केरळम्चे ‘खालिद-ए-मिल्लत’...

    02-Nov-2026   

Kerala Anganwadi Renaming Row
 
केरळम्च्या वाझक्काड ग्रामपंचायतीतील अंगणवाडी नूतनीकरणानंतर तिचे ‘किळिक्कतडायी’ नाव बदलून, ‘खालिद-ए-मिल्लत’ केले गेले. याला वर्षभरापासून होत असलेल्या विरोधाची, साधी दखल कुणी घेतली नाही. कारण, तिथे सत्ता आहे ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’ आणि काँग्रेसची! मुघल काळात भारतीयांना धर्माचरणासाठी काय संघर्ष करावा लागला असेल, हे स्पष्ट करणारी ही घटना! या सांस्कृतिक दहशतवादाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
केरळम् सरकारने मागे आदेश काढला होता की, ज्यातून धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख प्रेरित होईल, ती नावे सरकारी वास्तूंना, योजनांना द्यायची नाहीत. मात्र, हा नियम फक्त हिंदू संस्कृती आणि धर्माच्या बाबतीतच असावा बहुधा. कारण, केरळम्च्या वाझक्काड ग्रामपंचायतीमध्ये ‘किळिक्कतडायी’ या अंगणवाडीचे नाव, ‘खालिद-ए-मिल्लत’ करण्यात आले. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ‘लियाकत अली खान’ यांना ‘शहीद-ए-मिल्लत’ नावाने ओळखतात. याच पार्श्वभूमीवर अंगणवाडीला नाव ‘खालिद-ए-मिल्लत’ दिले का? असा प्रश्न केरळम्ची जनताच विचारत आहे.
 
एका वर्षापूर्वी लोकांनी यावर गदारोळ केला होता. हे नाव कशासाठी? असा जाब विचारत, प्रशासनाला नाव बदलण्यासाठी खरमरीत पत्रही लिहिले. ‘हिंदू ऐयवेदी’च्या प्रमुख के. पी. शशिकला यांनी समाजमाध्यमांवर, ‘वाझक्काड पंचायत भारतात आहे की पाकिस्तानात?’ असा थेट प्रश्नच उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. स्थानिक रहिवासी, ‘हिंदू ऐयवेदी’ आणि भाजप यांसारख्या संघटनांनीही, या नामकरणाला तीव्र विरोध केला. सरकारी अंगणवाडीसारख्या संस्थेला पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांशी साम्य असलेले धार्मिक नाव देऊन, लहान मुलांवर विशिष्ट विचारसरणी लादण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही झाला. हा विरोध आजही सुरूच आहे. अखेर स्थानिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन, दि. २३ ऑटोबर २०२५ रोजी बालविकास प्रकल्प अधिकार्‍यांनी वाझक्काडच्या पंचायत सचिवांना एक खरमरीत पत्र पाठवून, अंगणवाडीचे जुनेच ‘किळिक्कतडायी’ नाव पूर्ववत करण्याचे आदेश दिले. मात्र, आदेश येऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ उलटला असला, तरी नाव काही बदलण्यात आलेले नाही.
 
कारण, तिथे आता ‘युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’ची सत्ता आहे. ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’चे महम्मद अली नौशाद हे अध्यक्ष असून, काँग्रेसच्या शमीना के. या उपाध्यक्ष आहेत. त्यांनी जनतेच्या मागणीकडे ढुंकूनही पाहिले नाही. ‘खालिद-ए-मिल्लत’मध्येच त्यांना त्यांचे संस्कृतीदर्शन होत असावे! देशात संविधानाने धर्मस्वातंत्र्य आणि त्यानुसार संस्कृती जपण्याचे स्वातंत्र्य दिले असले, तरीही बहुसंख्य हिंदू परिसरात सत्ता हातात आहे म्हणून, स्वतःची आवड लादत ‘मिल्लत-बिल्लत’ नाव ठेवण्याला काय म्हणावे?
कट्टरपंथीयांना सत्तेचा जरा वारा लागला, तर ते काय करतात याचा अनुभव भारतीयांना अनादी काळापासूनच आहे. मुघलांचा सत्ताकाळ असू दे की, ‘जिना’ने केलेली भारताची पाळणी असू दे की, ‘५ मिनिटे पोलीस हटवा, आम्ही काय करतो ते पाहा’ म्हणणारे ओवेसी बंधू असोत, मालेगावमध्ये उपमहापौर होताच टिपूचा फोटो लावणारी ‘शान-ए-हिंद’ निहाल अहमद असू दे की, नगरसेवकपद जिंकल्यावर मुंब्र्याला ‘हिरवा’ करण्याचे स्वप्नरंजन करणारी ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ची सहर युनूस शेख असो! शेकडो वर्षांपासून ही मानसिकता काही बदललेली नाही.
 
केरळम्मध्ये कट्टरता वाढत आहे. कुणी म्हणेल की, एका अंगणवाडीच्या नामकरणाने थेट कट्टरता वाढल्याचे कसे म्हणायचे? तर, कट्टरता वाढते आहे कारण, इथे ‘युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चा महत्त्वाचा घटकपक्ष आहे ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’! जेव्हा केरळम्मध्ये काँग्रेसबरोबर सत्तेत आल्यावर, या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घोषणा होत्या, ‘ज्या केरळम्च्या भूमीवर लीगचे राज्य आहे, तिथे कायदे लीगच ठरवणार.’ थोडयात, ‘लाल डायरी’सारखे छोटे पुस्तक खिशात ठेवून तेच ‘संविधान’ आहे, असे लोकांना फसवत राहुल गांधी सतत जी ‘संविधान खतरे में हैं’ची बांग देतात; त्याच राहुल गांधींच्या काँग्रेस आणि ‘लीग’च्या सरकारच्या एका घटकपक्षाची संकल्पना काय, तर केरळम्मध्ये ‘मुस्लीम लीग’चे सरकार असून, तिथे ‘लीग’च कायदे ठरवणार भारतभर जानवे वगैरे घालून ‘ब्राह्मण’ असल्याचा दावा करणारे राहुल गांधी हे केरळम्मध्ये निधर्मी होत असून, मुस्लिमांचे कैवारी आहेत. तिथे ते हिंदूंहिताबद्दल ‘ब्र’सुद्धा काढत नाहीत. दुसरे असे की, केरळम्च्या वायनाडमधल्या मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतदानानेच, राहुल आणि नंतर प्रियांका गांधींना खासदार होता आले. त्यामुळे हिंदूविरोधामुळे, आपले पारंपरिक मतदार खूश होतील, असाच समज गांधी कुटुंबीयांचा आहे. त्यामुळे ते केरळम्मधल्या ‘मुस्लीम लीग’ आणि ‘जमात-ए-इस्लाम’च्या वक्तव्यावर आणि कृतीवर मूग गिळतात.
 
याचे अगदी विदारक उदाहरण म्हणजे, ‘सुन्नी’ विद्वान आणि केरळम्चे ग्रॅण्ड मुफ्ती कांथपुरम ए. पी. अबुबकर मुसलीयार मागे केरळम्मध्ये म्हणाला की, "महिलांनी सार्वजनिक मंचांवर येणे विनाशाचे कारण ठरू शकते.” यावरून गदारोळ झालाच. कारण, केरळम्मध्ये काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’मध्येही महिला आहेत. मग त्यांचे काय? बरे त्या तर ‘मोमीन’! त्या काही हिंदू किंवा ख्रिश्चन महिलांसारख्या ‘काफिर’ नाही. (कट्टरतावाद्यांच्या मते, गैरमुस्लीम ‘काफिर’च असतात.) पण, मुसलीयारच्या या विधानाचा विरोध कुणीही केला नाही. उलट, ‘इंडियन युनियन मुस्लीम लीग’चा प्रदेशाध्यक्ष सादिक अली शिहाब थांगल याने म्हटले की, "केरळम्चे ग्रॅण्ड मुफ्ती कांथपुरम ए.पी. अबुबकर मुसलीयार यांची ती एक विद्वत्तापूर्ण अभिव्यक्ती होती.” छे, लाजही वाटली नाही असे विधान करायला? अशा अत्यंत प्रतिगामी आणि महिलाद्वेष्ट्यांसोबत, काँग्रेस मांडीला मांडी लावून सत्तासुख भोगत आहे. हिंदू मत देणार नाहीत, अशीच भीती काँग्रेसला आहे. (कर्माची फळे शोधत येतात म्हणे). दुसरीकडे भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाच्या विरोधात मुस्लीम मतदार आपल्यालाच मत देतील, याचीही खात्री काँग्रेसला आहे. त्यामुळेच ‘मुस्लीम लीग’ने काहीही केले, तरी काँग्रेस ‘मयसभे’तल्या धृतराष्ट्राचीच भूमिका घते.
 
