अमित शाह यांच्या उपस्थितीत 'दहशतवाद विरोधी परिषद २०२६' संपन्न

ड्रोन घुसखोरीपासून ऑनलाइन कट्टरतावादापर्यंत विविध विषयांवर चर्चा

    21-Nov-2026   

Anti-Terrorism Conference 2026
 
मुंबई (Anti-Terrorism Conference 2026) : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आयोजित केलेल्या दोन दिवसीय दहशतवादविरोधी परिषदेत ड्रोन, क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दहशतवादी वित्तपुरवठा आणि ऑनलाइन कट्टरतावादाच्या वाढत्या आव्हानांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) दहशतवादी कारवायांसाठी होणारा गैरवापर, तसेच त्याला प्रतिबंध करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही विशेष भर देण्यात आला. एनआयएचे महासंचालक राकेश अग्रवाल यांनी परिषदेत झालेल्या चर्चेची माहिती दिली.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परिषदेत दोन तांत्रिक सत्रांमध्ये सहभाग घेतला. एनआयएने आयोजित केलेल्या सहाव्या दहशतवादविरोधी परिषदेचा समारोप केंद्रीय आणि राज्यस्तरीय तपास यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या निर्धाराने झाला. गुप्तचर माहितीच्या आधारे तपास करणे आणि दहशतवादी प्रकरणांमध्ये प्रभावी अभियोजन राबविणे, यांद्वारे देशाची एकत्रित दहशतवादविरोधी यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर परिषदेत भर देण्यात आला.(Anti-Terrorism Conference 2026)
 
पहिल्या तांत्रिक सत्रात संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद यांच्यातील वाढत्या संबंधांवर चर्चा झाली. यामध्ये ड्रोनमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांकडे विशेष लक्ष वेधण्यात आले. ड्रोन हे कमी खर्चातील, मात्र अमली पदार्थ, शस्त्रे, रोख रक्कम आणि स्फोटके वाहून नेण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन ठरत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. अनधिकृत ड्रोन देशाच्या हद्दीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा विकसित करण्याचे आव्हानही त्यांनी अधोरेखित केले. पंजाबला ड्रोनच्या घुसखोरीचा सर्वाधिक धोका असून, या राज्यात ड्रोन घुसखोरीच्या सर्वाधिक घटना नोंदवण्यात आल्या आहेत.
 
दुसऱ्या सत्रात कट्टरतावादाच्या प्रसारासाठी ऑनलाइन माध्यमांचा होणारा वापर हा चर्चेचा प्रमुख विषय होता. फेसबुक, मेटा, टेलिग्राम आणि सिग्नल यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कट्टरतावादी आशय उपलब्ध असल्याकडे अग्रवाल यांनी लक्ष वेधले. दहशतवादी संघटनांकडून प्रकाशित करण्यात येणारी नियतकालिके आणि वृत्तपत्रांचाही या माध्यमांतून प्रचार केला जात आहे. याशिवाय प्रत्यक्ष संपर्क, सभा आणि कारागृहांचाही कट्टरतावादाच्या प्रसारासाठी वापर केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.(Anti-Terrorism Conference 2026)
 
तिसऱ्या सत्रात सीमापार दहशतवादी वित्तपुरवठ्याच्या आव्हानांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमुळे तपास यंत्रणांसमोर निर्माण होणाऱ्या अडचणींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांचा मागोवा घेणे कठीण असते. तसेच या व्यवहारांमधून पैसे पाठवणारी आणि स्वीकारणारी व्यक्ती आपली ओळख लपवू शकते, ही गंभीर बाब असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
 
चौथ्या सत्रात सीमापार दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या महत्त्वावर चर्चा झाली. परदेशात पळून गेलेल्या आरोपींना भारतात परत आणण्याच्या प्रयत्नांमध्ये भारताला उल्लेखनीय यश मिळाले आहे. १९९९ पासून आतापर्यंत ३०३ फरार आरोपींना भारतात परत आणण्यात आले असून, यंदा त्यापैकी ७२ आरोपींना भारतात आणण्यात यश आले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचेही नमूद करण्यात आले.(Anti-Terrorism Conference 2026)
 
पाचव्या तांत्रिक सत्रात सीमापार दहशतवादी कारवायांचा मुकाबला करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर चर्चा झाली. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) भूमिकेचा विशेष उल्लेख करण्यात आला. दहशतवादी संघटना प्रचार आणि कट्टरतावादाच्या प्रसारासाठी एआयचा वापर करत असताना, कायदा अंमलबजावणी यंत्रणांकडूनही अशा प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात असल्याचे सांगण्यात आले.
 
दि. १९ आणि २० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील डीआरडीओ भवन येथे या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ४० पोलीस महासंचालकांसह एकूण २३० प्रतिनिधींनी सहभाग घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय गृह राज्यमंत्री बांदी संजय कुमार आणि केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांचीही यावेळी उपस्थिती होती.(Anti-Terrorism Conference 2026)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर