मागील दोन दिवसांत उबाठा गटाच्या राजकारणाचे दोन वेगवेगळे चेहरे समोर आले आणि त्यांच्या भूमिकेतील विरोधाभासही प्रकर्षाने पुढे आला. पहिला चेहरा म्हणजे, ज्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर उबाठा गट आपला राजकीय वारसा सांगतो, त्याच बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने साधी श्रद्धांजलीही व्यक्त केली नाही. मात्र, उबाठाकडून त्यावर नाराजीचा, निषेधाचा साधा शब्दही उमटला नाही. त्यानंतर दुसर्याच दिवशी, शिवसेनेच्या शायना एनसी यांच्या बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचे भांडवल करीत उबाठाने आक्रमक पवित्रा घेत रान उठवले.
बाळासाहेब ठाकरे हे नाव केवळ महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नेत्याचे नाव नसून, एका विचारधारेचे प्रतीक आहे. त्यांच्या हयातीत काँग्रेसविरोध हा शिवसेनेच्या राजकारणाचा गाभा होता. हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि काँग्रेसविरोध या मुद्द्यांवर बाळासाहेबांनी शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली. त्यामुळे बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला त्यांच्या विचारांचा वारसा सांगणार्या उबाठा गटाकडून काँग्रेसच्या भूमिकेबाबत काहीतरी प्रतिक्रिया उमटेल, अशी अपेक्षा असणे स्वाभाविक होते. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त एक साधी ‘पोस्ट’ही केलेली नसताना, उबाठा गटाने त्यावर मौन बाळगणेच पसंत केले. दुसरीकडे शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडण्याचा आरोप करीत उबाठा गटाने थयथयाट केला. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांपेक्षा त्यांच्या सोयीच्या राजकारणाचाच पर्दाफाश झाला. मुंबई महानगरपालिकेपर्यंत या घटनेची धग पोहोचली आणि विरोधकांनी थेट महापौरांनाच घेराव घातला. वास्तविक, शायना एनसी मुंबई महापालिकेच्या सदस्य नसताना, पालिकेच्या आवारात त्यांच्याविरोधात रान उठवणे हास्यास्पदच. शायना एनसी यांनी रीतसर ‘पोस्ट’ करून घडलेल्या प्रकाराची माफी मागितली. मात्र, त्यानंतरही उबाठा गटाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. कुठल्याही आंदोलनाचा उद्देश न्याय मिळवून देणे असेल, तर माफी आणि निषेधानंतर पुढचा मार्ग काय, याचेही भान असायला हवे. आंदोलनाचा नेमका हेतू काय, हे स्पष्ट झाले पाहिजे. कारण, एखाद्या घटनेचा निषेध करण्यापेक्षा त्याचे राजकीय भांडवल करण्याची घाई अधिक दिसू लागली, तर त्यामागील प्रामाणिकपणावरच प्रश्न उपस्थित होतात.
आपला तो बाब्या...
सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी विचारांशी तडजोड केली की, राजकारणात विसंगती निर्माण होते. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकांना तिलांजली देत काँग्रेससोबत हातमिळवणी केली आणि त्यानंतर त्यांच्या पक्षाची झालेली वाताहत अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. बाळासाहेबांचे नाव, त्यांचा वारसा आणि त्यांची भाषणे यांचा सोयीने वापर करायचा. मात्र, त्याच बाळासाहेबांच्या विचारांशी संबंधित प्रश्न उपस्थित झाले की, मौन बाळगायचे, अशी दुटप्पी भूमिका आता उबाठा गटाला पोखरताना दिसते.
खरेतर बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विचारधारेविरोधात भूमिका घेतली. काँग्रेसच्या राजकारणाला विरोध करत, त्यांनी शिवसेनेची स्वतंत्र विचारधारा महाराष्ट्रात रुजवली. हिंदुत्व, मराठी अस्मिता आणि राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. मात्र, आज त्यांचाच वारसा सांगणारा पक्ष काँग्रेससोबत राजकीय समीकरणे जुळवतो आणि त्याच वेळी बाळासाहेबांच्या विचारांशी संबंधित प्रश्नांवर मात्र मौन बाळगतो. विशेष म्हणजे, बाळासाहेबांच्या नावाने नेहमी आरडाओरड करणारे संजय राऊत या संपूर्ण प्रकारावर, ‘कुणी श्रद्धांजली वाहिली नाही म्हणून, बाळासाहेबांचे महत्त्व कमी होत नाही,’ अशी पुस्ती जोडतात. वास्तविक, प्रश्न बाळासाहेबांचे महत्त्व कमी-जास्त होण्याचा नाहीच; प्रश्न आहे तो राजकीय भूमिकेतील सातत्याचा! इंदिरा गांधी किंवा पंडित नेहरू यांच्या जयंती-पुण्यतिथीला आदरांजली वाहणे स्वाभाविक मानले जाते. मग ज्या नेत्याच्या वारशाचा दावा करून राजकारण केले जाते, त्यांच्या स्मृतिदिनाला मित्रपक्षांकडूनही आदराची अपेक्षा ठेवणे चुकीचे कसे? हा विरोधाभास जनतेपासून लपून राहणारा नाही. ठाकरेंनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेच्या मूळ विचारधारेपासून पक्ष दूर गेल्याची टीका सातत्याने होत आली आहे. त्यातही आता उबाठाच्या अशा दुटप्पी भूमिकेमुळे उरलासुरला पक्षही विस्कळीत होण्यास वेळ लागणार नाही.
‘आपला तो बाब्या, दुसर्याचं ते कारटं’ अशी उबाठाची काहीशी अवस्था. थोडक्यात काय, तर ‘इंडी’ आघाडीत राहून सत्तेची स्वप्ने रंगवताना उबाठाला बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि त्यांच्या विचारांचा विसर पडू नये एवढेच!