शेवाळातून रोजगारनिर्मिती

    21-Nov-2026

 Seaweed Farming Coastal Employment Maharashtra 
 
महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर मासेमारी हा हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार आहे. मात्र, बदलते हवामान, अनिश्चित मासेमारी हंगाम, समुद्रातील मत्स्यसाठ्यांवरील वाढता दबाव यामुळे मच्छीमारांसमोर आर्थिक आव्हाने उभी राहत आहेत. अशा परिस्थितीत समुद्राच्या पाण्यात केली जाणारी समुद्री शेवाळाची (सीवीड) लागवड त्यांच्यासाठी उत्पन्नाचा नवा पर्याय ठरत आहे. जमीन किंवा गोड्या पाण्याची गरज नसल्याने पारंपरिक मासेमारीला पूरक व्यवसाय म्हणून तिचे महत्त्व वाढत आहे.
 
मुंबईस्थित ‘लायमा क्रू प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीकडून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर समुद्री शेवाळ लागवडीचे प्रकल्प राबविले जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात २०२२ मध्ये महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहकार्याने या उपक्रमाची सुरुवात झाली. काजीरभाटी, वरवडे आणि जयगड-पाटीलवाडी येथे स्थानिक मच्छीमार व महिलांच्या सहभागातून प्रकल्प विकसित झाला. आता रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील अन्य किनारी भागांतही त्याचा विस्तार होत आहे. रायगडमधील अलिबाग आणि मांडवा परिसरात, तसेच श्रीवर्धनमधील आदगाव येथे प्रकल्प सुरू आहेत. रत्नागिरीतील वरवडे येथेही लागवड सुरू असून, अंबूवाडी येथे प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. या उपक्रमातून सध्या सुमारे २०० महिला आणि ७० पुरुषांना रोजगार मिळत आहे.
 
समुद्री शेवाळ लागवडीसाठी प्रामुख्याने बांबूच्या तराफ्यांचा वापर केला जातो. या तराफ्यांना शेवाळाचे तुकडे बांधून समुद्रात सोडले जातात. त्यांची नियमित देखभाल केली जाते. साधारण ४५ दिवसांनी शेवाळाची काढणी करता येते. रत्नागिरीतील प्रकल्पात ‘कॅपाफायकस अल्वारेझी’ (Kappaphycus alvarezii) या प्रजातीची लागवड केली जाते. एका तराफ्याला सुरुवातीला ३० ते ४० किलो शेवाळ बांधल्यानंतर ४५ दिवसांत सुमारे २५० किलोपर्यंत उत्पादन मिळू शकते.
 
या प्रक्रियेत मच्छीमारांची भूमिका महत्त्वाची आहे. तराफे तयार करणे, दोरखंड विणणे, लागवड, देखभाल, काढणी, स्वच्छता आणि वाळवणे अशा टप्प्यांवर स्थानिकांना काम मिळते. मासेमारी बंद असताना किंवा प्रतिकूल हवामानात हा व्यवसाय आर्थिक आधार देऊ शकतो. शेवाळाची प्रतवारी, स्वच्छता, वाळवण आणि प्रक्रिया यांसारख्या कामांत महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यापूर्वीच्या रत्नागिरी प्रकल्पात महिला बचत गटांतील महिलांना प्रतिदिन ३०० रुपये रोजंदारी मिळत असल्याची माहिती देण्यात आली होती.
 
समुद्री शेवाळापासून जैविक खते, जैवउत्तेजके, बायोप्लास्टिक, सौंदर्यप्रसाधने आणि अन्नपदार्थांसाठी लागणारा कच्चा माल तयार होतो. औषधनिर्मितीसाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. ‘लायमा क्रू’ कंपनी शेवाळ लागवडीपासून प्रक्रिया आणि मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यापर्यंतची यंत्रणा विकसित करीत आहे. रत्नागिरीतील लोटे येथे कंपनीचे चार उत्पादन प्रकल्प आहेत.
 
लागवडीसाठी योग्य ठिकाण निवडताना कंपनीकडून उपग्रह माहिती, समुद्राचे तापमान, क्षारता, लाटांची तीव्रता आणि समुद्रप्रवाह यांचा अभ्यास केला जातो. विस्तारापूर्वी जैवविविधता, पर्यावरणीय उपयुक्तता आणि प्रजातींची निवड यांचे शास्त्रीय मूल्यमापन आवश्यक आहे.
 
प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शनामुळे नव्याने सहभागी होणार्‍या कुटुंबांना लागवडीची पद्धत समजते. योग्य देखभाल, वेळेवर काढणी आणि दर्जेदार वाळवण यांमुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास मदत होते आणि बाजारपेठेतील विश्वास वाढतो. या उपक्रमात अधिकाधिक किनारपट्टीवरील मच्छीमार आणि स्थानिक समुदायांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे. ‘डीपी वर्ल्ड’च्या ‘सीएसआर’ निधीतून आर्थिक साहाय्य दिले जाते. उपलब्ध शासकीय अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जातात. याशिवाय, उत्पादकांसोबत आगाऊ खरेदी करार (बायबॅक ग्रीमेंट) केला जातो. त्यामुळे उत्पादित शेवाळाला खरेदीची व्यवस्था उपलब्ध होते आणि विक्रीची अनिश्चितता कमी होते. आर्थिक साहाय्य, अनुदान आणि खरेदी करारामुळे उत्पादकांची आर्थिक जोखीम कमी होऊन त्यांना व्यवसायात सहभागी होण्याचा विश्वास मिळतो.
 
मासेमारी हा कोकणाचा पारंपरिक व्यवसाय असला, तरी बदलत्या परिस्थितीत त्याला पूरक रोजगाराची जोड देणे गरजेचे आहे. समुद्रातील साधनसंपत्तीचा नियोजनबद्ध वापर करून रोजगार निर्माण करणारी समुद्री शेवाळ शेती मच्छीमारांसाठी नवी संधी ठरू शकते. महिला बचत गट, मच्छीमार आणि स्थानिक समुदायांना केंद्रस्थानी ठेवून, या प्रकल्पाचा पर्यावरणपूरक विस्तार झाल्यास महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर निळ्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळू शकते.
 
-स्वप्निल तांडेल
८९७६६२४५१९




संबंधित मजकूर