१० हजार किलोमीटरचे अंतर कापून मुरबाडमध्ये पोहचले भारतीय गिधाड

    20-Nov-2026
F14 indian vulture

( छायाचित्र - योगेश शीद)


मुंबई (अक्षय मांडवकर) : पिंजराबंद अधिवास जन्मल्यानंतर मेळघाट व्याघ्रप्रकल्पातून निसर्गमुक्त करण्यात आलेल्या गिधाडाने तब्बल १० हजार ७६७ किलोमीटरचा प्रवास केला असून, सध्या ते ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात दाखल झाले आहे (F14 indian vulture). एफ १४/एम ९९ या क्रमांकाच्या सात वर्षीय मादी भारतीय गिधाड प्रजातीच्या गिधाडाने महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील विविध भूप्रदेश पालथे घातले आहेत (F14 indian vulture). विशेष म्हणजे, या गिधाडाने जंगलातील गिधाडांच्या समूहात मिसळून स्वतंत्रपणे खाद्य शोधण्याची क्षमताही सिद्ध केली आहे. (F14 indian vulture)
 
 
'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'कडून (बीएनएचएस) हरियाणातील पिंजोर येथे गिधाड प्रजनन केंद्र उभारले आहे. या केंद्रात प्रजनन करण्यात आलेली गिधाडे महाराष्ट्रात आणून सोडण्यात आलेली आहेत. मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील सोमठाणा वनपरिक्षेत्रात १५ भारतीय गिधाडांसह या सात वर्षीय मादी गिधाडाला निसर्गमुक्त करण्यात आले होते. २८ मे २०२६ रोजी त्याने उड्डाणाला सुरुवात केली. महाराष्ट्राची सीमा ओलांडून ते मध्य प्रदेशात दाखल झाले. या प्रवासात गिधाडांच्या नैसर्गिक अधिवासासाठी अनुकूल असलेल्या अनेक भूप्रदेशांचा त्याने वापर केला.२८ मे ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत या गिधाडाने एकूण १० हजार ७६७ किलोमीटरचे अंतर पार केले आहे. १३ नोव्हेंबर रोजी ते पुन्हा महाराष्ट्रात दाखल झाले. अकोट आणि मलकापूरमार्गे नाशिक, ठाणे आणि पुणे परिसरातून प्रवास करत ते दक्षिणेकडे कर्नाटकातील विजयपुरा परिसरात पोहोचले. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी कर्नाटकातून लातूरमार्गे पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश केला. पुढे प्रवास करत १९ नोव्हेंबर रोजी ते ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात पोहोचल्याची माहिती बीएनएचएसचे अभिजित दास यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली.
 
 
मुरबाड तालुक्यात या गिधाडाची छायाचित्रे वन विभागाचे वनपाल योगेश शीद यांनी टिपली आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पक्षीनिरीक्षक प्रवीण विशे, शाहिद शेख आणि विनोद गोर्ले उपस्थित होते. मेळघाटातून निसर्गमुक्त केलेल्या गिधाडाने हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध राज्यांतील नैसर्गिक अधिवासांचा वापर केल्याने गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने या निरीक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
 
स्वतंत्रपणे खाद्य शोधले
या गिधाडाबाबत १८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्य प्रदेशातील हलाली धरण परिसरात एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविण्यात आले. येथे हे गिधाड रानटी गिधाडांच्या समूहासोबत मुक्काम करताना आढळले. विशेष म्हणजे, त्यावेळी त्याच्या पोटातील अन्नसाठा (क्रॉप) भरलेला होता. यावरून या गिधाडाने स्वतःहून खाद्य मिळवले असून, ते रानटी गिधाडांच्या समूहात मिसळण्यात यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले. निसर्गमुक्त केलेली गिधाडे स्वतंत्रपणे खाद्य शोधू शकतात आणि नैसर्गिक गिधाडांच्या समूहात सामावून जाऊ शकतात, याचा हा महत्त्वपूर्ण पुरावा मानला जात आहे.




संबंधित मजकूर