मुंबई मेट्रो-३ ने गाठला ८ कोटी प्रवासांचा टप्पा!

मुंबईकरांचा ॲक्वा लाईनवर वाढता विश्वास; दररोज ३३७ फेऱ्यांमधून अधिक वेगवान प्रवास


Mumbai Metro 3 Aqua Line 8 Crore Trips
 
मुंबई, (Mumbai Metro 3 Aqua Line 8 Crore Trips) :मुंबई मेट्रोच्या ॲक्वा लाईन अर्थात मेट्रो मार्गिका ३ ने प्रवासी संख्येत नवा विक्रम नोंदवला आहे. या मार्गिकेवरून आतापर्यंत ८ कोटींहून अधिक प्रवास पूर्ण झाले असून, मुंबईकरांच्या वाढत्या विश्वासाचे हे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. गुरुवार, दि. 19 सोशल मीडियावरून त्यांनी ही माहिती देत मुंबईकरांचे आभार मानले.
 
‘८ कोटींहून अधिक प्रवास... एक मुंबई... आणि विश्वासाचा अखंड प्रवास!’ अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेट्रो-३ च्या यशाचा गौरव केला. मुंबईकरांनी ॲक्वा लाईनला आपल्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग बनवले असून, शाश्वत सार्वजनिक वाहतुकीला दिलेली पसंती मुंबईच्या भविष्याला नवी दिशा देत असल्याचे त्यांनी नमूद केले.(Mumbai Metro 3 Aqua Line 8 Crore Trips)
 
प्रवासीसंख्येनुसार फेऱ्यांमध्ये वाढ
 
ॲक्वा लाईनवरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ केली आहे. सोमवारपासून कामकाजाच्या दिवशी ४६ अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्याने दैनंदिन फेऱ्यांची संख्या २९१ वरून ३३७ झाली आहे. गर्दीच्या वेळेत दोन मेट्रो गाड्यांमधील अंतर ४ मिनिटे ५० सेकंदांवरून ४ मिनिटे २५ सेकंद करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी होऊन गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.(Mumbai Metro 3 Aqua Line 8 Crore Trips)
 
टप्प्याटप्प्याने वाढली मेट्रोची वारंवारता
 
आरे-जेव्हीएलआर ते कफ परेड या संपूर्ण मार्गावर सेवा सुरू झाल्यानंतर मेट्रोच्या दैनंदिन फेऱ्यांची संख्या २७१ करण्यात आली होती. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानुसार २३ जून २०२६ रोजी ही संख्या २८२, तर २८ सप्टेंबर २०२६ रोजी २९१ करण्यात आली. आता आणखी ४६ फेऱ्यांची भर पडल्याने कामकाजाच्या दिवशी फेऱ्यांची संख्या ३३७ वर पोहोचली आहे.
 
३३.५ किमीचा भूमिगत मार्ग
 
मुंबई मेट्रो-३ हा ३३.५ किलोमीटर लांबीचा बहुतांश भूमिगत मार्ग असून, कफ परेड ते आरे-जेव्हीएलआर दरम्यान २७ स्थानकांद्वारे दक्षिण मुंबई, मध्य मुंबई आणि उपनगरांना जोडतो. या मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद, आरामदायी आणि सुलभ होत आहे.(Mumbai Metro 3 Aqua Line 8 Crore Trips)
 
‘मुंबईकरांनी मेट्रोवर विश्वास दाखवला आहे. वेगवान, सोपा आणि अधिक चांगला प्रवास... मुंबई मिनिटांत गाठण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात येत आहे,’ असा संदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. वाढत्या प्रवासीसंख्येसोबत मेट्रो सेवांच्या वारंवारतेत करण्यात आलेली वाढ मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ॲक्वा लाईनचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरत आहे.(Mumbai Metro 3 Aqua Line 8 Crore Trips)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर