
मुंबई, (Marine Courses in Sindhudurg ITIs) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाज बांधणी उद्योग आणि बंदर विकासाच्या माध्यमातून भविष्यात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी स्थानिक युवक-युवतींना मिळाव्यात, यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) ‘मरीन इंजिन फिटर’ आणि ‘मरीन फिटर’ हे दोन नवीन ट्रेड सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
जिल्ह्यातील आयटीआय संस्थांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन या अभ्यासक्रमांच्या प्रारंभाबाबत चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात चार तालुक्यांमध्ये हे अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन असून, त्यासाठी तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री राणे यांनी दिले. जिल्ह्यातील आठ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून याच वर्षी हे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.(Marine Courses in Sindhudurg ITIs)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाज बांधणी उद्योग, बंदर विकास आणि सागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांमुळे भविष्यात कुशल मनुष्यबळाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक युवकांना आवश्यक तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण जिल्ह्यातच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रशिक्षणामुळे खासगी व सरकारी शिपयार्ड, बंदरे, मर्चंट नेव्ही, ऑइल आणि गॅस प्रकल्पांमध्ये स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिकारी प्रतिभा चव्हाण, भूषण सोनवडेकर आदी उपस्थित होते.(Marine Courses in Sindhudurg ITIs)