मुंबई (अक्षय मांडवकर) : गोव्यातील सत्तरी तालुक्यातील म्हादईच्या खोऱ्यात वाघाचा वावर असल्याचा दावा करून प्रसारित करण्यात आलेला व्हिडिओ प्रत्यक्षात गोव्यातील नसल्याचे स्पष्टीकरण गोवा वन विभागाने दिले आहे (Sahyadri-Kokan Corridor). मात्र, महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक अशा तिन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात हद्दक्षेत्र असणाऱ्या या वाघाचे अस्तित्व स्वीकारण्याचे धैर्य गोवा वन विभागाकडे नसल्याची टिका वन्यजीव अभ्यसकांनी केली आहे (Sahyadri-Kokan Corridor). सिंधुदुर्गातील एसकेटी-०४ या वाघिणीचा बछडा असलेला हा वाघ २०२४ मध्ये जन्मला असून, या वाघाची ओळख सह्याद्री-कोकण कॉरिडॉरमधील एसकेटी-३९ अशी करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली (Sahyadri-Kokan Corridor).
१९ नोव्हेंबर रोजी समाजमाध्यमांसह प्रसारमाध्यमांवर वाघाचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. सत्तरी तालुक्यातील चरावणे आणि सुरला परिसरातील दृश्ये असल्याचा दावा त्यासोबत करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर गोवा वन विभागाने स्पष्टीकरण जारी केले. व्हिडिओतील वाघाचे चित्रीकरण झालेले ठिकाण गोव्याच्या हद्दीत नसून कर्नाटकातील बेळगाव वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचे विभागाने स्पष्ट केले. तसेच, हा वाघ सह्याद्री-कोकण कॉरिडॉरमधील एसकेटी-३९ असून, त्याचे भ्रमणक्षेत्र महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती जंगलांमध्ये पसरलेले असल्याचे नमूद केले.
तिलारीच्या जंगलात जन्मलेल्या या वाघाने मोठा झाल्यानंतर आईपासून वेगळे होत स्वतःचे क्षेत्र निर्माण करण्यासाठी जंगलांचा प्रवास केला. गोव्यातील म्हादई खोऱ्यात त्याची उपस्थिती नोंदवण्यात आली असून, या परिसरात गुराची शिकार केल्यानंतर त्यावर ताव मारताना तो कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपला गेला. महाराष्ट्रातील तिलारीचे जंगल, गोव्यातील म्हादईचे जंगल आणि कर्नाटकातील सीमावर्ती वनक्षेत्र अशा विस्तृत भूभागात त्याच्या हालचाली सुरू आहेत. तिलारीच्या खोऱ्यातील एसकेटी-०२ या वाघीणीची कन्या असलेल्या एसकेटी-०४ आणि एसकेटी-०५ या दोन्ही वाघिणी पिल्लांना जन्म देत आहेत. सध्या दोडामार्गात तालुक्यात वास्तव्यास असणाऱ्या एसकेटी-०४ सोबत २०२४ मध्ये तीन पिल्ले कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपण्यात आली होती. त्यानंतर २०२६ मध्ये तिच्यासोबत आणखी तीन पिल्लांची नोंद झाली. त्यामुळे या जंगलांमध्ये वाघांच्या पुढील पिढी वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
गोव्यातील म्हादई आणि सत्तरी परिसरात यापूर्वीही वाघांचा वावर नोंदवण्यात आला आहे. मात्र, या परिसराला वाघांच्या मृत्यूंचा कटू इतिहास आहे. २००९ मध्ये केरी परिसरात तारांच्या फासात अडकून वाघाचा मृत्यू झाला होता. जानेवारी २०२० मध्ये गोलावली परिसरात एका नर वाघाचा मृतदेह आढळला. त्यानंतर शोधमोहीम राबवताना एका वाघिणीसह तिच्या तीन पिल्लांचे मृतदेहही आढळले होते. गुरांची शिकार केल्याच्या रागातून विषप्रयोग झाल्याचा संशय या घटनांमध्ये व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे सीमावर्ती जंगलांमधील वाघांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही महत्त्वाचा आहे.
सीमावर्ती जंगलांचे संरक्षण महत्त्वाचे
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागातील जंगल हे या वाघाच्या भ्रमणासाठी महत्त्वाचे आहे. मात्र, गोवा वन विभाग नेहमीप्रमाणे या वाघाचे अस्तित्व स्वीकारण्यास तयार नाही. प्रशासकीय सीमा या वन्यजीवांच्या भ्रमणात अडथळा ठरत नाहीत. त्यामुळे अशा जंगलांचे संरक्षण करताना तिन्ही राज्यांच्या वन विभागांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. – राजेंद्र केरकर, वन्यजीव अभ्यासक, गोवा