पहाटेच्या मासळी लिलावापासून ग्राहकांच्या ताटापर्यंत... महाराष्ट्राच्या मत्स्य अर्थव्यवस्थेला बळ देणार्या कोळी महिलांचा संघर्ष, कर्तृत्व आणि खाद्यसंस्कृतीचा प्रवास...
घड्याळात पहाटेच्या ४ चा ठोका... मुंबईच्या किनारपट्टीवर अजूनही अंधाराचे साम्राज्य असते. शहरातील बहुतांश लोक गाढ झोपलेले, तर काही आपली रात्रपाळी संपवून घराकडे निघालेले. अशावेळी कोळीवाड्यांमधील महिलांच्या दिवसाची मात्र सुरुवात झालेली असते. घरातील चूल, मुलांचे डबे, कुटुंबातील सदस्यांची काळजी आणि त्यानंतर मासळी बाजाराकडे धाव... हे त्यांचे रोजचे वेळापत्रक! पारंपरिक वेशभूषा, हातात टोपली आणि मनात आजच्या विक्रीचे गणित घेऊन भल्या पहाटे त्या घराबाहेर पडतात. अशा प्रकारे त्यांच्या दिवसाची सुरुवात सूर्य उगवण्यापूर्वीच झालेली असते.
समुद्राशी पिढ्यान्पिढ्या जोडलेले नाते, मासळीचा व्यवसाय, बाजारातील व्यवहारकुशलता आणि घराचा संसार सांभाळण्याची जबाबदारी अशा अनेक भूमिका एकाच वेळी पार पाडणार्या या कोळी महिला म्हणजे महाराष्ट्राच्या मत्स्य अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहेत. समुद्रात जाऊन मासे पकडणार्या मच्छीमारांच्या श्रमांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम त्या करतात. मासळीची खरेदी, प्रतवारी, स्वच्छता, वाहतूक, विक्री आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेत त्यांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे मासळीच्या प्रत्येक व्यवहारामागे केवळ समुद्रातील कष्ट नसतात, तर बाजारपेठेत घाम गाळणार्या महिलांचेही योगदान असते.
पहाटेच्या अंधारात सुरू होणारे अर्थकारण!
पहाटे मासळी उतरवण्याच्या ठिकाणी किंवा घाऊक बाजारात महिलांची लगबग सुरू होते. समुद्रातून परतलेल्या बोटी किनार्यावर लागतात. मासळी उतरवली जाते आणि त्यानंतर तिची प्रतवारी, वर्गीकरण आणि विक्रीसाठी तयारी सुरू होते. पापलेट, सुरमई, रावस, बांगडा, कोळंबी, मांदेली, बोंबील, तारली अशा विविध प्रकारच्या मासळींची उपलब्धता, आकार, ताजेपणा आणि बाजारातील मागणी यांचा अंदाज घेत महिलांची खरेदी सुरू होते.
कोणत्या माशाला आज चांगला भाव मिळेल? कोणत्या प्रकाराला ग्राहकांची मागणी असेल? किती मासळी खरेदी करावी? किती भांडवल गुंतवावे? दिवसभरात किती विक्री होऊ शकेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना अनुभवातून मिळालेली असतात. मासळी खरेदी करताना होणारी घासाघीस ही केवळ भाव कमी करण्यापुरती नसते, तर त्यामागे दिवसभराच्या नफ्याचे गणित असते.
काही महिला स्वतःच्या कुटुंबाच्या बोटीतून आलेली मासळी विकतात, तर अनेक महिला घाऊक बाजारातून मासळी खरेदी करून किरकोळ बाजारात विक्री करतात. त्यासाठी पहाटेच भांडवलाची जुळवाजुळव करावी लागते. काही वेळा उधारीवर मासळी खरेदी केली जाते. मासळी नाशवंत असल्याने तिची वेळेत विक्री होणे आवश्यक असते. त्यामुळे खरेदीपासून वाहतुकीपर्यंत प्रत्येक मिनिट महत्त्वाचे ठरते.
मासळी खरेदी केल्यानंतर तिची स्वच्छता, बर्फाची व्यवस्था, वर्गीकरण आणि वाहतूक या कामांनाही वेळ द्यावा लागतो. काही महिला डोयावर टोपली घेऊन, तर काही रिक्षा किंवा इतर वाहनांच्या माध्यमातून बाजारपेठेत पोहोचतात. ग्राहक येण्यापूर्वी मासळीची मांडणी करून त्या विक्रीसाठी सज्ज होतात.
खार्या समुद्रासोबत गोड्या पाण्यातील मासळीचाही बाजार!
महाराष्ट्रातील मासळीची बाजारपेठ केवळ समुद्रातील मासळीपुरती मर्यादित नाही. राज्यातील नद्या, तलाव, धरणे, जलाशय आणि मत्स्यपालन केंद्रांमधून मिळणार्या गोड्या पाण्यातील मासळीलाही मोठी मागणी आहे. रोहू, कटला, मृगळ, तिलापिया, पंगास आणि सिंगाडा अशा विविध प्रकारच्या मासळींची विक्री बाजारपेठेत केली जाते.
विशेषतः कोकणाबाहेरील ग्रामीण भागात, तसेच नागपूर, पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक बाजारपेठांमध्ये गोड्या पाण्यातील मासळीला ग्राहकांची पसंती मिळते. समुद्रातील मासळीप्रमाणेच गोड्या पाण्यातील मासळीच्या खरेदी-विक्रीतही महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
बाजारपेठेतील कोळी महिलेचा आत्मविश्वास!
सकाळचे ७-८ वाजले की मासळी बाजाराचे चित्र पूर्णपणे बदलते. ग्राहकांची गर्दी वाढू लागते. कुठे मासळीच्या टोपल्या, कुठे बर्फाचे ढीग, कुठे पाण्याने ओले झालेले बाजाराचे आवार, तर कुठे ग्राहकांना आकर्षित करणारे आवाज... या गजबजाटात प्रत्येक महिला आपापल्या जागेवर ठामपणे उभी असते. ’ताई, पापलेट कितीला?’, ’सुरमई ताजी आहे का?’, ’थोडे कमी करा ना!’, ’कोळंबी अर्धा किलो द्या!’ अशा संवादांनी बाजार जिवंत होतो. ग्राहकांशी भाव ठरवताना महिलांची व्यवहारकुशलता आणि आत्मविश्वास सहज लक्षात येतो. कोणत्या ग्राहकाला कोणती मासळी आवडते, कोणाला किती प्रमाणात मासळी हवी आणि कोणत्या भावात व्यवहार होऊ शकतो, याचा अंदाज त्या काही क्षणांत घेतात.
मासळी विक्री हा केवळ आर्थिक व्यवहार नसून ग्राहकांशी निर्माण झालेले नातेही आहे. अनेक ग्राहक वर्षानुवर्षे ठरावीक महिलांकडूनच मासळी खरेदी करतात. त्यामुळे बाजारात विक्रीबरोबरच एक वेगळे सामाजिक नाते तयार झालेले असते. हातातील सुरीचा सफाईदार वापर, काट्यावर अचूक वजन आणि सतत सुरू असलेली घासाघीस या सगळ्यांतून त्यांच्या कामातील कौशल्य दिसते.
मात्र, या मेहनतीमागे अनिश्चितताही असते. मासळीचे भाव दररोज बदलतात. समुद्रातील हवामान, मासेमारीबंदीचा कालावधी, मासळीची उपलब्धता, वाहतूक खर्च, बर्फाचा खर्च आणि बाजारातील मागणी या सगळ्यांचा परिणाम विक्रीवर होतो. कधी चांगली कमाई होते, तर कधी दिवसभर बसूनही अपेक्षित नफा मिळत नाही. तरीही, दुसर्या दिवशी नव्या आशेने बाजारात हजर राहणे, हा त्यांच्या जगण्याचा भाग बनलेला असतो.
महाराष्ट्राच्या ताटात मासळीची खाद्यसंस्कृती!
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती सांगताना मासळीला वेगळे स्थान आहे. प्रत्येक भागाची मासळी बनवण्याची पद्धत, मसाल्यांचे प्रमाण आणि चवीची ओळख वेगळी आहे. कोकणात नारळ, कोकम, चिंच आणि स्थानिक मसाल्यांचा वापर करून बनवली जाणारी मासळीची आमटी, तळलेली सुरमई, पापलेट फ्राय, कोळंबीची भाजी, बोंबील फ्राय आणि सुया मासळीचे पदार्थ घराघरांत लोकप्रिय आहेत. दुसरीकडे, समुद्रकिनार्यापासून दूर असलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात नद्या, तलाव व धरणांमधील गोड्या पाण्यातील मासळीला मोठी मागणी आहे. रोहू, कटला, मृगळ, तिलापिया आणि पंगास यांसारख्या माशांपासून झणझणीत रस्सा, तळलेली मासळी आणि स्थानिक मसाल्यांतील कालवणे तयार केली जातात.
महाराष्ट्राची सागरी अर्थव्यवस्था : हजारो कुटुंबांचा आधार!
महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ नुसार, २०२३-२४ मध्ये राज्याचे एकूण मत्स्य उत्पादन सुमारे ७ लाख मेट्रिक टन होते. त्यात सागरी मत्स्य उत्पादन ४.३५ लाख मेट्रिक टन, तर अंतर्गत जलक्षेत्रातील उत्पादन २.६५ लाख मेट्रिक टन होते.
महाराष्ट्रातून सागरी उत्पादनांची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होते. २०२४-२५ मध्ये राज्यातून सुमारे २ लाख २७ हजार ८६६ टन सागरी उत्पादनांची निर्यात झाली. त्याचे मूल्य सुमारे ७ हजार ३४३ कोटी रुपये होते. कोळंबी, मासळी आणि इतर सागरी उत्पादनांना देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. या आर्थिक व्यवहारांमध्ये महिलांचे योगदान अनेकदा थेट आकडेवारीत दिसत नाही. मात्र, समुद्रातील उत्पादनाचे उत्पन्नात रूपांतर करण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
अर्थव्यवस्थेचा कणा; पण महिलांचे श्रम अदृश्य!
मासेमारी क्षेत्रातील महिलांच्या योगदानाचे महत्त्व देशपातळीवरील अभ्यासातूनही स्पष्ट होते. अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) अभ्यासानुसार, भारतातील लघुस्तरीय मासेमारी क्षेत्रात लाखो महिला कार्यरत आहेत. मासळी हाताळणी, प्रतवारी, प्रक्रिया आणि व्यापार अशा मासेमारीपश्चात कामांमध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. मात्र, त्यांच्या श्रमांची नोंद आणि आर्थिक मूल्यांकन अनेकदा पुरेशा प्रमाणात होत नाही.
मासळीविक्रेत्या महिलांच्या कामाकडे असंघटित क्षेत्रातील व्यवसाय म्हणून पाहिले जाते. प्रत्यक्षात त्यांच्या कामात भांडवल गुंतवणूक, खरेदी-विक्री, मालाची गुणवत्ता तपासणे, वाहतूक, ग्राहक व्यवस्थापन आणि बाजारातील जोखीम स्वीकारणे अशा अनेक व्यावसायिक जबाबदार्यांचा समावेश असतो.
मासळी खरेदीसाठी लागणारे भांडवल, वाहतुकीचा खर्च, बर्फाची व्यवस्था, बाजारातील जागेचे भाडे आणि न विकल्या गेलेल्या मासळीचे नुकसान या सर्व जोखमी त्यांना स्वीकाराव्या लागतात. त्याशिवाय स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, मासळी साठवण्यासाठी शीतगृहे, कचरा व्यवस्थापन आणि सुरक्षित विक्रीची जागा या मूलभूत सुविधांची कमतरता अनेक बाजारपेठांमध्ये जाणवते. महिलांना सहज उपलब्ध होणारे कर्ज, बाजारपेठांमध्ये मूलभूत सुविधा, शीतसाखळी, प्रक्रिया उद्योगांचे प्रशिक्षण आणि महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळाल्यास या व्यवसायाला अधिक संघटित स्वरूप मिळू शकते.
