भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘जनजाती गौरव सप्ताह’ देशभरात साजरा केला जातो. यानिमित्ताने ब्रिटिशांशी निकराने लढा देणार्या जनजाती क्रांतिकारकांच्या शौर्याचे स्मरण करणे, हे क्रमप्राप्त. छत्तीसगढमधील बस्तरच्या ‘भूमकाल’ आंदोलनाचे नायक म्हणून ओळखले जाणारे वीर गुण्डाधूर हे त्यापैकीच एक. त्यांची ही वीरगाथा...
बस्तरच्या जंगलांमध्ये इंग्रजांच्या सैन्याला सुरक्षितपणे वावरता येणेही कठीण झाले होते. कुठे पोलीस चौक्यांवर हल्ले होत होते, तर कुठे सरकारी कार्यालये आणि बाजारपेठांना लक्ष्य केले जात होते. तीर-कमान, फरसा आणि भाले अशा पारंपरिक शस्त्रांनी सज्ज असलेले आदिवासी लढवय्ये बंदूकधारी इंग्रज सैनिकांचा सामना करत होते. या संघर्षाच्या केंद्रस्थानी एक असे व्यक्तिमत्त्व होते, ज्याचा इंग्रज बराच काळ शोध घेत राहिले. मात्र, त्यांना त्याला पकडण्यात यश आले नाही. ते व्यक्तिमत्त्व म्हणजे गुण्डाधूर! १९१० मध्ये बस्तरमध्ये झालेल्या ‘भूमकाल’ आंदोलनाचे हे नायक, आजही आदिवासी समाजाच्या लोकगीतांमधून आणि लोककथांमधून स्मरणात आहेत.
‘भूमकाल’ आंदोलनाची पार्श्वभूमी बस्तरमधील तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि इंग्रज प्रशासनाच्या धोरणांमध्ये दडलेली होती. १८८१ मध्ये लाल कालेंद्र सिंह यांची बस्तरच्या दिवाणपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, १८८६ मध्ये त्यांना या पदावरून हटविण्यात आले. १८९१ मध्ये राजा भैरम देव यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी रुद्र प्रताप देव अल्पवयीन होते. या परिस्थितीचा फायदा घेत बस्तरच्या प्रशासनातील इंग्रजांचा हस्तक्षेप वाढत गेला. पुढील काळात दिवाण पंडा बैजनाथ यांच्या प्रशासनाविषयी आदिवासी समाजातील असंतोषही अधिक तीव्र होत गेला.
इंग्रजांच्या धोरणांचा थेट परिणाम आदिवासींच्या जीवनावर होत होता. १९०५ मध्ये वसाहतवादी सरकारने बस्तरमधील जवळपास दोन तृतीयांश जंगल आरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे जंगलात राहणार्या समुदायांचे शेती, शिकार आणि वनउपज गोळा करण्याचे पारंपरिक अधिकार हिरावले जाण्याचा धोका निर्माण झाला. काही गावांना जंगलात राहण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, त्यासाठी तेथील रहिवाशांनी वन विभागासाठी विनामोबदला काम करण्याची अट घालण्यात आली. वाढीव कर, वेठबिगारी आणि सरकारी अधिकार्यांची मनमानी, यामुळे लोकांमधील असंतोष आणखी वाढला. १८९९-१९०० आणि १९०७-१९०८ या काळातील दुष्काळानेही जनतेच्या अडचणींमध्ये भर घातली होती.
या परिस्थितीत इंग्रजी सत्तेविरुद्धचा प्रतिकार संघटित होऊ लागला. लाल कालेंद्र सिंह यांचे नाव या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्णरीत्या पुढे येते. इंग्रजांच्या हस्तक्षेपाविरुद्ध लोकांना एकत्र आणण्यात त्यांनी भूमिका बजावली. या आंदोलनात ‘धुरवा’ जमातीचे गुण्डाधूर एक महत्त्वाचे नेतृत्व म्हणून पुढे आले. गुण्डाधूर यांचा संबंध बस्तरमधील नेतानार गावाशी आणि ‘धुरवा’ जनजातीशी होता. स्थानिक लोकश्रुतींनुसार, नेतानारमधील चायंकुर पारा हे त्यांचे जन्मस्थान मानले जाते. गुण्डाधूर यांच्या शौर्याविषयी बस्तरमध्ये अनेक कथा प्रचलित आहेत. काहींच्या मते, त्यांना हवेत उडण्याची शक्ती प्राप्त होती; तर काहींचा असा विश्वास होता की, ते आपल्या जादूने इंग्रजांच्या बंदुकीतील गोळ्यांचे पाण्यात रूपांतर करू शकत असत. ‘एनसीईआरटी’च्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातही गुण्डाधूर यांच्या उडून निसटून जाण्याशी संबंधित लोककथेचा उल्लेख आढळतो. या दंतकथांपलीकडे त्यांच्या नेतृत्वाचे खरे वैशिष्ट्य आंदोलनाची पूर्वतयारी आणि लोकांना संघटित करण्याच्या क्षमतेत दिसून येते.
‘भूमकाल’ आंदोलनाच्या तयारीसाठी संदेश पाठविण्याची पद्धतही विशेष उल्लेखनीय होती. आंब्याच्या फांद्यांना लाल मिरच्या बांधून गावोगावी गुप्त संदेश पोहोचवले जात असत. या पद्धतीला ‘डारा-मिरी’ असे म्हटले जात असे. ज्या गावात हा संदेश पोहोचत असे, तेथील लोक आंदोलनाच्या तयारीला लागत असत. १८५७च्या स्वातंत्र्यसमरात चपाती आणि कमळाच्या माध्यमातून संदेश पोहोचविल्याची चर्चा होते. त्याचप्रमाणे बस्तरमध्ये ‘डारा-मिरी’ने गावागावांतील संपर्क प्रस्थापित करून लोकांना एकत्र आणण्याचे काम केले.
फेब्रुवारी १९१० मध्ये ‘भूमकाल’ आंदोलनाने उघड स्वरूप धारण केले. दि. २ फेब्रुवारी रोजी पुसपाल बाजारात मध्यस्थ व्यापार्यांच्या दुकानांची लूट झाल्याची घटना नोंदवली गेली आहे. त्यानंतर आंदोलनाचा विस्तार वेगाने झाला. सरकारी आस्थापने, पोलीस चौक्या आणि प्रशासनाशी संबंधित व्यक्तींना लक्ष्य केले जाऊ लागले. बाजारपेठांवर आणि काही सरकारी इमारतींवरही हल्ले झाले. इंग्रजी शासनाच्या धोरणांशी संबंधित मध्यस्थ आणि व्यापार्यांविरुद्धही आंदोलनकर्त्यांचा संताप दिसून येत होता.
दि. १० फेब्रुवारीच्या सुमारास या उठावाने आणखी व्यापक स्वरूप धारण केले. केसलूर, टोकापाल आणि आसपासच्या भागांतील सरकारी आस्थापनांवर हल्ले करण्यात आले. दुर्गम गावांमध्ये आपले नियंत्रण कायम राखणे इंग्रज प्रशासनासाठी कठीण होऊ लागले होते. जगदलपूरचा अपवाद वगळता, बस्तरमधील अनेक भागांतील प्रशासनाची पकड कमकुवत झाली होती. दि. १६ फेब्रुवारी १९१० रोजी इंद्रावती नदीच्या घाटावर इंग्रज सैन्य आणि आंदोलनकर्त्यांमध्ये भीषण संघर्ष झाला. ही घटना ‘खडगघाटची लढाई’ म्हणून ओळखली जाते. या चकमकीत अनेक आदिवासी लढवय्ये मारले गेले. काही आंदोलनकर्ते तेथून बचाव करून उलनार आणि नेतानारच्या दिशेने निघून गेले. भारत सरकारने प्रकाशित केलेल्या ‘शहीदों के शब्दकोश’मध्ये या घटनेचा उल्लेख आढळतो.
दि. २५ फेब्रुवारी १९१० रोजी इंग्रज सैन्याने उलनार टेकडीला वेढा घातला. तेथे आंदोलनकर्ते एकत्र जमल्याची माहिती इंग्रजांना मिळाली होती. रात्रीच्या वेळी सैन्याने संपूर्ण टेकडीला चारही बाजूंनी घेरून कारवाई केली. मोठ्या संख्येने आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. अटक झालेल्यांमध्ये भद्रू यांचाही समावेश होता. पुढे त्यांना कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि रायपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले.
या संघर्षाशी संबंधित आणखी एक प्रसंग प्रचलित आहे. कॅप्टन गेयर यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावताना, त्यांना विश्वास देण्यासाठी मातीची शपथ घेतल्याचा उल्लेख आढळतो. या आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलनकर्ते एकत्र जमले. मात्र, त्यानंतर इंग्रज सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केला, असे सांगितले जाते. याचप्रमाणे उलनार येथील सोनू माझी यांनी आंदोलनकर्त्यांना भोजन दिले आणि त्यानंतर त्यांच्या ठिकाणाची माहिती इंग्रजांना दिली, अशी कथाही प्रचलित आहे.
इंग्रजांच्या या कारवाईमुळे आंदोलनाचे मोठे नुकसान झाले. मात्र, तरीही गुण्डाधूर त्यांच्या हाती लागले नाहीत. त्यांचे अनेक सहकारी पकडले गेले. इंग्रज अधिकारी त्यांचा शोध घेत राहिले; परंतु त्यांचा ठावठिकाणा त्यांना कधीच समजू शकला नाही. ‘भूमकाल’ आंदोलन दडपण्यासाठी इंग्रजांनी कठोर कारवाई केली. अनेक आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर खटले चालविण्यात आले. जगदलपूरच्या गोलबाजारातील चिंचेच्या झाडाचा संबंध क्रांतिकारकांना फाशी देण्याच्या घटनेशी स्थानिक स्मृतींमध्ये जोडला जातो. ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा’च्या अभ्यास-साहित्यातही या घटनेचा उल्लेख आढळतो.
या आंदोलनाचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे, जंगलांना आरक्षित वनक्षेत्र घोषित करण्याच्या योजनेला तात्पुरती स्थगिती मिळाली आणि आरक्षित करण्यात येणार्या वनक्षेत्राचे प्रमाण आधीच्या प्रस्तावाच्या तुलनेत जवळपास निम्म्यावर आणण्यात आले. अशा प्रकारे इंग्रजांनी लष्करी कारवाई करून उठाव दडपला खरा. मात्र, त्यांना आपल्या वनधोरणात बदल करणेही भाग पडले. गुण्डाधूर यांचे नाव इंग्रजांच्या अधिकृत अभिलेखांमध्ये फारसे आढळत नसले, तरी बस्तरमधील गावागावांत त्यांच्या शौर्याच्या कथा आजही सांगितल्या जातात. नेतानार आणि आसपासच्या परिसरात त्यांचे विशेष आदराने स्मरण केले जाते. बस्तरमध्ये दरवर्षी १० फेब्रुवारी रोजी ‘भूमकाल दिवस’ साजरा केला जातो. ही तारीख आंदोलनाच्या स्मृतीशी जोडलेली आहे.
२०१४ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राजपथावर सादर करण्यात आलेल्या छत्तीसगढच्या चित्ररथातही गुण्डाधूर यांना प्रमुख स्थान देण्यात आले होते. या चित्ररथाची संकल्पना ‘बस्तरचे भूमकाल आंदोलन’ ही होती. त्यातून आदिवासी समाजातील या महानायकाची आणि इंग्रजी राजवटीविरुद्ध झालेल्या संघर्षाची ओळख संपूर्ण देशासमोर मांडण्यात आली.