हवामान बदलामुळे बदलती मासेमारी

    21-Nov-2026
Climate Change Impact Marine Fisheries
 
हवामानबदल ही आज जागतिकस्तरावरील गंभीर समस्या बनली आहे. त्याचे परिणाम केवळ तापमानवाढ किंवा अनियमित पावसापुरते मर्यादित नसून, सागरी परिसंस्था आणि मासेमारी व्यवसायावरही होत आहेत. हवामानबदलावरील आंतरसरकारी पॅनेलच्या (IPCC) मते, नैसर्गिक किंवा मानवी कारणांमुळे दीर्घकाळात हवामानाच्या स्वरूपात होणारा बदल म्हणजे ‘हवामानबदल’ होय. याचा परिणाम माशांचे अधिवास, प्रजनन चक्र आणि मच्छीमारांच्या उत्पन्नावरही दिसून येतो.
 
यातील मुख्य दृश्य परिणाम म्हणजे, तापमानबदल आणि माशांचे स्थलांतर. १९७० सालापासून समुद्राचे पृष्ठभागीय तापमान दर दशकाला सरासरी ०.१३ अंश सेल्सिअसने वाढत आहे. मासे शीतरक्ती (ectothermic) प्राणी असल्याने २-३ अंश सेलिअसची तापमानवाढसुद्धा त्यांच्या ‘एरोबिक’ क्षमतेत (aerobic scope) ५० टक्क्यांपर्यंत घट घडवून आणते. परिणामी, सागरी प्रजाती थंड पाण्याचा शोध घेण्यासाठी दर दशकाला सरासरी ७० ते ८० किमी ध्रुवांकडे (poleward) आणि तीन ते पाच मीटर अधिक खोल पाण्यात स्थलांतर करत आहेत. भारतीय बांगडा 'Rastrelliger kanagurta' उत्तरेकडील अक्षांशांकडे सरकत असून, त्याच्या पारंपारिक दक्षिण किनार्‍यावरील पकडीत घट झाली आहे. तारली माशाच्या (Sardinella longiceps) मासेमारीत मोठी अनिश्चितता दिसून येत आहे, तर राणी माशासारख्या (Nemipterus japonicas) प्रजाती पृष्ठभागावरील उष्णतेमुळे खोल पाण्यात सरकत आहेत.
 
समुद्राच्या तापमानवाढीचा माशांच्या प्रजनन चक्रावरही परिणाम होतो. पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे, मान्सून आणि ‘अपवेलिंग’च्या वेळेत होणारे बदल यामुळे माशांच्या अंडी घालण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. ‘अपवेलिंग’ म्हणजे खोल समुद्रातील पोषक घटकांनी समृद्ध पाणी पृष्ठभागावर येण्याची प्रक्रिया. प्लवकांच्या निर्मितीचा काळ आणि माशांच्या पिल्लांच्या जन्माचा काळ यांचा समन्वय बिघडल्यास नवजात पिलांना पुरेसे अन्न मिळत नाही. त्यामुळे माशांच्या पुढील पिढीच्या अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो. ‘टायगर प्रॉन्स’सारख्या महत्त्वाच्या प्रजातींच्या उपलब्धतेच्या हंगामातही बदल जाणवत आहेत.
 
या बदलांचा थेट फटका मच्छीमारांना बसत आहे. पिढ्यान्पिढ्या ठरावीक हंगामात, ठरावीक ठिकाणी आणि विशिष्ट प्रकारच्या जाळ्यांनी मासेमारी करणार्‍या मच्छीमारांना आता बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागत आहे. मासे खोल समुद्रात किंवा किनार्‍यापासून दूर गेल्यामुळे अधिक अंतर कापावे लागते. परिणामी, इंधनाचा आणि मासेमारीचा खर्च वाढतो. माशांच्या उपलब्धतेतील अनिश्चिततेमुळे उत्पन्नावरही परिणाम होतो. पूर्वी ठरावीक महिन्यांत मुबलक प्रमाणात मिळणारे मासे आता त्याच प्रमाणात मिळतील, याची खात्री राहिलेली नाही.
 
सागरी अन्नसाखळीवरही हवामानबदलाचे गंभीर परिणाम होत आहेत. समुद्राचे पाणी अधिक गरम झाल्यामुळे त्याचे थर एकमेकांत कमी मिसळतात. त्यामुळे खोल पाण्यातील पोषक घटक पृष्ठभागावर पोहोचण्याचे प्रमाण घटते आणि अन्नसाखळीचा पाया असलेल्या ‘फायटोप्लँटन’च्या निर्मितीवर परिणाम होतो. समुद्राच्या आम्लीकरणामुळे शिंपले, कोळंबी आणि इतर कवचधारी जीवांच्या कवचांची निर्मिती बाधित होते. जेलीफिशच्या वाढत्या प्रमाणामुळेही व्यावसायिक मासेमारीसमोर नवी आव्हाने उभी राहत आहेत.
 
अरबी समुद्रातील तापमानवाढ, समुद्री उष्णतेच्या लाटा आणि चक्रीवादळांची तीव्रता यामुळे सागरी अधिवासांचे नुकसान होत आहे. लक्षद्वीप आणि अंदमानमधील प्रवाळभित्तिकांचे विरंजन हे त्याचे उदाहरण आहे. प्रवाळभित्तिका अनेक माशांसाठी प्रजनन, निवास आणि खाद्य मिळण्याची महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यांचे नुकसान झाल्यास या अधिवासांवर अवलंबून असलेल्या प्रजातींनाही धोका निर्माण होतो.
 
हवामानबदलाशी जुळवून घेण्यासाठी स्थानिक पातळीवरील उपाययोजनाही तितयाच आवश्यक आहेत. मासेमारीच्या हंगामातील बदल, माशांच्या उपलब्धतेची नोंद आणि समुद्रातील तापमानाचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. मत्स्यव्यवसाय विभाग, संशोधक आणि मच्छीमार यांच्यात माहितीची देवाणघेवाण झाल्यास योग्य निर्णय घेता येतील. प्रजनन काळात संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण, विनाशकारी मासेमारीवर नियंत्रण आणि जबाबदार मासेमारीच्या नियमांचे पालन केल्यास, सागरी संसाधनांवरील ताण कमी होऊ शकतो. बदलत्या परिस्थितीत पारंपरिक ज्ञान आणि वैज्ञानिक माहिती यांचा समन्वयदेखील महत्त्वाचा ठरेल.
 
एकूणच, हवामान बदलामुळे माशांचे स्थलांतर, प्रजनन चक्र, उपलब्धता आणि मासेमारीचे पारंपरिक हंगाम बदलत आहेत. याचा परिणाम सागरी जैवविविधतेबरोबरच मच्छीमारांचे उत्पन्न आणि अन्नसुरक्षेवरही होत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी परिसंस्था-आधारित व्यवस्थापन, सागरी संरक्षित क्षेत्रांची निर्मिती आणि शाश्वत मासेमारी पद्धतींचा अवलंब आवश्यक आहे. हवामान बदलाच्या परिणामांविषयी समाजात जागरूकता निर्माण करूनच सागरी संसाधनांचे संवर्धन आणि भविष्यातील मासेमारी अधिक शाश्वत ठेवता येईल.
 
प्रदीप चोगले
(लेखक ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ या संस्थेत सागरी जीवशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)
९०२९१४५१७७




संबंधित मजकूर