घाटकोपरमध्ये सात बांगलादेशी घुसखोरांना अटक!

    21-Nov-2026   
 
Bangladeshi Nationals Arrested in Ghatkopar
 
मुंबई (Bangladeshi Nationals Arrested in Ghatkopar) : घाटकोपर पोलिसांनी भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या सात बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. हे सातही जण गेल्या दहा महिन्यांपासून भारतात राहत असल्याचा आरोप आहे. गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी घाटकोपर पोलिसांच्या दहशतवादविरोधी कक्षाच्या (एटीसी) पथकाने ही कारवाई केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घाटकोपर पश्चिम येथील दिशा रुग्णालय, संत तुकाराम पूल आणि जागृतीनगर परिसरात गस्त घालत होते. यावेळी सात जण संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांची चौकशी करून तपासणी केली असता, त्यांच्या मोबाईलमध्ये बांगलादेशातील जन्मदाखले, राष्ट्रीय ओळखपत्रे आणि बांगलादेशी मोबाईल क्रमांक आढळून आले. अधिक चौकशीत हे सातही जण बांगलादेशी नागरिक असल्याचे आणि सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश करून येथे वास्तव्य करत असल्याचे उघड झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. (Bangladeshi Nationals Arrested in Ghatkopar)
 
मोहम्मद बद्रुज्जमान नजरुल इस्लाम मोडल, सोहाग अब्दुल हन्नान राणा, मोनिर कालू फकीर, बिप्लब मोहम्मद जहांगीर बाबलू हुसेन, नईम मिझानूर रहमान शेख, साजिद मोहम्मद शहाजहान हवालदार, रकीब मोहम्मद अबू नासेर हुसेन हे सातही जण डोंबिवली पश्चिम येथील गरीबाचा वाडा परिसरात वास्तव्यास होते. त्यांचे मूळ ठिकाण बांगलादेश असल्याचे तपासात समोर आले आहे. या सातही बांगलादेशी नागरिकांना भारतातून हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी घाटकोपर पोलीस परदेशी नागरिक नोंदणी अधिकारी आणि मुंबई गुन्हे शाखेचे परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त यांच्याकडे अहवाल सादर करणार आहेत. (Bangladeshi Nationals Arrested in Ghatkopar)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर