ज्यांना समाजाने नाकारले, त्यांना मायेने जवळ करून त्यांच्या आयुष्यात आशेची नवी पहाट फुलवण्याचा ध्यास घेतलेल्या संदीप परब यांच्याविषयी...
रस्त्याच्या कडेला एखादी व्यक्ती अस्वच्छ अवस्थेत, आजारी दिसली की, अनेकजण तिच्याकडे पाहूनही पुढे जातात. मात्र, यांच्या वेदना आणि दु:ख जाणून घेण्यासाठी आणि त्यांना पुन्हा सन्मानाने जगण्याची संधी देण्यासाठी, एखादी व्यक्ती संपूर्ण आयुष्यच वाहून घेते, तेव्हा माणुसकीचा खरा अर्थ अधोरेखित होतो. रस्त्यावरच्या निराधारांना केवळ अन्न-वस्त्र देण्यापलीकडे, त्यांना मायेची ऊब, सुरक्षित निवारा, वैद्यकीय उपचार आणि जगण्याचा आत्मविश्वास देण्याचे काम संदीप परब अनेक वर्षांपासून करत आहेत. ‘जीवन आनंद संस्था’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले सेवाकार्य म्हणजे, समाजाने दुर्लक्षलेल्या माणसांच्या आयुष्यात पुन्हा आशेचा दिवा पेटवणारा माणुसकीचा यज्ञच!
सिंधुदुर्गच्या कुडाळमधील अनाव या छोट्याशा गावात, संदीप यांचा जन्म झाला. साध्या परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. वडील मुंबईतील कापड गिरणीत कामगार होते. मात्र, संपामुळे त्यांची नोकरी गेली आणि कुटुंबावर संकटच कोसळले. अखेर मुंबई सोडून वडिलांना गाव जवळ करावे लागले. त्यानंतर वडिलोपार्जित शेतीच्या आधारावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला. या परिस्थितीने संदीप यांना लहानवयातच कष्ट, संघर्ष आणि प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याची शिकवण दिली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मजुरी करून, कुटुंबाला हातभार लावला.
१९९४ मध्ये कुडाळ येथून कला शाखेची पदवी घेतल्यावर, रोजगारासाठी त्यांनी मुंबई गाठली. सुरुवातीस त्यांनी मिळेल ते काम स्वीकारले. कधी ‘वेटर’ म्हणून, कधी ‘केअरटेकर’ म्हणून, तर कधी गाड्या धुण्याचेही काम त्यांनी केले. मात्र, जगण्याचा संघर्ष करत असतानाच, समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी काहीतरी करण्याची भावना त्यांच्या मनात अधिकाधिक दृढ होत होती. याच भावनेतून १९९९ मध्ये त्यांनी परळच्या ‘सोशल सर्व्हिस लीग’मधून, एक वर्षाचा ‘पॅरा-प्रोफेशनल सोशल सर्व्हिस कोर्स’ पूर्ण केला. त्यानंतर ‘श्रद्धा सेंटर’, ‘स्ट्रीट यूथ’ आणि ‘सीआरएच’ यांसारख्या स्वयंसेवी संस्थांमध्ये, कामाची संधी त्यांना मिळाली. या संस्थांमध्ये काम करताना रस्त्यावर राहणारी मुले, झोपडपट्टीतील युवक आणि बेघर कुटुंबांचे प्रश्न त्यांनी अनुभवले.
याच काळात त्यांचे लक्ष रस्त्यावरच्या निराधार माणसांकडे गेले. समाजाचे दुर्लक्ष झालेली, अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय उपचारांपासून वंचित असलेली असंख्य माणसे त्यांना दिसली. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची गरज संदीप यांना जाणवली. परंतु, अस्वच्छ अवस्थेतील या निराधारांना रिक्षा किंवा टॅक्सीतून नेण्यास चालक नकार देत. त्यामुळे अनेकदा संदीप यांनाच पुढाकार घ्यावा लागे. काहीवेळा अशक्तपणामुळे चालताही न येणार्यांना, त्यांनीच उचलून शासकीय रुग्णालयात नेले. वेळेत उपचार उपलब्ध न झाल्याने, जवळपास १२ निराधार व्यक्तींनी त्यांच्याच कुशीत अखेरचा श्वास घेतला. यामुळे संदीप आतून हादरले.
समाजकार्य अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने करता यावे, यासाठी त्यांनी २००७-०८ मध्ये ‘समाजकार्य’ विषयातील ‘पदव्युत्तर’ शिक्षण पूर्ण केले. २००८ मध्ये सांताक्रूझच्या वाकोला पुलाखाली त्यांनी, रस्त्यावरच्या निराधारांना प्रथमोपचार आणि मदत देण्याचे काम सक्रियपणे सुरू केले. याकाळात त्यांची आर्थिक परिस्थितीही हलाखीचीच होती. मात्र, त्यांनी निराधारांच्या सेवेलाच प्राधान्य दिले. मंदिराबाहेर भिकार्यांच्या रांगेत उभे राहून भोजन घेण्याचे दिवसही त्यांनी अनुभवले. या सेवाकार्याला संस्थात्मक स्वरूप देण्याच्या उद्देशाने दि. १८ जानेवारी २०१३ रोजी त्यांनी, ‘जीवन आनंद संस्था’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्यानंतर दि. २ ऑटोबर २०१३ रोजी, सिंधुदुर्गातील पणदूर येथे संस्थेच्या पहिल्या पुनर्वसन केंद्राची सुरुवात झाली. या केंद्राला ‘संविता आश्रम’ असे नाव देण्यात आले. रस्त्याच्या कडेला आयुष्य कंठणार्या निराधारांना सुरक्षित निवारा मिळावा, त्यांच्या जखमांवर उपचार व्हावेत आणि त्यांना पुन्हा माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे, हाच या आश्रमाच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश.
संदीप यांनी लावलेल्या या सेवाकार्याच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. मुंबई, कोकण आणि गोव्यामध्ये, ‘जीवन आनंद’ संस्थेचे कार्य विस्तारले आहे. संस्थेच्या माध्यमातून सात पुनर्वसन केंद्रे कार्यरत असून, २५०हून अधिक निराधारांची काळजी घेतली जाते. . आजवर १ हजार ५००हून अधिक निराधार व्यक्तींना संस्थेने सहकार्य केले आहे. त्यातील ४०० पेक्षा अधिकांना कुटुंबीयांशी पुन्हा भेटवण्यात यश आले. रस्त्यावरच्या मुलांसाठी संस्थेने दोन ‘डे-केअर शेल्टर्स’ही सुरू केले आहेत.
पुनर्वसनाला स्वावलंबनाची जोड म्हणून, ग्रामीण भागात स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत. संदीप यांच्या कार्याची दखल आज विविध स्तरांवर घेतली गेली असून, त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, ‘सेवेचा आनंद हाच खरा पुरस्कार’ असे ते मानतात. संदीप परब यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने अनेक शुभेच्छा!