अहंकाराच्या भिंतीत हरवलेले भावबंध म्हणजे ‘बंधू’!

    21-Nov-2026
 
 
Bandhu Marathi Movie Review
 
नात्यांची वीण, भावनांचा गुंता आणि माणुसकीचा हळवा प्रवास!
 
कुटुंब म्हटले की, प्रेम, माया, आपुलकी, विश्वास आणि एकमेकांसाठी काहीही करण्याची तयारी हे सगळे आलेच! पण, याच कुटुंबात जेव्हा अहंकार, मत्सर, गैरसमज आणि मालमत्तेचे वाद शिरतात; तेव्हा वर्षानुवर्षे जपलेली नाती क्षणात दुरावू लागतात. एकाच घरात वाढलेली माणसे एकमेकांची शत्रू कधी बनतात, हे त्यांनाही कळत नाही. अशा वेळी या संघर्षाची सर्वाधिक किंमत मोजावी लागते, ती घरातील लहान मुलांना! मोठ्यांच्या वादात त्यांचे बालपण नकळत हरवत जाते. याच नात्यांमधील गुंतागुंत, दोन भावांमधील संघर्ष आणि त्याचा एका लहान मुलाच्या मनावर होणारा परिणाम, यांचा वेध घेणारा नितीन सुपेकर दिग्दर्शित ‘बंधू’ हा चित्रपट आहे.
 
‘बंधू’ या शीर्षकातच एक आपलेपणा आहे. बंधुत्व म्हणजे केवळ रक्ताचे नाते नाही, तर एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, कठीण प्रसंगी साथ देणे आणि मतभेद असूनही नाते टिकवून ठेवणे. याच भावनेभोवती चित्रपटाचा आशय आकार घेतो. नात्यांची ही गुंतागुंत मांडताना चित्रपट भावनिक पातळीवर प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो.
 
चित्रपटाची कथा एका ग्रामीण कुटुंबाभोवती फिरते. महादेव नांगरे (उपेंद्र लिमये) आणि सदाशिव नांगरे (जितेंद्र जोशी) हे दोन सख्खे भाऊ. एकेकाळी एकाच घरात गुण्यागोविंदाने राहणारे हे दोघे भाऊ कालांतराने वेगळे होतात. सुरुवातीला छोट्या-मोठ्या कारणांवरून होणारे मतभेद पुढे अहंकार, गैरसमज आणि जमिनीच्या वादापर्यंत पोहोचतात. परिस्थिती इतकी टोकाला जाते की, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे हेच भाऊ न्यायालयात एकमेकांविरोधात उभे राहतात. मात्र, या चित्रपटाचे वैशिष्ट्य केवळ दोन भावांमधील संघर्ष एवढेच नाही. या संघर्षाचा परिणाम पुढच्या पिढीवर, विशेषतः लहान मुलांच्या मनावर कसा होतो, याचा अत्यंत महत्त्वाचा विषय चित्रपट हाताळतो.
 
सदाशिवचा मुलगा गणेश याच्या आयुष्यात लहान भाऊ कार्तिकचे आगमन होते. नव्या भावाच्या जन्मानंतर आई-वडिलांचे लक्ष कार्तिककडे अधिक केंद्रित होते. त्यामुळे गणेशच्या मनात आपण दुर्लक्षित झाल्याची भावना निर्माण होते. त्यातच काका-काकी आणि चुलत भावंडांशी असलेले ताणलेले संबंध त्याच्या मनात आणखी कटुता निर्माण करतात.
 
मोठ्यांच्या भांडणाचा परिणाम लहान मुलांच्या मनावर किती खोलवर होऊ शकतो, याचे चित्रण हा चित्रपट करतो. लहान मुलांच्या मनात निर्माण होणारा मत्सर, असुरक्षितता, राग आणि प्रेमाची अपेक्षा या भावनांकडे दिग्दर्शकाने गांभीर्याने पाहिले आहे. विशेष म्हणजे, एखाद्या मुलाच्या वागण्यामागे केवळ त्याचा स्वभाव नसतो, तर त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाचाही मोठा वाटा असतो, हा विचार चित्रपटातून समोर येतो.
 
उपेंद्र लिमयेसाठी ‘महादेव’ची भूमिका म्हणजे, अभिनयातील विविध छटा दाखवण्याची संधी आहे. मोठा भाऊ म्हणून असलेला अधिकार, कुटुंबाविषयीची जबाबदारी, स्वतःच्या निर्णयांबद्दलचा ठामपणा आणि भावासोबत निर्माण झालेला संघर्ष, या सगळ्या भावना त्याने आपल्या अभिनयातून व्यक्त केल्या आहेत. जितेंद्र जोशीने ‘सदाशिव’च्या व्यक्तिरेखेला भावनिक खोली दिली आहे. उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी या दोघांची अभिनयशैली वेगळी असली, तरी पडद्यावर त्यांच्यातील संघर्ष विश्वासार्ह वाटतो. दोघेही अनुभवी कलाकार असल्यामुळे एकमेकांसमोर उभे राहताना त्यांच्या देहबोलीतून आणि संवादांतून व्यक्तिरेखांमधील तणाव जाणवतो. या दोन कलाकारांची जुगलबंदी हा चित्रपटाचा मोठा ‘प्लस पॉईंट’ म्हणावा लागेल.
 
मृण्मयी देशपांडे आणि मिताली जगताप यांनीही दोघांना उत्तम साथ दिली आहे. कुटुंबातील नातेसंबंध आणि त्यातून निर्माण होणार्‍या भावनिक परिस्थितीमध्ये त्यांची व्यक्तिरेखा महत्त्वाची ठरते. त्यांनी भूमिकेतील सहजता जपली आहे. मात्र, या दोन्ही अभिनेत्रींच्या व्यक्तिरेखांना आणखी विस्तार मिळाला असता, तर स्त्रियांच्या दृष्टिकोनातूनही हा कौटुंबिक संघर्ष अधिक प्रभावीपणे समोर आला असता. स्मिता तांबे, श्रीकांत यादव यांनीही आपल्या भूमिका चोख निभावल्या आहेत.
 
दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी ‘बंधू’च्या माध्यमातून दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर कथा मांडली आहे. एका बाजूला दोन सख्ख्या भावांमधील संपत्तीचा वाद, अहंकार आणि न्यायालयीन संघर्ष आहे; तर दुसर्‍या बाजूला लहान मुलांच्या मनात सुरू असलेली भावनिक घालमेल आहे. या दोन कथाप्रवाहांची सांगड घालणे, हे दिग्दर्शकासमोरील मोठे आव्हान होते. कुटुंबातील मोठ्यांचे निर्णय मुलांच्या आयुष्यावर कसे परिणाम करतात, याचा विचार प्रेक्षकांना करायला लावतो. काही प्रसंग अधिक नेमकेपणाने मांडले असते, तर चित्रपटाचा प्रभाव आणखी वाढला असता. हर्षद गायकवाडचे छायांकन उत्तम असून, विजय गवंडेचे संगीत चित्रपटाच्या विषयाला अनुरूप आहे.
 
एकूणच काय, तर ‘बंधू’ हा केवळ दोन भावांच्या भांडणाचा किंवा जमिनीच्या वादाचा चित्रपट नाही; तर मोठ्यांच्या अहंकाराची आणि संघर्षाची किंमत अनेकदा लहान मुलांना मोजावी लागते, याची जाणीव करून देणारा चित्रपट आहे. नात्यांमध्ये दुरावा निर्माण करायला कदाचित एक क्षण पुरेसा असतो; पण तो मिटवण्यासाठी आयुष्यही कमी पडू शकते, हा विचार ‘बंधू’ मनात रुजवतो.
 
प्रस्तुतकर्ता: रजत बेदी
निर्माता: प्रणव देसाई, जुही देसाई, कुलदीप सुनील ओझा
दिग्दर्शक: नितीन सुपेकर
कलाकार: जितेंद्र जोशी, उपेंद्र लिमये, मिताली वराडकर, मृण्मयी देशपांडे, स्मिता तांबे, श्रीकांत यादव आणि शौर्य पाटील
अवधी: २ तास ३५ मिनिटे
 
 -कपिल देशपांडे
 




संबंधित मजकूर