सिडकोकडून १५ टक्के पाणीकपात लागू! प्रत्येक नोडमध्ये आठवड्यातून २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन!


CIDCO Water Cut

मुंबई (CIDCO Water Cut) : गतवर्षी अल-निनोच्या प्रभावामुळे राज्यात कमी पर्जन्यमान नोंदविण्यात आले होते. अपुऱ्या पावसामुळे पावसाळ्याच्या कालावधीतही अनेक भागांत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दि. ५ ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयानुसार अल-निनोच्या संभाव्य प्रभावाचा विचार करून राज्यातील उपलब्ध जलसाठ्यांचे दि. ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत काटकसरीने, प्राधान्यक्रमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पाणीगळती कमी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सिडको प्रशासनानेही उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करून भविष्यात उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार सिडको कार्यक्षेत्रातील विविध नोडमध्ये १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येत असून, प्रत्येक नोडमध्ये आठवड्यातून एकदा २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांनुसार, दि. २ नोव्हेंबर २०२६ पासून पाणीकपात लागू करण्यात आली असून, पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत ती सुरू राहणार आहे. (CIDCO Water Cut)
 
या नियोजनानुसार खारघर येथे सोमवारी, उलवे सेक्टर २, ३, ५, ६, १९, २०, २२, २३, २४, २५, २५-अ तसेच गव्हाण, कोपर व मोरावे येथे मंगळवारी, तर उलवे सेक्टर ८, ९, १०-ब, १५-क, १६, १७, १८ तसेच शेलघर, बामणडोंगरी, न्हावा, शिवाजीनगर व न्हावा खाडी या परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तळोजा येथे शुक्रवारी, तर द्रोणागिरी सेक्टर १, २, ११, १२, १५, ३०, ४७, ४८, ५०, ५१, ५२, ५३, ५४ व ५५ तसेच धुतुम, भेंडखळ, पागोटे, फुंडे, नवघर, नवघर पाडा, बोकरडवीरा व कुंडे या परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. (CIDCO Water Cut)
 
नवीन पनवेल (पूर्व) येथे सोमवारी, नवीन पनवेल (पश्चिम) येथे मंगळवारी, कळंबोली येथे बुधवारी, करंजाडे येथे गुरुवारी, तर कळुंद्रे आणि कामोठे येथे शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अशा प्रकारे नोडनिहाय पाणीकपातीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
 
या कालावधीत नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर अत्यंत जपून आणि काटकसरीने करावा, तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सिडको प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (CIDCO Water Cut)
 
नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ आवश्यकतेपुरता करावा. वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. असे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. घरातील तसेच गृहनिर्माण संकुलातील पाण्याच्या साठवण टाक्या भरून वाहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. घरातील नळ अथवा जलवाहिन्यांमधून पाण्याची गळती होत असल्यास ती तातडीने दुरुस्त करून घ्यावी. आवश्यकता नसताना नळ सुरू ठेवू नयेत. घरामध्ये साठवून ठेवलेले पाणी केवळ शिळे झाले आहे, या समजुतीने फेकून देऊ नये. तसेच शहरातील जलतरण तलावांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. असे आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
 
संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध जलसाठ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे सिडको क्षेत्रातील सर्व नागरिकांनी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन पाण्याचा जपून वापर करावा आणि या नियोजनात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीत सिडको प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात येत आहे. (CIDCO Water Cut)





गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर