अशिक्षित शेतकरी ते ‘कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती’वर सलग सहावेळा बिनविरोध निवडून येणारा एक अद्वितीय नेता, अशी ओळख असलेल्या नाशिकच्या शंकर गोविंद आव्हाड यांच्याविषयी...
नाशिकमधील दोडी बुद्रुक हे छोटेसे गाव. या गावातील गोविंद आणि गोदाबाई हे गरीब शेतकरी वारकरी कुटुंब. गोदाबाई या स्वाभिमानी स्त्री. आपल्या ध्येयासाठी कष्ट कर, पण लाचारी पत्करू नको, हेच बाळकडू त्यांनी मुलांना दिले. याच गुणांच्या जोरावर शंकरने पुढे एक अशिक्षित शेतकरी ते ‘कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती’चा सलग सहावेळा बिनविरोध संचालक होण्याचा विक्रम केला. शंकर यांचा हा प्रवास अचंबित करणाराच!
शंकर यांना चार भाऊ आणि चार बहिणी. शंकर यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड. घरच्या आर्थिक स्थितीमुळे शंकर यांचे मोठे बंधू निवृत्ती यांनी, शंकर यांना अन्य दोन भावांच्या शिक्षणासाठी एकत्रपणे शेती करण्याचा सल्ला दिला. शंकर यांनी ही आज्ञा प्रमाण मानून, पहिलीतच शाळा सोडली. शेतीसाठी आवश्यक भांडवल आणि पैसे मामाकडून व्याजाने घेतले. ते पैसे फेडण्यासाठी शंकर मामाकडे वर्षाला पगारावर कामाला राहिले. पुढे मामाशी बिनसल्याने गावी आले. शेतीवर घर चालेना, म्हणून अधिक पैसे मिळविण्यासाठी विहिरी खोदणे, रस्ता बनवण्याची कामेही त्यांनी घेतली. मात्र हे करताना कुस्तीची आवडही त्यांनी जोपासली. शंकर जबाबदार्या आणि आवड यात समतोल साधत असत. यामुळे त्यांचा मत्सर करणार्या नातेवाईकांची कमी नव्हतीच. त्यांपैकी अनेकांनी कामात खोडा घालण्याचाही प्रयत्न केला. शेती बंद करण्यासाठी शंकर यांना बाहेरगावी पाठविण्याचे त्यांनी ठरवले. त्यामुळे शंकर कल्याणला गेले.
पहिल्यांदाच शहरात आलेल्या शंकरच्या ओळखीचे कोणीही नव्हते. त्यामुळे ते भांबावून गेले. पण, या शहराच्या प्रेमातही पडले. इथेच आपलं भविष्य घडवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अल्पशिक्षणामुळे कोण नोकरी देणार, हा प्रश्न होताच. त्यांनी कल्याण स्थानकाजवळाच्या धान्याच्या दुकानात पोतीवाहक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. परंतु, जुने माथाडी कामगार त्यांना घेण्यास तयार होईनात. शेवटी दाना मार्केटमधील लक्ष्मीचंद देवजी यांच्या दुकानात माथाडी कामगार म्हणून त्यांना काम मिळाले. पुढे कालांतराने शंकर यांनी गावातील पैलवान मित्रांनाही माथाडी कामगार रुजू करून घेतले. सेवाज्येष्ठतेनुसार शंकर त्यांचे मुकादम झाले. इथूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.
एके दिवशी शंकर आणि त्यांचे तीन सहकारी जोशी बागेतून साबुदाण्याचे पोते आणण्यासाठी गेले असता, दुकान न उघडल्याने हातगाडी उभी करून सहकार्यांशी गप्पागोष्टी करू लागले. त्याचदरम्यान तेथे दरारा असलेला एक इसम कानातील मळ काढण्यासाठी त्यांच्या हातगाडीवर बसला. दरम्यान, शंकररावांचा हातगाडीला धक्का लागल्याने, मळ काढणार्याच्या हातातील सुईने इसमाच्या कानातून रक्त येऊ लागले. शंकरराव यांनी माफी मागितली, परंतु तो इसम शंकररावांना मारण्यासाठी धावला. पुढे हे प्रकरण कसेबसे मिटले. पण, यामुळे सर्व व्यापार्यांमध्ये शंकर यांची ओळख निडर माथाडी कामगार अशी झाली, तर कामगारवर्ग शंकर यांच्याकडेे ‘हिरो’ म्हणून पाहू लागला.
मुंबईत माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ‘माथाडी जनरल कामगार युनियन’चे काम जोरावर होते. अण्णासाहेबांच्या कानांवर शंकर यांचे नाव गेले. त्यांनी कल्याणची जबाबदारीच शंकर यांच्यावर सोपवली. शंकर युनियनचे चिटणीस झाले आणि त्यांचा माथाडी कामगार नेता म्हणून उदय झाला. पुढे त्यांची तत्कालीन महाराष्ट्राचे राज्यपालांनी ‘ग्रोसरी बोर्डा’चे संचालक म्हणून नेमणूक केली. त्यावर ते सात वर्षे कार्यरत होते. मुंबई माथाडी कामगारांप्रमाणेच, कल्याणच्या माथाडी कामगारांनाही दहा टक्के पगारवाढ देण्याची विनंती शंकर यांनी कल्याणच्या व्यापार्यांना केली. व्यापारी यासाठी तयार नव्हते.
शंकर यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून, कल्याणमध्ये माथाडी कामगारांचा संप घडवला व दहा दिवस चाललेल्या संप फोडण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले. शेवटी संप चिघळल्याने, बरेच नुकसान झाले. त्यामुळे, व्यापार्यांनीही संप पुकारला. शेवटी ‘होलसेल व्यापारी असोसिएशन’ने, नव्या दमाचे पदाधिकारी निवडले. यामध्ये अध्यक्ष म्हणून नांदुशेठ सोनवणे आणि सरचिटणीस म्हणून विजय पंडित यांची निवड झाली. व्यापारी पदाधिकारी आणि माथाडी पदाधिकार्यांशी चर्चा करून यशस्वी सुवर्णमध्य काढल्याने, शंकर कामगारांमध्ये लोकप्रिय झाले. शिवाय, व्यापार्यांचेही मित्र झाले. विजय पंडित यांच्याशी तर त्यांचे मैत्रच जुळले.
१९९४ मध्ये ‘कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती’च्या नवीन समितीमध्ये, विजय पंडित यांनी माथाडी कामगारांचा प्रतिनिधी म्हणून शंकर यांची शिफारस केली. शंकर पहिल्यांदा ‘कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती’चे संचालक झाले. ते आजवर संचालक म्हणूनच कार्यरत आहेत. सहावेळा ते बिनविरोध निवडून आले आहेत. याव्यतिरिक्त शंकर हे इतर सामाजिक व धार्मिक, सांस्कृतिक संस्थांमध्येही सक्रिय आहेत. गरीब विद्यार्थी, खेळाडू, तसेच रुग्णांना आर्थिक मदत करतात. कल्याणच्या ‘श्री खंडेराय सेवा समिती’चे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. सध्या ते ‘मानव साहाय्यक सेवा मंडळा’चे अध्यक्ष असून, ‘अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती’चेही अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. तसेच ‘पु. ल. कट्टा संस्थे’तही ते कार्यरत आहेत. एवढे करूनही गावातील प्रत्येक उपक्रमांना ते सक्रिय सहकार्य करतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘माथाडी भूषण’, ‘समाज भूषण’, ‘समाज रत्न’सारख्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. शंकर यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ यांच्याकडून शुभेच्छा.