाचा गैरसमज आणि कोणाची चूक, या प्रश्नांमधून कथा पुढे सरकते. निर्वाण (समर), जय (स्काय), अरजोई (सुरभी), साजिरी (ऋची) या चौघांभोवती चित्रपटाचे कथानक फिरते. या चित्रपटाच्या निमित्ताने चार चांगले आश्वासक चेहरे चित्रपटाला मिळाले आहेत, हेही इथे आवर्जून नमूद करायलाच हवे.
क्रांती रेडकर यांनी दिग्दर्शिका म्हणून केवळ कथा सांगण्यापेक्षा त्या कथेचे स्वतंत्र मनोरंजनविश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात आधुनिक जीवनशैली आणि मध्यमवर्गीय भावविश्व यांचा मेळ दिसून येतो. या चित्रपटात नव्या कलाकारांना संधी देण्याचा निर्णयही लक्षवेधीच.
दिग्दर्शनामध्ये विषयाची निवड जितकी महत्त्वाची असते, तितकीच महत्त्वाची असते त्याची मांडणी. तरुणाईची भाषा, त्यांची देहबोली, त्यांच्या भावनिक प्रतिक्रिया आणि नात्यांमधील सहजता पडद्यावर उतरवताना कृत्रिमता येऊ न देणे आवश्यक असते. ‘मैत्रेया’चा विषय याच कसोटीवर पास झालाय.
आयुषी भावेसाठी हा सिनेमा महत्त्वाचा. ती सुंदर दिसली आहे, तिच्यातील आत्मविश्वासही उत्तम जाणवतो. प्रेम आणि मैत्री यांच्यामधील भावनिक द्वंद्व व्यक्त करताना चेहर्यावरील हावभाव, संवादफेक आणि प्रसंगानुरूप बदलणार्या भावना अशा विविध छटा तिने उत्तम पद्धतीने रंगवल्या आहेत. रुचीचा हा पहिलाच चित्रपट असून, तिचा पडद्यावरील वावरपण आश्वासक असाच. समर खळतकरसाठी ‘मैत्रेया’ हा चित्रपट महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. त्याने उत्तम काम केलेय, त्याचा लूक चांगला आहे; पण ‘इमोशनल सीन्स’मध्ये तो थोडा कमी पडला. हीच गोष्ट ‘स्काय’च्या बाबतीतही लागू पडते. दोघांचे ‘लुस’ चांगले आहेत, अजून मेहनत घेतली, तर ‘लंबी रेस के घोडे’ बनू शकतात. बाकी इतरही दिग्गज कलाकार चित्रपटात आहेत. त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे.
‘मैत्रेया’मध्येही संगीत आणि नृत्याला महत्त्व दिलेले जाणवते. पंकज पडघन यांचे संगीत उत्तम जमून आले आहे. चित्रपटातील एकूणच गाणी चांगली झाली आहेत. विशेषतः ‘निघाली राधा सोडुनी गोकुळा’ या गरबा गीतातून पारंपरिक संगीत आणि आधुनिक नृत्यशैलीचा संगम पाहायला मिळतो. आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांच्या आवाजातील हे गाणे, तसेच चित्रपटाचे शीर्षकगीत तरुणाईच्या उत्साहाला साद घालणारे आहे. देवेंद्र गोलटकरची ‘सिनेमॅटोग्राफी’ उत्तम. सिनेमा ‘कलरफुल’ झाला आहे. फक्त सिनेमाची लांबी थोडी खटकते. ‘एडिट टेबल’वर सिनेमाच्या लांबीला थोडी कात्री लावली असती, तर हा चित्रपट आणखीन प्रभावशाली झाला असता.
‘मैत्रेया’ हा मैत्री आणि प्रेम या दोन सुंदर भावनांच्या माध्यमातून तरुणाईशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणारा चित्रपट आहे. क्रांती रेडकर यांनी दिग्दर्शनाच्या माध्यमातून नव्या कलाकारांना एकत्र आणून वेगळा प्रयोग केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीला नवे चेहरे मिळणे आणि त्यांना मोठ्या पडद्यावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे.
आजच्या काळात मैत्रीची व्याख्या बदलत असली, तरी मैत्रीमधील विश्वास, जिव्हाळा आणि एकमेकांसाठी असलेली ओढ या भावना कायम आहेत. त्यामुळे ‘मैत्रेया’चा विषय प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आहे. एकूणच काय, तर मैत्री टिकवायची की प्रेमाला स्वीकारायचे, या प्रश्नाचे उत्तर शोधणारा ‘मैत्रेया’ तरुणाईला नक्कीच विचार करायला लावणारा आहे.
निर्माते : मनोज खळतकर
सहनिर्माते : अमन खळतकर
लेखन आणि दिग्दर्शन : क्रांती रेडकर-वानखेडे
कलाकार : समर खळतकर, आयुषी भावे, स्काय, रुची जाईल
अवधी : २ तास ४० मिनिटे
-कपिल देशपांडे