खंड्याचे रंग, खुलवी अंतरंग

    02-Nov-2026

Kingfisher Birds in India
 
पाण्याच्या नितळ आरशात डोकावणारा, क्षणार्धात सूर मारून भक्ष्य टिपणारा आणि निळ्या-जांभळ्या रंगांची उधळण करणारा खंड्या, म्हणजे निसर्गाने रंगवलेलं एक देखणं चित्रच! कोकणातील नद्या, नाले, तलाव आणि कांदळवनांच्या परिसरात आढळणारा हा पक्षी आपल्या अनोख्या रंगरूपासोबतच शिकार करण्याच्या विलक्षण कौशल्यासाठीही ओळखला जातो. भारतात आढळणार्‍या खंड्यांच्या विविध प्रजातींपैकी काहींचे दर्शन दुर्मीळ असले, तरी प्रत्येकाची रंगसंगती आणि जीवनशैली न्यारी आहे. अशा या रंगीबेरंगी पक्ष्याच्या विश्वाचा घेतलेला हा वेध!
 
निसर्गाच्या अलौकिक सौंदर्याला विशेष महत्त्व प्राप्त होते, ते पक्ष्यांमुळे. आभाळात भिरभिरणार्‍या पाखरांच्या पंखांमधून निसर्गातील रंगांची मुक्त उधळण पाहायला मिळते. असाच मनमोहक पक्षी आपल्या कोकणच्या निसर्गात वर्षानुवर्षे वास्तव्यास आहे. तो म्हणजे ‘खंड्या’ किंवा ‘धीवर’. पाण्याच्या सान्निध्यात राहणारा आणि मासे पकडण्यात तरबेज असणारा हा पक्षी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक रचनेमुळे निसर्गाशी उत्तम जुळवून घेतो. डोळ्यांवरील संरक्षक पारदर्शक पडद्यामुळे पाण्यात सूर मारताना त्याच्या डोळ्यांचे संरक्षण होते. त्यामुळे पाण्यातील मासे अचूक हेरून ते चोचीत पकडणे त्याला सहज शय होते. भक्ष्य पकडण्याच्या या कौशल्यामुळेच तो निसर्गप्रेमींच्या आकर्षणाचा विषय ठरतो.
 
पाणथळ जागांच्या कडेला, तलावांच्या शेजारी किंवा ओढ्यांच्या आसपास फांद्यांवर बसलेला धारदार चोचीचा आणि निळ्या-जांभळ्या रंगांची छटा ल्यालेला खंड्या सहज लक्ष वेधून घेतो. रंग-रूपाप्रमाणेच त्याच्या आकारातही विविधता दिसते. काही खंड्या चिमणीपेक्षा लहान, तर काही कबुतरापेक्षाही मोठे असतात. भारतात खंड्यांच्या १२ प्रजाती आढळतात, तर कोकणात सहा प्रकारचे खंड्या दिसून येतात. त्यातील बलाकचोच धीवर (Stork-billed Kingfisher) आणि निळ्या कानांचा धीवर (Blue-eared Kingfisher) यांचे दर्शन दुर्मीळ असते. कवड्या धीवर (Pied Kingfisher) देखील तुलनेने कमी दिसतो. मात्र, सामान्य धीवर, पांढर्‍या छातीचा धीवर आणि तिबोटी खंड्या हे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रूपामुळे निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेतात.
 
सामान्य धीवर (Common Kingfisher) हा आकाराने लहान असला, तरी रंगांच्या बाबतीत अत्यंत आकर्षक असतो. त्याच्या डोक्यावर आणि पंखांवर निळसर ठिपयांच्या रांगा दिसतात. निळ्या-हिरव्या रंगांची उधळण करणारा हा पक्षी तलावाच्या काठी एखाद्या फांदीवर स्थिरावलेला दिसतो. लाल रंगाच्या आखूड पायांवर तो स्वतःचा तोल सांभाळतो. लांबट, मजबूत चोचीने ओढ्याकाठचे मासे, बेडकांची पिल्ले आणि कीटक पकडण्यात तो तरबेज असतो. पाण्याच्या पृष्ठभागावर नजर रोखून सावज हेरल्यानंतर क्षणार्धात सूर मारून तो भक्ष्य पकडतो. ओलसर मातीत बिळे तयार करून तो घरटे बनवतो. काही वेळा झाडांच्या ढोलीचाही आधार घेतो. मार्च ते जून हा त्याचा विणीचा हंगाम असून, मादी साधारण दोन ते आठ अंडी घालते. नर-मादी मिळून अंड्यांची उबवण आणि पिल्लांचे संगोपन करतात. काही आठवड्यांतच पिल्ले घरट्याबाहेर पडून स्वतः भक्ष्य पकडण्याचे कौशल्य आत्मसात करू लागतात.
 
