मुंबई-वाढवण जोडणी अधिक सक्षम होणार; ३१ किमी ‘पाताल लोक’ बोगद्याचे सादरीकरण


Mumbai Infrastructure Projects
 
मुंबई, (Mumbai Infrastructure Projects) :मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक वेगवान आणि अखंड करण्याच्या दृष्टीने दोन महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-वरळी सागरी सेतू ते बीकेसी, मुंबई विमानतळाचे टर्मिनल-२ आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडणाऱ्या एकात्मिक रस्ता बोगदा प्रणालीचा (पाताल लोक) तसेच भाईंदर/उत्तन ते विरार या प्रस्तावित सागरी मार्गाचा सुधारित आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केला.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या शासकीय निवासस्थानी या दोन्ही प्रकल्पांसंदर्भात बैठक झाली. मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी या प्रकल्पांच्या आरेखनावर आणि जोडणीच्या पर्यायांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. एमएमआरडीएने सादर केलेल्या एकात्मिक रस्ता बोगदा प्रणालीचा एका दिशेचा मार्ग सुमारे ३१ किलोमीटरचा प्रस्तावित आहे. या बोगदा प्रणालीच्या माध्यमातून वांद्रे-वरळी सागरी सेतू, बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानक, धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई विमानतळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना प्रवेश आणि निर्गमन मार्गांद्वारे जोडण्याचे नियोजन आहे.(Mumbai Infrastructure Projects)
 
या प्रकल्पामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांमधील प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच बीकेसी आणि विमानतळाला थेट जोडणी मिळणार आहे. शहरातील प्रमुख वाहतूक मार्गांवरील ताण कमी करण्यासाठी आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये अखंड संपर्क निर्माण करण्यासाठी ही बोगदा प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे. मुंबई-वाढवण द्रुतगती मार्ग जोडणीच्या दृष्टीने भाईंदर/उत्तन ते विरार सागरी सेतू प्रकल्पाला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाच्या सुधारित आराखड्यासंदर्भात मार्गाच्या आरेखनाचे दोन पर्याय बैठकीत सादर करण्यात आले. या पर्यायांचा विचार करून मुंबई महानगर प्रदेशातील प्रस्तावित रिंगरोडची जोडणी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली.
 
मुंबई ते वाढवणदरम्यानच्या द्रुतगती जोडणीला बळकटी देणारा हा मार्ग भविष्यात महानगर प्रदेशातील वाहतुकीच्या पर्यायी मार्गांच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबईतील विविध भागांमधील प्रवासाचा वेळ कमी करण्यासह महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेवरील वाढता ताण कमी करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांकडे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा म्हणून पाहिले जात आहे.(Mumbai Infrastructure Projects)
 
बैठकीला नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक व गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आदी उपस्थित होते.(Mumbai Infrastructure Projects)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर