कलम ३७० हटवल्याने काश्मिरी तरुणांमधील फुटीरतावाद संपला : अमित शाह

३५ वर्षांच्या हिंसाचारानंतर खोऱ्यातील एकही स्थानिक तरुण दहशतवादात सक्रिय नाही; ईटानगरमधील कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्र्यांचा दावा

    21-Nov-2026   

Article 370 Abrogation Kashmir Separatism
 
ईटानगर : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे संविधानातील कलम ३७० रद्द केल्यामुळे काश्मिरी तरुणांमधील फुटीरतावादी भावना संपुष्टात आली आहे. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ हिंसाचार आणि अशांततेचा सामना केलेल्या काश्मीर खोऱ्यात आज एकही स्थानिक तरुण दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी केला. अरुणाचल प्रदेशातील ईटानगरजवळ बंदरदेवा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अरुणाचल प्रदेश पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस ध्वज’ प्रदान करण्यात आला.
 
कलम ३७० हटविल्यानंतर काश्मीरमधील परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. हा बदल केवळ दहशतवाद्यांचा खात्मा केल्यामुळे झालेला नाही, तर तरुणांमधील भेदभाव आणि फुटीरतावादी वातावरण संपुष्टात आणल्यामुळेही झाला आहे, असे शाह म्हणाले. १९९० च्या दशकातील अशांततेची आठवण करून देताना त्यांनी त्या काळात दहशतवाद सर्वोच्च पातळीवर होता आणि काश्मीर भारतासोबत किती काळ राहील, याबाबतही प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगितले.
 
विरोधकांनी कलम ३७० आणि दहशतवादाचा परस्पर संबंध नसल्याचा दावा करत हा निर्णय चुकीचा ठरविला होता. मात्र, खोऱ्यातील बदलांनी विरोधकांचे दावे चुकीचे ठरविल्याचे शाह यांनी नमूद केले. २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांमुळे काश्मीरमध्ये कायमस्वरूपी शांततेचा मार्ग अधिक मजबूत झाला आहे. तरुणांमध्ये फुटीरतावादाऐवजी शांतता आणि विकासाच्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
 
सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणांच्या त्यागामुळे काश्मीरमध्ये बदल घडल्याचे सांगत शाह यांनी त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. आगामी काळात काश्मीरमध्ये शांतता आणि समृद्धीचे नवे पर्व निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर