मुंबई (3 Tesla MRI in Mumbai Hospitals) : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम, आधुनिक आणि दर्जेदार बनविण्याच्या दृष्टीने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. मुंबई सेंट्रल येथील बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच परळ येथील के. ई. एम. रुग्णालयात अत्याधुनिक ३ टेस्ला (3 Tesla) एमआरआय मशीन सुविधांचे लोकार्पण महापौर मा. रितू तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या अत्याधुनिक एमआरआय यंत्रणेमुळे मेंदू, मज्जासंस्था, मणका, सांधे, रक्तवाहिन्या तसेच शरीरातील विविध गुंतागुंतीच्या आजारांचे अधिक स्पष्ट, अचूक आणि सखोल निदान करणे शक्य होणार आहे. आजाराचे स्वरूप आणि तीव्रता अधिक प्रभावीपणे समजण्यास मदत होणार असून, त्यानुसार उपचारांची दिशा निश्चित करणे आणि रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध करून देणे अधिक सुलभ होणार आहे. (3 Tesla MRI in Mumbai Hospitals)
मुंबई महानगरपालिकेच्या नायर आणि केईएम या दोन प्रमुख रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि मध्यमवर्गीय रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये मोठा खर्च करण्याऐवजी महापालिकेच्या रुग्णालयांमध्येच आधुनिक निदान सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही रुग्णाला अत्याधुनिक तपासणी आणि उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे. याशिवाय, या सुविधांचा लाभ वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठीही होणार आहे. (3 Tesla MRI in Mumbai Hospitals)
यावेळी मुंबईच्या महापौर मा. रितू तावडे, 'सार्वजनिक आरोग्य समिती'चे अध्यक्ष हरिष भांदिर्गे, स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षा यामिनी जाधव, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांच्यासह संबंधित वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजी विभागातील डॉक्टर, वैद्यकीय व तांत्रिक पथक तसेच महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. (3 Tesla MRI in Mumbai Hospitals)
"मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक, दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आजच्या वैद्यकीय क्षेत्रात अचूक निदान हे प्रभावी उपचारांचे पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. ३ टेस्ला एमआरआय मशीनमुळे गंभीर तसेच गुंतागुंतीच्या आजारांचे अधिक अचूक निदान करणे शक्य होणार असून, रुग्णांना योग्य उपचार वेळेत मिळण्यास मदत होईल. -'सार्वजनिक आरोग्य समिती'चे अध्यक्ष हरिष भांदिर्गे. (3 Tesla MRI in Mumbai Hospitals)
महापौर मा. रितू तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. महापालिकेच्या रुग्णालयांचा दर्जा उंचावणे, वैद्यकीय सुविधांचे आधुनिकीकरण करणे आणि सामान्य मुंबईकरांना परवडणारी व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, हेच आमचे ध्येय आहे. (3 Tesla MRI in Mumbai Hospitals)
या महत्त्वपूर्ण सुविधांच्या उपलब्धतेसाठी योगदान देणारे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक, रेडिओलॉजी विभागातील डॉक्टर, वैद्यकीय व तांत्रिक पथक तसेच महानगरपालिका प्रशासनाचे यावेळी मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. (3 Tesla MRI in Mumbai Hospitals)
सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांच्या पुढाकाराने महापालिका रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय निदान सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून नागरिकांना अधिक सक्षम, सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा उपक्रम निश्चितच मैलाचा दगड ठरणार आहे. (3 Tesla MRI in Mumbai Hospitals)