चाळीस वर्षांच्या पुरुषाने आणि त्याच्या पत्नीने मिळून १२ वर्षांच्या जरवीया परवेझचे अपहरण करुन तिचे धर्मांतरण केले आणि अपहरण करणार्याने तिच्याशी ‘निकाह’ केला. तिने विरोध करू नये म्हणून तिच्या घरातल्यांना मारून टाकण्याची धमकी दिली गेली. याबाबत गुन्हा दाखल झाला. प्रकरण कोर्टात गेले. गुन्ह्याविरोधात साक्षीदारांनी साक्ष दिली. मात्र, न्यायालयाने निकाल दिला की, "साक्षीदार दबावाखाली साक्ष देत आहेत, म्हणून न्यायालय हे प्रकरण फेटाळून लावत आहे.’‘ १२ वर्षांच्या मुलीचे मियाँ-बीवी दोघे मिळून अपहरण करतात आणि बीवी त्या निष्पाप अबोध मुलीचा ‘निकाह’ तिच्या ‘शोहर’शी लावून देते. न्यायव्यवस्थाही अत्याचारांच्या सोबत! ही घटना आहे, अर्थातच पाकिस्तानची आणि तीही याच महिन्यातली, नोव्हेंबर २०२६ची. जिनाला तिथे ‘कायदे आझम’ म्हणतात, तर त्या ‘कायदे आझम’चा भारतापासून वेगळे होण्याचा अट्टाहास यासाठीच होता का?
पाकिस्तानमध्ये हे असे घडणे नवीन नाहीच म्हणा. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. ऑक्टोबर २०२६ मध्ये रूपा आणि सीता या अनुक्रमे १३-१४ वर्षांच्या बहिणींचे अपहरण करून जबरदस्तीने मुस्लीम पुरुषाशी त्यांचा ‘निकाह’ लावणे असू दे की, १४ वर्षांच्या बिंदियाचे धर्मांतरण करून जुलमाने तिचा ‘निकाह’ लावणे असू दे, पाकिस्तानमध्ये ‘निकाह जिहाद’ सुरूच आहे.
पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हक्क संस्था ‘सेंटर फॉर सोशल जस्टिस’ने नोव्हेंबर २०२६ मध्ये जारी केलेल्या अहवालानुसार, जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ दरम्यान किमान ८४ अल्पसंख्याक मुलींचे अपहरण व सक्तीने ’निकाह’ करण्यात आला. यामध्ये ४९ ख्रिश्चन आणि ३५ हिंदू मुलींचा समावेश आहे. अपहरण करणे, जबरदस्ती त्यांच्याशी ‘निकाह’ करून त्यांचे लैंगिक शोषण करणे, हे पाकिस्तानमध्ये केवळ गैरमुस्लीम बालिका, मुली, महिलांसोबतच होते. मात्र, त्यामुळे पाकिस्तानातील मुस्लीम महिलांसोबत खूप काही चांगले घडते, असे नाही. पाकिस्तानमधील बाल व महिला हक्क संस्था ‘साहिल’च्या ताज्या अर्धवार्षिक अहवालानुसार (जानेवारी ते जून २०२६), केवळ सहा महिन्यांत लिंगाधारित हिंसाचाराच्या ३ हजार १७२ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. या सहा महिन्यांत ६४४ महिलांची हत्या झाली; तर ५१४ महिलांचा अमानुष शारीरिक छळ करण्यात आला. जानेवारी ते जून २०२६ दरम्यान ४६२ महिला व मुलींचे अपहरण झाले असून, २८० बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ‘कुटुंबाच्या प्रतिष्ठे’च्या नावाखाली सहा महिन्यांत किमान १३२ महिलांची हत्या करण्यात आली.
विशेष म्हणजे, पाकिस्तानमध्ये महिला स्वतःच्या घरातच सर्वाधिक असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. या अहवालानुसार, यातील ५४ टक्के गुन्हे पीडित महिलांच्या स्वतःच्या घरातच घडले आहेत; तर ७१ टक्के प्रकरणांमध्ये गुन्हेगार हे पती, वडील, भाऊ किंवा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. याअनुषंगाने नोव्हेंबर २०२६ साली प्रसिद्ध पाकिस्तानी टीव्ही अँकर राबिया अहसान हिची तिच्याच घरी तिच्या पतीने गोळी झाडून हत्या केली. याच महिन्यात कराचीत कौटुंबिक वादातून पतीने २२ वर्षीय पत्नी मिस्बाह हिची गोळ्या झाडून हत्या केली, तर तक्षशिला येथे १३ लाख ‘फॉलोअर्स’ असलेल्या २८ वर्षीय ‘टिकटॉक स्टार’ शाम्सा हिची सोशल मीडियावर काम करते म्हणून तिच्याच वडिलांनी आणि भावांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. महिलांचा जीव घेण्यासाठी पाकिस्तानमध्ये कोणतेही कारण पुरेसे होते. कारण नसेल तर आपली आवड म्हणूनही मारल्याच्या घटना इथे घडत असतात. त्यामुळेच तर महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित देशांच्या यादीमध्ये पाकिस्तानचे नाव आघाडीवर आहे.
‘भिकारी’ म्हणून जगभर ख्याती पावलेल्या पाकिस्तानची ‘महिलांसाठी असुरक्षित देश’ म्हणून ओळख दृढ झाली आहे. मात्र, याबद्दल लाजबीज वाटणे किंवा अपराधी भाव निर्माण होणे, हे पाकिस्तानच्या संस्कृतीतच नाही. पाकिस्तानमध्ये महिलांची ही स्थिती पाहून वाटते, यांना कधी आझादी मिळणार? असो. यावरून जंतरमंतरवर अश्लील हावभाव करत, आझादी मागणार्यांची आठवण आली. भारतीय संस्कृतीपासून, देशापासून आझादीबिझादी मागणार्यांनी खरेच पाकिस्तानमध्ये जावे, असा प्रेमाचा सल्ला आहे. तिथेच त्यांना खास पाकिस्तानी आझादी मिळेल, हे नक्की!