कांदळवनांपासून हिमालयापर्यंत आढळणारा पांढर्‍या छातीचा धीवर (White-throated Kingfisher) आपल्या वेगळ्या रंगसंगतीमुळे ओळखला जातो. पांढरा गळा, तपकिरी शरीर, गर्द निळे पंख आणि उठावदार लाल चोच यांमुळे हा पक्षी विशेष देखणा दिसतो. सामान्य धीवरप्रमाणे केवळ माशांवर अवलंबून न राहता, तो छोटे साप, पाली, बेडूक आणि कीटक यांचीही शिकार करतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला त्याचा प्रजनन काळ असतो. नर विशिष्ट आवाज काढून मादीला साद घालतो. मादी साधारण सात ते आठ अंडी घालते. घरट्यातील पिल्लांचे संगोपन करताना नर-मादी दोघेही सक्रिय असतात.
 
खंड्यांच्या कुटुंबातील सर्वांत देखणा आणि आकाराने भारतातील सर्वांत लहान ‘किंगफिशर’ म्हणजे तिबोटी खंड्या (Oriental Dwarf Kingfisher). साधारण १३ सेंमी लांबीचा हा पक्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला कोकणात दिसू लागतो. जांभळ्या, गुलाबी, निळ्या, काळ्या आणि पांढर्‍या रंगांच्या विविध छटा त्याच्या पंखांवर पाहायला मिळतात. नारंगी-पिवळ्या पोटामुळे त्याचे सौंदर्य अधिकच खुलते. गर्द हिरव्या वनराईतून वाहणार्‍या नद्या आणि ओढ्यांच्या आसपास, ओलसर मातीत तो बिळासारखे घरटे तयार करतो. छोटे मासे, खेकडे, पाली, सरडे आणि कीटक हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. पावसाळा हा त्याचा विणीचा हंगाम असतो. त्याच्या दर्शनासाठी पक्षीनिरीक्षक आणि छायाचित्रकार आवर्जून जंगलातील जलस्रोतांच्या परिसरात भटकंती करतात.
 
पावसाळ्यातील हिरव्यागार निसर्गात या पक्ष्यांच्या पंखांमधील रंगांची उधळण एखाद्या इंद्रधनुष्याची आठवण करून देते. संथ वाहणार्‍या पाण्याचा आवाज आणि त्यात मिसळणारी खंड्याची ‘लिप-लिप’ अशी साद निसर्गप्रेमींना मोहून टाकते. कवी श्रीधर शनवारे यांनीही आपल्या कवितेत धीवराच्या देखणेपणाचे सुंदर वर्णन केले आहे. त्याच्या लाल चोचीपासून जांभळ्या डोळ्यांपर्यंत प्रत्येक अवयवातील रंगसंगती कवीच्या शब्दांतून जिवंत होते.
 
मात्र, या देखण्या पक्ष्यांच्या अस्तित्वासमोर आज अधिवास नष्ट होण्याचे मोठे आव्हान उभे आहे. वाढते शहरीकरण, घटते वनक्षेत्र, जलस्रोतांचे प्रदूषण आणि शेतीमध्ये रासायनिक खतांचा अतिवापर यांमुळे नद्या, नाले आणि तलावांचे नैसर्गिक स्वरूप बदलत आहे. पाण्यातील मासे आणि इतर जीवांची संख्या घटल्याने खंड्याच्या अन्नसाखळीवरही परिणाम होत आहे. त्यामुळे या पक्ष्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी जलस्रोतांचे संवर्धन, प्रदूषणावर नियंत्रण आणि नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
 
खंड्या केवळ आपल्या सौंदर्याने मन जिंकत नाही, तर जलपरिसंस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणूनही भूमिका बजावतो. त्याच्या रंगीबेरंगी पंखांकडून माणसाने आयुष्यातील विविध रंगांचा मेळ साधण्याची प्रेरणा घ्यावी. निसर्गातील प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे, याची जाणीव ठेवून त्यांचे अस्तित्व जपावे. कारण खंड्याचे रंग खुलले, तरच निसर्गाचे अंतरंग खर्‍या अर्थाने खुलून दिसेल.
 
(लेखक रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील (स्वायत्त) वनस्पतिशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.)
७४४७३७६९९७
लेखक-परेश गुरव
 




संबंधित मजकूर