‘सहकारातून समृद्धी’चा मंत्र केवळ प्रौढांसाठीच नव्हे, तर अगदी लहानग्यांसाठीही आयुष्यभराचे वरदान ठरु शकतो, हे सिद्ध केले ते गुजरातच्या ‘बालगोपाल सेव्हिंग्ज अॅण्ड क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ने. २००९ साली लहान मुलांच्या बचतीच्या दृष्टीने स्थापन झालेल्या या संस्थेशी आज ३० हजार मुले जोडलेली असून, ३० कोटींहून अधिकचा बचतीचा डोंगर उभा राहिला आहे. त्यानिमित्ताने सहकार क्षेत्रातील या अभिनव प्रकल्पाची माहिती देणारा हा लेख...
गुजरातने मुलांना त्यांच्या अगदी लहानपणापासून घरगुतीस्तरावर अल्पबचतीची सातत्याने सवय लावून, त्यातून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत प्रोत्साहन देण्याचे फार मोठे काम केले आहे. सुमारे ३० हजार बालकांच्या या लघुबचतीतून जमा झालेल्या ३० कोटींहून अधिक बचत माहात्म्य व त्याच्या यशस्वी प्रयोगाची कहाणी सर्वार्थाने प्रेरक ठरली आहे.
लहानपणी जेव्हा मुलांना फारशी समज नसते, त्याच वेळी उत्तर गुजरातच्या लहानलहान मुलांना त्यांच्या वयानुसार बचतीची सवय आवर्जून लावण्यात आली. यामागे मुख्य उद्देश हा मुलांनी लहानपणापासून पैसा जोडावा व त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात व्हावा, असा दुहेरी प्रकारचा आहे. लहान मुलांच्या या लहान स्वरूपातील व अभिनव उपक्रमातून सुमारे ३० कोटींची बचत होऊ शकते, ही बाबच या अल्पबचतीचे मोठे माहात्म्य स्पष्ट करते. या योजनेमध्ये सहभागी झालेल्या बालकांची संख्या ही ३० हजारांवर पोहोचली आहे, हे विशेष.
या अभिनव उपक्रमाची सुरुवात सुमारे १६ वर्षांपूर्वी अश्विन पटेल यांनी केली. सहकारी तत्त्वावर आधारित व बचतीवर भर देणार्या या उपक्रमात लहान मुलांना व त्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत सहभागी होता येईल, अशी अट योजनेच्या सुरुवातीपासूनच ठेवण्यात आली. या आधारे व गावातील महिला-पुरुष व शेतकरी जर सहकारी तत्त्वावर काम करण्यासाठी छोट्या आर्थिक रकमेतून मोठी उलाढाल करू शकतात, तर त्यांच्याच गावातील मुले तसे का करू शकणार नाहीत, या प्रश्नातून या उपक्रमाचे उत्तर सापडते.
याच भूमिकेतून अश्विन पटेल यांच्या पुढाकाराने ‘बालगोपाल सेव्हिंग्ज अॅण्ड क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ या नावाने दि. ३० मे २००९ रोजी गुजरातच्या साबरकाठा जिल्ह्यातील जवानपुरा या गावी करण्यात आली. सुरुवातीला या सहकारी बचत संस्थेेत सुमारे १०० मुले सहभागी झाली होती. आज सुमारे ३७० गावांतील लहान मुले या सहकारी उपक्रमात सहभागी झाली आहेत.
यातून आज ‘बालगोपाल सेव्हिंग्ज अॅण्ड क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ने गुल्लकमधील बचतीपासून गावातील अनेक घरांमधील लहान मुलांना बचतीची सक्रिय प्रेरणा दिली आहे. मुख्य म्हणजे, लहान मुलांनी सहकारी प्रयत्नातून उभ्या केलेल्या या रकमेतून पुढे विद्यार्थ्यांच्या शालेय व शैक्षणिक गरजांच्या पूर्ततेसाठी उपयोग केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक अशा लॅपटॉपची खरेदी, पुस्तकांची खरेदी, संदर्भ ग्रंथ, शैक्षणिक शुल्क, प्रवेश रकमेची पूर्तता करणे इत्यादीचा समावेश करण्यात येतो. याशिवाय, काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या बालपणात केलेल्या जमा रकमेचा उपयोग चक्क ‘एमबीबीएस’सारख्या उच्च अभ्यासक्रमातील प्रवेशासाठीसुद्धा केला आहे.
आपल्या या ग्रामीण भागातील ‘बालगोपाल बचत’ उपक्रमाचा आढावा घेताना अश्विनभाई पटेल नमूद करतात की, आमच्या उपक्रमाची सुरुवात केवळ १०० बचतकर्त्या बालकांपासून झाली. मात्र, त्यांची हिंमत व बालकांचा उत्साह कायम राहिला. यातून परस्परांना व इतर बालगोपालांना बचतीची प्रेरणा मिळत गेली. फारसा गाजावाजा न करता व्यक्तिगत संपर्क व संवाद याच्याच बळावर हा उपक्रम मोठ्या प्रतिसादासह व इतर गावांमध्ये वाढत गेला.
‘बालगोपाल’ची कार्यपद्धती तशी सुरुवातीपासूनच सरळ-सोपी ठेवण्यात आली आहे. याअंतर्गत दरमहा ठरावीक तारखेला सदस्य बालकांच्या घरी संपर्क केला जातो. त्यावेळी सदस्य बालकाने महिन्याभरात केलेली बचत रक्कम संस्थेच्या संकलन कार्यकर्त्याला देऊन त्याची रीतसर नोंद केली जाते. अशा प्रकारे मासिक संकलन रकमेत सदस्य बालकाला मिळालेले खाऊचे पैसे, भेट रक्कम, त्याची अल्पबचत यांसारख्या रकमेचा समावेश असतो, हे विशेष. यातूनच ग्रामीण बालकांच्या अल्पबचत रकमेतून मोठी रक्कम दरमहा संस्थेतर्फे संकलित केली जाते.
अशा प्रकारे योजनेत सहभागी झालेल्या बालकांची रक्कम दरमहा त्यांच्या वैयक्तिक खात्यात आवर्जून जमा केली जाते. या जमा झालेल्या बचत रकमेवर सदस्य बालकाला सहा टक्के व्याजही दिले जाते व यातूनच बचत रकमेमध्ये सव्याज वाढ होत असते. अशा प्रकारे सदस्याच्या खात्यावर जमा आलेल्या रकमेतून संबंधित सदस्याला त्याच्या शैक्षणिक गरजांच्या आर्थिक पूर्ततेसाठी संस्थेतर्फे राशी तातडीने दिली जाते. आजवर सुमारे एक हजार सदस्य बालकांनी या आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे.
या ‘बालगोपाल’ उपक्रमाच्या संदर्भात प्रामुख्याने उल्लेखनीय म्हणून पलकीन रावल या विद्यार्थिनी सदस्याचा उल्लेख करता येईल. २००९ मध्ये उपक्रमात सहभागी झालेल्या पलकीनने बारावी विज्ञान विषयांसह उत्तीर्ण झाल्यावर आपले पुढील शैक्षणिक शुल्क भरून, त्याशिवाय लॅपटॉप खरेदीसाठी आपल्या अल्पबचत रकमेचा उपयोग करून घेतला. तिच्या वडिलांचे चहाचे छोटेखानी दुकान असल्याने त्यांना आपल्या मुलीचे शिक्षण सहजपणे सुरू ठेवता आले.
‘बालगोपाल’ योजनेमध्ये सुरुवातीपासून सदस्यता घेऊन सातत्याने बचत करणारा सदस्य म्हणून केतुल पटेल याचेही उदाहरण आवर्जून सांगता येईल. वयाच्या १४व्या वर्षी अल्पबचतीसह मासिक बचतीची सवय सातत्याने जपलेल्या केतुलने आपल्या बचतीच्या रकमेचा उपयोग आपल्या इंजिनिअरिंगचे प्रवेश शुल्क भरण्यासाठी केला. त्याशिवाय, उरलेली रक्कम त्याने ‘ठेव’ योजनेमध्ये गुंतवली व इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू असताना येणार्या मासिक खर्चाची तजवीजसुद्धा केली.
‘बालगोपाल सेव्हिंग्ज अॅण्ड क्रेडिट को-ऑपरेटिव्ह’चे कामकाज आणि व्याप मुख्यत: ग्रामीण भागात संपर्क व संवाद याच्या माध्यमातूनच वाढला. संस्थेला त्यासाठी जाहिरात करावी लागली नाही. मुख्य म्हणजे, निर्धारित वयोगटातील म्हणजेच, १८ वर्षांखालील सदस्यांपुरतेच आपले काम कायम ठेवूनपण ‘बालगोपाल’च्या बचत करणार्या बालकांच्या संख्येत घट झाली नाही. ‘बालगोपाल’चे संस्थापक अश्विन पटेल हे या आगळ्यावेगळ्या बाल-बचतीतून साधलेल्या मोठ्या यशाचे श्रेय सदस्यांच्या सातत्याला व परस्पर विश्वासातून साधलेल्या कामगिरीला देतात.
(लेखक एचआर व्यवस्थापक व सल्लागार आहेत.)
लेखक- दत्तात्रय आंबुलकर