तसेच, इथल्या खासदार प्रियांका गांधी आहेत. ‘लडकी हूं, लढ सकती हूं’ असे त्या कायमच म्हणतात. मात्र, इथे महिलांचा अपमान झाल्यावर त्या लढताना दिसत नाहीत, तर त्या गांधीजींच्या तीन माकडांसारखे वागतात. (‘जमात’विरोधात काही ऐकायचे नाही, काही पाहायचे नाही आणि काही बोलायचे नाही.) महिलांना तुच्छ लेखणार्‍या आणि लिंगभेद करणार्‍यांविरोधात, ‘लडकी हूं, लढ सकती हूं’ची धमक त्या दाखवत नाहीत. याच परिप्रेक्ष्यात महिला सार्वजनिक जीवनात आल्या तर विनाश होईल, असे कुण्या हिंदूने म्हटले असते तर? तेव्हा या भावा-बहिणीने आणि त्यांच्या आईसह उरलेल्या कार्यकर्त्यांनी लगेच ’मनुवादी’, ’ब्राह्मणवाद’ वगैरे म्हणत, ‘डफली गँग’ सोबत आंदोलने केली असती. हिंदू धर्माची टिंगलटवाळी केली असती. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा पुण्यातला तो कार्यक्रम आठवतो. तिथे मुलींवर हिंदू संस्कृतीत कसा अत्याचार होतो, हे सांगण्याचा एककलमी कार्यक्रम राबवला गेला. तिथेही महिलांबाबत सारे काही मुक्त असावे म्हणणारे राहुल जोशातच होते. मात्र, केरळम्मधील ए. पी. अबुबकर मुसलीयार घटनेबद्दल त्यांनी विरोध केला का? अर्थातच नाही.
 
असो! औरंग्याचा संदर्भ असलेले ‘औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर’ नामकरण झाले, ‘हैदराबाद’चे ‘भाग्यनगर’ नामकरण झाले की, याच डाव्या आणि अगदी काँग्रेसी कंपूतल्या लोकांना पोटशूळ उठतो. नाव बदलून इतिहास बदलेल का? जुनी नावे बदलण्यापेक्षा लोकांच्या समस्यांकडे लक्ष द्या, असे ओरडत ते सर्वत्र फिरतात. पण, या ‘खालिद-ए-मिल्लत’वर त्यांना पोटशूळ न होता, त्यांच्या आंतरात्म्याला थंडावाच मिळतो. जुलमाने राजसत्तेत येताच, मुस्लीम आक्रमणकर्त्यांनी हिंदूंच्या अस्तित्वाच्या, धार्मिकतेच्या आणि संस्कृतीच्या खुणा कशासाठी पुसल्या असतील? याचे उत्तर शोधताना त्याचा संदर्भ कुठेतरी या ‘खालिद-ए-मिल्लत’शी येऊन थांबतो. बहुसंख्य हिंदू असणार्‍या देशात आणि केरळम् राज्यातही अंगणवाडीसारख्या वास्तूचे नाव बदलून, ‘खालिद-ए-मिल्लत’ करण्याचे बीज त्याच सत्ताकाळातले आहे, हे नक्की. मात्र, खात्री आहे की, ज्या देशात श्रीराम जन्मभूमीसाठी अनंत काळ लढा सुरू राहून शेवटी प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर बांधले गेलेच, तिथे ‘खालिद-ए-मिल्लत’सारख्या चिल्लर घटनांनाही यथाशक्ती योग्य उत्तर मिळेलच.




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर