मुंबई (India First Bullet Train) : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या दिशेने भारतीय रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. स्वदेशी अभियांत्रिकी, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या प्रवासी सुविधांचा संगम असलेल्या बुलेट ट्रेनची वैशिष्ट्ये केंद्र सरकारने जाहीर केली आहेत. ताशी २८० किलोमीटर वेगाने चाचणी घेण्याची क्षमता असलेल्या या ट्रेनचा नियोजित परिचालन वेग ताशी २४९ किलोमीटर असेल. आठ डब्यांच्या या ट्रेनमधून एकाच वेळी सुमारे ५५७ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी), अहमदाबादच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी या ट्रेनची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली. सुमारे २०२ मीटर लांबीच्या या ट्रेनमध्ये चार मोटर कार आणि चार ट्रेलर कार असतील. प्रवाशांच्या संख्येत भविष्यात वाढ झाल्यास अशा दोन आठ डब्यांच्या ट्रेन एकत्र जोडून १६ डब्यांची ट्रेन चालवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. (India First Bullet Train)
बुलेट ट्रेनची अंतर्गत रचना भारतीय प्रवाशांच्या शारीरिक गरजा आणि आराम लक्षात घेऊन करण्यात आली आहे. यामध्ये सात डबे सामान्य श्रेणीचे, तर एक डबा एक्झिक्युटिव्ह श्रेणीचा असेल. सामान्य श्रेणीमध्ये ३×२ आसनरचना, तर एक्झिक्युटिव्ह श्रेणीमध्ये २×२ आसनरचना असेल. प्रवाशांना पुरेशी पाय मोकळी ठेवण्याची जागा, सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला रॅक आणि मोठ्या सामानासाठी स्वतंत्र स्टँड उपलब्ध असतील. लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंगसाठी पॉवर आउटलेट, एलईडी प्रकाशयोजना आणि आधुनिक जैव-विघटनशील शौचालयांची सुविधाही देण्यात आली आहे. प्रत्येक आसनाच्या रांगेत मोठ्या खिडक्या असतील. तसेच डब्यांमधील जोडणीसाठी सीलबंद सिंगल-पीस गँगवे असल्याने प्रवाशांना एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहजपणे जाता येणार आहे. (India First Bullet Train)
प्रवासादरम्यान प्रवाशांना आवश्यक माहिती मिळावी यासाठी अत्याधुनिक प्रवासी माहिती प्रणाली बसवण्यात येणार आहे. डब्यांमधील एलसीडी स्क्रीनवर इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये प्रवासविषयक माहिती उपलब्ध होईल. ध्वनिक्षेपक आणि स्वयंचलित उद्घोषणा प्रणालीद्वारेही सूचना दिल्या जातील. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता यावा यासाठी विशेष टॉक-बॅक यंत्रणा असेल. (India First Bullet Train)
दिव्यांग व्यक्ती आणि हालचालींमध्ये अडचण असलेल्या प्रवाशांसाठी ट्रेनची रचना अधिक सुलभ करण्यात आली आहे. ट्रेनचा तळ आणि फलाटाची उंची समान ठेवण्यात येणार असल्याने चढ-उतार करणे सोपे होईल. प्रवास अधिक शांत आणि आरामदायी व्हावा यासाठी ट्रेनच्या डब्यांची आणि जमिनीची ध्वनिरोधक रचना करण्यात आली आहे. आवाज कमी करणारे विशेष कोटिंग, बोगी कव्हर्स आणि बाह्य आवरणांचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक डब्यात दोन एचव्हीएसी युनिट्स असतील. त्यामुळे बाहेरील हवामानानुसार डब्यांमधील तापमान आणि आर्द्रता नियंत्रित ठेवता येईल.
बुलेट ट्रेन २५ केव्ही, ५० हर्ट्झ सिंगल फेज एसी विद्युत प्रणालीवर धावणार आहे. यामध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. ट्रेनचा पुढील भाग आणि संपूर्ण बाह्य रचना कॉम्प्युटेशनल फ्लुइड डायनॅमिक्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित करण्यात आली आहे. या तंत्रामुळे हवेचा प्रतिरोध कमी करणे, बोगद्यांमध्ये निर्माण होणाऱ्या हवेच्या दाबातील बदलांवर नियंत्रण ठेवणे आणि ध्वनिलहरींचा परिणाम कमी करणे शक्य होणार आहे. (India First Bullet Train)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.