अभिनय जगलेला कलाकार

    02-Nov-2026

Sir Patrick Stewart
 
वेध घेणारी भेदक नजर, खर्जात घुमणारा आवाज, वाजवी हालचाली करणारी संयमी देहबोली अन् सोबतच डोक्यावर पडलेले टक्कल ही वाचिक आणि आंगिक अभिनयाची अंगे, हॉलीवूडचे अभिनेते सर पॅट्रीक स्टीवर्ट यांच्या वयस्क भूमिकेची वैशिष्ट्ये! त्यांचा अधिकारवाणीने गर्जणारा आवाज प्रेक्षकांच्या काळजाला हात घाले. संवादफेकीसोबतच त्यांचे शरीरही त्या आवाजाला संथपणे साथ द्यायचे. त्यातून त्या पात्राला एकप्रकारची भावनिक प्रगल्भता, परिपक्वता आणि सहानुभूती लाभत असे. याच कलाकौशल्याच्या बळावर सर पॅट्रीक यांनी थोर नेता, मार्गदर्शक, एखाद्या संस्थेचे प्रमुख अशी प्रगल्भ, अनुभवी, जबाबदार पात्रे साकारली आणि अजरामरही केली. वाढत्या वयासोबतच त्यांचा अभिनयही, अधिकाधिक परिपक्व झाला.
 
‘स्टार ट्रेक’मध्ये त्यांनी साकारलेली कॅप्टन जीन ल्यूक-पिकार्डची भूमिका, प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली. योद्धा आणि मुत्सद्दीपणा यातले अस्पष्ट अंतर त्यांनी, आपल्या अभिनयातून रसिकांना दाखवून दिले. कॅप्टन म्हणून नेतृत्व करताना त्याच्यातील तत्त्वनिष्ठतेला, मुरब्बी नेतृत्वाला त्यांनी पडद्यावर जिवंत केले. त्यामुळेच त्या पात्राला जगाने अक्षरशः डोयावरच घेतले होते.
 
‘एस मेन’ या चित्रपट मालिकेतील प्रोफेसर एस भूमिकेत त्यांना त्यांच्या निसर्गदत्त कलागुणांचा चांगलाच लाभ झाला. ब्रिटिश ढब असलेला भारदस्त आवाज, भेदक डोळे अन् डोयावर पडलेले टक्कल यांमुळे, वास्तवातले पॅट्रीक आणि प्रोफेसर एस यांतील अंतर असून नसल्यासारखेच राहिले. दिव्यांग असलेले प्रोफेसर एस हे समोरच्याचे मन वाचणारे टेलिपॅथ होते. व्हीलचेअरवर बसून खोल, स्थिर नजरेत मन वाचण्याचा भास पॅट्रीक जसाच्या तसा निर्माण करत. हुबेहुब कॉमिक बुकसारख्या नैसर्गिक ‘लुक’ला, त्यांच्या विलक्षण अभिनयाची जोड मिळाल्यावर प्रेक्षकांसमोर उभा राहिलेला प्रोफेसर एस निव्वळ अविस्मरणीय असाच! त्याला कशाचीही तोडच नव्हती.
 
‘रॉयल शेसपिअर कंपनी’ या ब्रिटनमधील प्रतिष्ठित नाट्यसंस्थेतून, पॅट्रीक यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. अभिनयाचे बाळकडू याच संस्थेमध्ये त्यांनी प्राशन केले. मॅकबेथ, किंग लियर, ओथेलो आणि ज्युलियस सीझरसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि ऐतिहासिक पात्रांना त्यांनी आयाम दिले. त्यांनी आपल्या अभिनयाला रंगभूमीपुरतेच मर्यादित ठेवले नाही. सामान्यतः ‘शेसपिअर’चे नाट्य कलाकार, हॉलीवूडच्या व्यावसायिक चित्रपटांमध्ये रमत नाहीत. पण, सर पॅट्रीक यांनी रंगभूमीबरोबरच व्यावसायिक चित्रपटही गाजवले. अगदी दोन जुळ्या भावांच्या सारखेपणाइतकेच, त्यांचे यश दोन्ही आघाड्यांवर मिळते-जुळतेच राहिले.
 
अत्यंत गंभीर आणि शिस्तबद्ध भूमिकांच्या चौकटीबाहेर पडून, सर पॅट्रीक यांनी वेगळ्या धाटणीच्या भूमिकाही उत्तम साकारल्या. ‘ग्रीम रुम’मधील त्यांचा क्रूर, हिंसक, वर्णद्वेषी टोळीचा प्रमुख डार्सी बँकर पाहताना, प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. काही काळ पॅट्रीक यांच्या एकांगी अभिनयाची प्रेक्षकांना झालेली सवयही त्यांनी स्वतःच मोडली. अमेरिकेतील अत्यंत लोकप्रिय टीव्ही मालिका ‘फ्रेझियर’मध्ये, अ‍ॅलिस्टर बर्क नावाच्या एका समलिंगी ऑपेरा दिग्दर्शकाची भूमिकाही त्यांनी गाजवली. या मालिकेत चुकीच्या समजुतीतून घडलेली कॉमेडी प्रेक्षकांना खळखळून हसवून गेली. अत्यंत गंभीर चेहर्‍याने शांतपणे संवादफेक करत, गंभीरतेतूनही विनोदनिर्मितीची प्रचंड ताकद त्यांच्यात होती. प्रेक्षकांना हीच विनोदबुद्धी अधिक भावली.
 
सर पॅट्रीक स्टीवर्ट यांचे वैयक्तिक जीवन विविध कारणांनी गाजले. तीन लग्ने, मुलांशी दुरावा, पहिल्या दोन पत्नींपासून घटस्फोट असे चढ-उतारांनी भरलेल्या आयुष्याची वास्तविकता त्यांनी कधी लपवली नाही. जगातील ताकदीच्या या अभिनेत्याचे नुकतेच निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने अभिनयविश्वातील एका विलक्षण पर्वाचा अस्त झाला. मात्र, त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा काळाच्या ओघातही ताज्या राहतील. प्रत्येक भूमिकेत स्वतःचा ठसा उमटवणार्‍या या अभिनेत्याने अभिनयाच्या शयता किती व्यापक असू शकतात, याचा प्रत्यय दिला. पडद्यावर त्यांनी साकारलेली माणसे कदाचित काल्पनिक होती; पण त्यांच्यातून जागवलेल्या भावना मात्र अस्सल होत्या. म्हणूनच, सर पट्रीक स्टीवर्ट यांचे कलाविश्वातील स्थान अभिनयाच्या इतिहासात अढळ राहील.
 
लेखक- रोहित गुरव




संबंधित मजकूर