
मुंबई (विशेष प्रतिनिधी ) - Bandhu Maitreya Marathi मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एकीकडे नव्या चित्रपटांची रेलचेल पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांवरून पुन्हा एकदा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. आज पुन्हा तब्बल पाच मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर एक चित्रपट पुढे गेला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही एकाच दिवशी पाच मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याचा प्रयोग झाला होता. मात्र, त्या चित्रपटांना अपेक्षित व्यावसायिक यश मिळवता आले नाही. असे असताना निर्माते पुन्हा त्याच मार्गाने का जात आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
बंधू, मैत्रेया , पत्री सरकार, जिजाई आणि चिकिझिंग हे पाच मराठी चित्रपट आज प्रदर्शित झाले आहेत. या पाचही चित्रपटांचे विषय, मांडणी आणि प्रेक्षकवर्ग वेगवेगळा असला, तरी प्रदर्शनाची तारीख एकच असल्याने प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी स्पर्धा करावी लागणार आहे. काही आठवड्यांपूर्वी ऑक्टोबर महिन्यातील एका शुक्रवारी 'दशमी', 'लग्न आणि बरंच काही', 'मॅगझिन', 'कापूसकोंडा' आणि 'मृत्यूचक्र' असे पाच मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. मात्र, या चित्रपटांपैकी कोणत्याही चित्रपटाला अपेक्षित प्रेक्षकसंख्या आणि व्यावसायिक प्रतिसाद मिळवता आला नाही. विशेष म्हणजे, त्याच महिन्यात काही आठवडे एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. म्हणजेच एका बाजूला चित्रपटांच्या प्रदर्शनाची गर्दी, तर दुसरीकडे प्रदर्शनाच्या तारखांमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर, असे विसंगत चित्र पाहायला मिळाले.मग या अनुभवातून निर्मात्यांनी नेमका कोणता धडा घेतला? मराठी चित्रपटसृष्टीत प्रदर्शनाच्या तारखांचे योग्य नियोजन करण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नाही का? की प्रत्येक निर्मात्याला आपलाच चित्रपट योग्य वेळी प्रदर्शित करायचा असल्याने इतर चित्रपटांचा विचार केला जात नाही?Bandhu Maitreya Marathi
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करताना केवळ स्वतःच्या चित्रपटाचा विचार न करता संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचा विचार होणे गरजेचे आहे. एखाद्या शुक्रवारी आधीच दोन किंवा तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार असतील, तर इतर निर्मात्यांनी पर्यायी तारखांचा विचार करणे आवश्यक आहे. यासाठी निर्माते, वितरक, चित्रपट महामंडळ आणि थिएटर व्यावसायिक यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे.Bandhu Maitreya Marathi
यापूर्वी प्रदर्शनाच्या नियोजनाबाबत चित्रपट महामंडळाची भूमिका महत्त्वाची होती. मात्र, सध्या प्रदर्शनाच्या तारखा आणि वितरणाचे नियोजन प्रामुख्याने निर्माते स्वतः करत असल्याने समन्वयाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत आहे. Bandhu Maitreya Marathi