बाजारातून घरी... पण दिवस संपत नाही!
दुपारचे १२-१ वाजले की बाजारातील गर्दी कमी होऊ लागते. सकाळपासून ग्राहकांशी व्यवहार करणार्या महिलांची विक्री अंतिम टप्प्यात असते. उरलेली मासळी विकण्यासाठी त्या पुन्हा भाव कमी करतात. काही मासळी घरी नेण्यासाठी बाजूला ठेवली जाते, तर काहींची विक्री करून दिवसाचा हिशोब केला जातो. मात्र, बाजारातील काम संपले म्हणजे त्यांचा दिवस संपत नाही. मासळीच्या बाजारातून घरी परतल्यानंतर पुन्हा घरातील कामांची मालिका सुरू होते. काही महिला दुसर्या दिवशीच्या विक्रीसाठी मासळी स्वच्छ करून ठेवतात. काही महिला सुया मासळीची तयारी करतात.
मासेमारी क्षेत्रात ऋतुमानाचाही मोठा प्रभाव असतो. पावसाळ्यातील मासेमारीबंदीचा काळ, समुद्रातील हवामान, वादळे, मासळीची उपलब्धता आणि बाजारातील चढ-उतार यामुळे त्यांच्या उत्पन्नात अनिश्चितता असते. अशा काळात काही महिला सुया मासळीचा व्यवसाय, इतर खाद्यपदार्थांची विक्री किंवा पूरक व्यवसायांचा आधार घेतात.
परंपरेचा वारसा आणि बदलत्या काळातील नवी ओळख!
कोळी महिलांचे जीवन हे केवळ एका दिवसाच्या कष्टांपुरते मर्यादित नाही. ही पिढ्यान्पिढ्या पुढे आलेली परंपरा आहे. आईकडून मुलीकडे, सासूकडून सुनेकडे मासळी ओळखण्याचे कौशल्य, बाजारातील व्यवहार, ग्राहकांशी संवाद आणि पारंपरिक पाककृतींचे ज्ञान हस्तांतरित होत असते. लहानपणापासून बाजाराचे वातावरण पाहिल्यामुळे अनेक मुलींना या व्यवसायातील बारकावे सहज समजतात.
समुद्राच्या लाटांइतकीच अविरत कष्टांची कहाणी!
समुद्रात मासे पकडणारा मच्छीमार आणि बाजारात त्यांची विक्री करणारी महिला, ही एकाच अर्थव्यवस्थेची दोन महत्त्वाची चाके आहेत. मासळी बाजारात दिसणारी प्रत्येक महिला ही केवळ विक्रेती नसते. ती एका कुटुंबाची आर्थिक आधारस्तंभ असते, पारंपरिक व्यवसायाची वारसदार असते, खाद्यसंस्कृतीची जपणूक करणारी असते आणि किनारपट्टीच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाची घटक असते. तिच्या डोयावरील मासळीची पाटी म्हणजे केवळ रोजीरोटीचे साधन नाही, तर समुद्राशी जोडलेल्या महाराष्ट्राच्या समृद्ध जीवनशैलीचे प्रतीक आहे.
समुद्राच्या लाटा रोज किनार्यावर येतात आणि परत जातात; पण कोळी महिलेचा संघर्ष प्रत्येक पहाटेसोबत नव्याने सुरू होतो. तिच्या कष्टांवर अनेक घरांच्या चुली पेटतात आणि महाराष्ट्राच्या मासळी संस्कृतीचा स्वाद पिढ्यान्पिढ्या टिकून राहतो. ‘जागतिक मत्स्यव्यवसाय दिना’च्या निमित्ताने या कष्टकरी महिलांच्या योगदानाला सलाम करणे, हीच त्यांच्या श्रमांची खरी दखल ठरेल!
९०९६२८४६०६