मुंबईतील टाटा रुग्णालयात येणार्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदतीचा हात देणार्या संदीप खरात यांच्या सेवाभावी कार्याचा घेतलेला मागोवा...
दुर्धर आजाराची लागण झाल्याने मनाला बसलेला धक्का... मनोमनी होत असलेली अस्वस्थता... भीतीचे काहूर... उपचाराच्या खर्चाची चिंता... त्यात दोन-चार आप्तेष्टांना सोबत घेऊन हजारो किलोमीटरचा प्रवास करत परळमधील टाटा मेमोरियल रुग्णालय गाठल्यावर मुंबईत राहण्याचा प्रश्न, उपचाराबाबतची अनभिज्ञता, अशा एक ना अनेक गंभीर प्रश्नांच्या भावनिक उलथापालथीतून जात असताना कॅन्सरग्रस्त रुग्ण पुरता खचून जातो. दिवस-रात्र त्याच्या मनाची घालमेल होत असते. मानसिक आघातातून जात असलेल्या अशा रुग्णांना आधार देण्याचे काम रुग्ण साहाय्यक संदीप खरात करतात. म्हणूनच कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत सावलीसारखे असणारे संदीप हे टाटा रुग्णालयातील कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी देवदूतापेक्षा कमी नाहीत.
‘टाटा रुग्णालय’ हे नाव जरी घेतले, तरी रुग्ण पुरता गळून पडतो. देशभरातल्या कानाकोपर्यांतून, ग्रामीण भागांतून रुग्ण याच टाटा रुग्णालयात पाऊल टाकतात, तेव्हा भय-चिंतेसोबतच तो कमालीचा गोंधळलेलाही असतो. त्याचे अर्धे अवसान गळून गेलेले असते. अशा वेळी त्याची पहिली भेट ही मार्गदर्शक संदीप यांच्याशी होते. आपुलकीने विचारपूस करत ते आधी रुग्णाला चिंतामुक्त, भीतिमुक्त करण्याचा प्रयत्न करतात. वस्तुस्थितीची जाणीव करून देतानाच, जगण्याचा आशावाद हरपणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतात. त्यांना मानसिक बळ देतात. येथूनच रुग्ण आणि संदीप यांच्यातील अनामिक नाते तयार होते.
गरिबीपुढे हतबल झालेल्या रुग्णांसमोर केवळ उपचाराच्या महागड्या खर्चाचा प्रश्न नसतो, तर मुंबईसारख्या खर्चिक शहरात राहण्या-खाण्यापासूनची चिंता असते. कॅन्सरग्रस्तांना मदतीसाठी अनेक संस्था कार्यरत असल्या, तरी त्यांची माहिती किंवा त्या सोयी मिळवणेही तितके सोपे नसते. मग अशा वेळी धर्मादाय न्यास, परोपकारी संस्था, देणगीदार यांच्यामार्फत रुग्णांचे राहणे, उपचाराचा खर्च उचलला जातो. यावेळी रुग्ण आणि दाते यांच्यातील समन्वयक म्हणून संदीप हे काम करत असतात. रुग्णाची निकड, त्याची आर्थिक स्थिती, त्याला मिळणार्या सरकारी योजना, रुग्ण कोणत्या योजनांमध्ये फिट बसतो, या सर्वांचे गणित जुळवत, ते त्याला योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करतात.
टाटा रुग्णालयातील भल्यामोठ्या रांगा, अनोख्या तपासण्या, सभोवतालचे गंभीर वातावरण, यामुळे रुग्ण आणि त्याचे नातेवाईक पुरते गांगरून जातात. अनेकदा भीतीने उपचार सोडण्याची मानसिकता बळावते. तसेच कॅन्सरच्या निदानासाठी गाठीची शस्त्रक्रिया, ‘केमोथेरपी’, ‘रेडिएशन थेरपी’ यातून रुग्णाचे मानसिक खच्चीकरण होत असते. पण, या सगळ्या चक्रव्यूहात अडकलेला रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांसाठी संदीप यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरते. कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मार्गदर्शन, वाटाड्या, समन्वयक, साहाय्यक अशा नानाविध जबाबदार्या ते अगदी चोखपणे पार पाडत असतात.
संदीप खरात हे ‘शांतिलाल संघिवी फाऊंडेशन’मध्ये ‘रुग्ण साहाय्यक’ म्हणून कार्यरत आहेत. ही संस्था टाटा रुग्णालयाशी जोडलेली आहे. त्यामुळे संदीप हे टाटा रुग्णालयातच रुग्णसेवेसाठी ठाण मांडून असतात. सुरुवातीला ते कॅन्सरग्रस्त लहान मुलांसाठी काम करायचे. पण, आता ते प्रौढांसाठी काम करतात. सेवाभावी कामाचा त्यांच्यापाशी गाढा अनुभव आहे.
नोकरी जरी आठ तासांची असली, तरी २४ तास खांद्यावर रुग्णांची जबाबदारी असते. रात्री-अपरात्री अचानक रुग्णाच्या नातेवाईकांचा फोन मदतीसाठी खणखणतो. मग कॉलवर कॉल डायल करून रुग्णाला मदत मिळवून देईपर्यंत त्यांचे कर्तव्य संपत नसते. कुणी उपचारासाठीच्या मदतीची याचना करतो. मग त्याला कोणत्या संस्थांमार्फत मदत मिळवून देता येईल, याची गणिते मनोमनी जुळवली जातात. कोणाचा मुंबईत राहण्याचा प्रश्न असतो. मग सेवाभावी संस्था, देणगीदार यांचा माग घेऊन त्यांचा राहण्याचा प्रश्न सोडवला जातो. असे दिवसभराचे २४ तासही त्यांच्या कामाला अपुरे पडतात.
टाटा रुग्णालयात आल्यापासून ते कॅन्सरमुक्त होईपर्यंत रुग्ण आणि संदीप यांच्यात नात्याची घट्ट नाळ जुळते. ‘फायनल फॉलोअप’साठी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर रुग्ण आपल्याला भेटायला येतो, तेव्हा त्याच्या चेहर्यावरचा कॅन्सरमुक्ततेचा आनंद पाहून मनाला सुखद धक्का बसत असल्याचे संदीप सांगतात. "टाटा रुग्णालयात यशस्वी उपचार घेतल्यानंतर आजवर देशभरातील अनेक रुग्ण कॅन्सरमधून पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांचे अधूनमधून फोनही येत असतात. त्यांपैकी कुणी आपले आभार मानतात. कोणाची लग्नगाठ जुळल्याने त्याच्या आमंत्रणासाठी फोन करतात. कुणाला पुत्ररत्नाचा लाभ झाल्याने आनंद आपल्यासोबत शेअर करत असतो. कोणाच्या डोक्यावर पुन्हा केस उगवल्याने तो त्याचे फोटो पाठवतो. हे सारे ऐकून, पाहून खूप छान वाटते. यातून आपण जे काम करत आहोत, त्याचे समाधान मिळते,” असे सांगताना संदीप यांना भरून आले.
"तुमच्या रूपात मला या रुग्णालयात देव भेटला; तुमचे हे ऋण मी या जन्मी तर कधीच फेडू शकणार नाही,” असे एक रुग्ण बोलून गेला होता. या एका वाक्यातच संदीप यांच्या कामाची पोचपावती आहे.
लेखक- रोहित गुरव