देशातील पहिले रस्ता सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र सासवडमध्ये उभारणार! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून प्रकल्पाची पाहणी; अत्याधुनिक सुविधांसाठी अधिकाऱ्यांना सूचना!
मुंबई (Road Safety Research and Training Centre Saswad) : देशातील पहिले रस्ता सुरक्षा संशोधन व प्रशिक्षण केंद्र सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे येथे उभारण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. केंद्राची उभारणी दर्जेदार, अत्याधुनिक आणि प्रभावी व्हावी, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
या पाहणीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र, स्वयंचलित वाहनचालक चाचणी मार्ग तसेच प्रस्तावित रस्ता सुरक्षा प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या कामांचा आढावा घेतला.
सासवड येथील २५ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे वाहनांची तांत्रिक तपासणी आणि चालकांची चाचणी अधिक पारदर्शक, अचूक व शास्त्रीय पद्धतीने होणार आहे. स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रात संवेदक आणि छायाचित्रण यंत्रणांच्या माध्यमातून वाहनांचे ब्रेक, धक्काशोषक यंत्रणा, दिवे आणि प्रदूषण उत्सर्जन यांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे वाहनांच्या सुस्थिती प्रमाणपत्रासाठी लागणारा वेळ कमी होऊन रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल. (Road Safety Research and Training Centre Saswad)
स्वयंचलित वाहनचालक चाचणी मार्गावर आठच्या आकाराचा मार्ग, एच आकाराचा मार्ग, चढ-उतार आणि वळणांचे मार्ग अशा विविध चाचण्यांद्वारे चालकांच्या कौशल्याचे मूल्यमापन केले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि ध्वनिचित्रफितींच्या विश्लेषणाच्या साहाय्याने या चाचण्या घेतल्या जाणार असल्याने वाहनचालक परवाना देण्याची प्रक्रिया अधिक वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह होईल. (Road Safety Research and Training Centre Saswad)
राज्य रस्ता सुरक्षा प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या माध्यमातून मोटार वाहन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, बदलते मोटार वाहन कायदे, रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढण्यासोबतच रस्ता सुरक्षा विषयक कामकाज अधिक प्रभावी होण्यास मदत होईल.
“रस्ते अपघात कमी करण्यासाठी केवळ नियमांची अंमलबजावणी पुरेशी नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि शास्त्रीय दृष्टिकोन आवश्यक आहे. सासवड येथील हे केंद्र देशासाठी आदर्श ठरेल, अशा दर्जाने उभारले पाहिजे,” असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिले. या केंद्रामुळे वाहनांची सुरक्षितता, चालकांचे कौशल्य आणि रस्ता सुरक्षा व्यवस्थेची गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार असून, महाराष्ट्राच्या रस्ता सुरक्षा क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. (Road Safety Research and Training Centre Saswad)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.