भेदाच्या षड्‌यंत्राविरोधात लढा उभारणे आवश्यक! डॉ. सुधांशू त्रिवेदी यांचे प्रतिपादन; ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ @ १००’ पुस्तकाचे प्रकाशन!

    19-Nov-2026   
Sudhanshu Trivedi RSS Book Launch

पुणे (Sudhanshu Trivedi RSS Book Launch) : संविधानाची प्रत घेऊन फिरणाऱ्यांनी संविधानाचीच मोडतोड केली आहे. ‘मेरी मर्जी’ या भूमिकेतून वागणाऱ्या विरोधी पक्ष नेत्याच्या षड्‌यंत्रालाही समजून घेणे आवश्यक आहे. देश प्रगतीपथावर असताना देशाला झुकविण्यासाठी साम-दाम-दंड निरर्थक ठरले त्या वेळी भेद नितीचा अवलंब करून प्रांत, भाषा, वर्ग, जाती-जातीत भांडणे लावणे सुरू आहे. एवढे करूनही भागले नाही तेव्हा एका पिढीला दुसऱ्या पिढीशी भांडायला लावायचे हे भेदाचे षड्‌यंत्र समजून घेऊन त्याविरुद्ध लढा उभारणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते, राज्यसभा सदस्य डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी केले. सामाजिक समरसता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेले कार्य अद्‌भूत आहे, असेही त्यांनी गौरवाने नमूद केले.
 
दिलीपराज प्रकाशन प्रकाशित आणि भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू व सहलेखक अनुपम त्रिवेदी लिखित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ @ १०० : एक शतक संकल्पाचे’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पश्चिम महाराष्ट्र संघचालक नानासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे मंचावर होते. स. प. महाविद्यालयाच्या आवारातील भाऊसाहेब चितळे सभागृहात कार्यक्रम झाला. या पुस्तकाचा मराठीत अनुवाद डॉ. स्वाती महाळंक यांनी केला आहे. (Sudhanshu Trivedi RSS Book Launch)
 
संघावर जे जे आरोप झाले ते पूर्ण नम्रतेने आणि गंभीरतेने पचवून संघाने समाजात सृजनाचे मोलाचे कार्य केले आहे, असे सांगून डॉ. सुधांशू त्रिवेदी पुढे म्हणाले, महाराष्ट्राची भूमी ही सदैव हिंदूत्ववादी संघटनांसाठी सुपीक भूमी राहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची सेना दिल्लीच्या सत्तेपुढे कधीही झुकली नाही. पण इटलीच्या सत्तेपुढे शिवसेना दबून गेली आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगाविला. ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले; ज्याला हिंदू साम्राज्य देखील म्हटले गेले. आत्मगौरवाच्या विचाराची दिलेली प्रेरणा आजही मोलची आहे. ब्रिटिशांनी कारस्थाने करत जाती-पातीचे राजकारण केले आणि देशात प्रादेशिक मुद्द्यांवर दुफळी निर्माण केली. त्यांनी आपल्या मनावर लादलेल्या वैचारिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. आजही देशाच्या स्वातंत्र्याची लढाई पूर्ण झालेली नाही. (Sudhanshu Trivedi RSS Book Launch)
 
स्वातंत्र्य लढ्यात संघाचा काय सहभाग होत असा प्रश्न विचारला जातो; पण काँग्रेसच्या कोणत्या वरीष्ठ नेत्याने लाठी खाल्ली, गोळी झेलली, फासावर गेला किंवा काळ्यापाण्याची शिक्षा भोगली आणि स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न केला हे सांगावे असे प्रतिआव्हानही त्यांनी दिले. आपल्याला ‘स्वराज्य’ लाभलेले आहे, परंतु ‘तंत्र’ अजून साधलेले नाही. ही लढाई वैचारिक असल्यामुळे स्वातंत्र्यापेक्षाही मोठी लढाई आहे.
 
हिंदू आणि राष्ट्रीय स्वाभिमान प्रस्थापित करण्यासाठी घेतलेला निर्णय ब्रिटिशांच्या काळातील चुकीच्या अर्थांमुळे सामाजिक तेढ निर्माण करणारा ठरला. तोच प्रकार आजही संघाच्या कार्याबाबतीत घडत असून संघाबद्दल दुष्प्रचार केला जात आहे. देशाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करायचे महत्त्वाचे कार्य आजही होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. देशाच्या विरोधात जनमानसाच्या मनामनात हीन भावना भरण्यासाठी जे वैचारिक षड्‌यंत्र रचले जात आहे त्याचा प्रतिकार करण्यासाठी संघाची विचारसरणी नवी दिशा देणारी ठरत आहे, असे त्यांनी गौरवाने नमूद केले. (Sudhanshu Trivedi RSS Book Launch)
 
प्रकाश जावडेकर म्हणाले, संघ ही केवळ विचारसणी नसून ती एक विशिष्ट कार्यपद्धती आहे आणि याच वैशिष्ट्यामुळे संघ मोठा झाला आहे. संघ सर्वसमावेशकत्वाचे प्रतिनिधीत्व करणारा असल्यामुळे तेथे प्रत्येक वर्ग, जात आणि समाजाचे कार्यकर्ते दिसून येतात. पर्यावरण, कुटुंब, प्रबोधन आणि इतर सामाजिक उपक्रमांचा समावेश असलेल्या पंच परिवर्तनाचा संकल्प करत संघ समाजात पुढे जात आहे. (Sudhanshu Trivedi RSS Book Launch)
 
पुस्तक लेखनाविषयी बोलताना श्याम जाजू म्हणाले, संघ म्हणजे केवळ आनंद, उत्साह, प्रेम आणि जिव्हाळा नसून ती राष्ट्र निर्माणाची, देशभक्ती जागविणारी, मनाची मशागत करणारी एक मोठी यंत्रणा आहे. त्यामुळेच राष्ट्र निर्माणातील संघाच्या या ऐतिहासिक भूमिकेला कोणीही नाकारू शकणार नाही. संघावर प्रेम करणाऱ्यांबरोबरच ज्यांना संघ नेमका समजून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.
 
नानासाहेब जाधव यांनी संघ कार्याविषयी माहिती विशद केली. राजीव बर्वे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. (Sudhanshu Trivedi RSS Book Launch)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर