मुंबई (Rashtra Sevika Samiti Jabalpur) : राष्ट्र सेविका समितीच्या ९० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीनिमित्त जबलपूर येथे नर्मदा नदीच्या तीरावर घोषवादनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. समितिच्या अखिल भारतीय घोषप्रमुख पंकजा आणि अखिल भारतीय सहघोषप्रमुख प्राची पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सेविकांनी आपल्या सामूहिक साधनेतून आणि स्वरांच्या साधनेतून नर्मदामातेला मानवंदना अर्पण केली. या कार्यक्रमात १३२ सेविकांनी एकाच वेळी १० विविध रचनांचे वादन केले. शिववंदना, ओंकार, मीरा रचना यांसह भारतीय शास्त्रीय संगीताच्या रागदारीवर आधारित सादरीकरणांतून भारतीय संस्कृतीतील आध्यात्मिक चेतनेचे दर्शन घडले.
या आयोजनाचे वैशिष्ट्य केवळ घोषवादनातील उत्कृष्टता नव्हते, तर त्यातून दिसून आलेली सामाजिक समरसता आणि संघटनभावनाही तितकीच महत्त्वपूर्ण होती. विविध कुटुंबे, प्रदेश आणि सामाजिक पार्श्वभूमीतून आलेल्या सेविका एकाच ध्येयाने, एकाच भावनेने आणि एकाच लयीत एकत्र आल्या होत्या. त्यातून सामाजिक समरसता आणि संघटनशक्तीचे जिवंत उदाहरण पाहायला मिळाले. घोषवादनाच्या प्रात्यक्षिकांमधून भारतीय संस्कृतीतील शुभ आणि मांगलिक प्रतीकांच्या आकृत्याही साकारण्यात आल्या. विशेषतः नर्मदामातेच्या मातृस्वरूपाची आकृती तयार करून अन्य वाद्यांच्या साथीने मातेला प्रदक्षिणा अर्पण करण्यात आली. या सादरीकरणातून लय, ताल, शिस्त आणि सामूहिक समन्वयाचा अद्भुत आविष्कार अनुभवायला मिळाला. (Rashtra Sevika Samiti Jabalpur)
राष्ट्र सेविका समितीची ९० वर्षांची वाटचाल ही नारीशक्तीचे संघटन, संस्कार, शिस्त आणि राष्ट्रसमर्पण यांची प्रेरणादायी गाथा आहे. नर्मदामातेच्या पवित्र तीरावर साकारलेले हे घोषवादन म्हणजे याच दीर्घ साधनेचे आणि समर्पणभावाचे सुंदर प्रतीक ठरले. (Rashtra Sevika Samiti Jabalpur)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक