हिंदूंची संख्या वाढणार, पण लोकसंख्येतील प्रमाण घटणार! २०७० पर्यंत भारताच्या धार्मिक रचनेत बदलाचे संकेत; प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालातून संकेत

    19-Nov-2026   
 
India Hindu Population Projections 2070
 
मुंबई (India Hindu Population Projections 2070) : प्यू रिसर्च सेंटरच्या नव्या लोकसंख्याशास्त्रीय अभ्यासातून आगामी पाच दशकांत भारताच्या धार्मिक लोकसंख्येच्या रचनेत महत्त्वपूर्ण बदल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशातील हिंदूंची एकूण लोकसंख्या सुमारे १७.६ कोटींनी वाढणार असली, तरी एकूण लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण घटण्याची शक्यता या अभ्यासात वर्तवण्यात आली आहे.
 
‘द फ्युचर ऑफ द ग्लोबल हिंदू पॉप्युलेशन’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, भारतातील हिंदूंची लोकसंख्या २०२० मधील अंदाजे ११० कोटींवरून २०७० पर्यंत सुमारे १३० कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, देशाच्या एकूण लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण ७९.४ टक्क्यांवरून ७५.८ टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. (India Hindu Population Projections 2070)
 
दुसरीकडे, मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणात अधिक वेगाने वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येतील मुस्लिमांचे प्रमाण २०२० मध्ये १५.२ टक्के होते. ते २०७० पर्यंत १९.६ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. प्रजननदरातील तफावत आणि विविध धार्मिक समुदायांच्या वयोगटांतील फरक यांमुळे भारताच्या धार्मिक लोकसंख्येच्या रचनेत बदल होण्याची शक्यता या अभ्यासातून अधोरेखित झाली आहे. (India Hindu Population Projections 2070)
 
प्यू रिसर्च सेंटरच्या अभ्यासातील महत्त्वपूर्ण निष्कर्षांपैकी एक म्हणजे भारतातील हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्येच्या वाढीच्या दरातील संभाव्य तफावत. २०२० ते २०७० या कालावधीत हिंदू लोकसंख्येत १६ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. त्याच काळात हिंदूंव्यतिरिक्त अन्य धार्मिक समुदायांच्या लोकसंख्येत ४२ टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुस्लिम समुदायातील तुलनेने तरुण लोकसंख्या आणि हिंदूंच्या तुलनेत अधिक असलेला प्रजननदर ही या बदलामागील महत्त्वाची कारणे असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
 
प्यू रिसर्च सेंटरच्या २०२० ते २०२५ या कालावधीतील अंदाजानुसार, भारतातील हिंदूंचा एकूण प्रजननदर प्रति महिला सुमारे १.९ अपत्ये इतका आहे. मुस्लिम समुदायाचा प्रजननदर यापेक्षा अधिक आहे. गेल्या काही दशकांत भारताचा एकूण प्रजननदर लक्षणीयरीत्या घटला असल्याचेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. सुमारे तीन दशकांपूर्वी हिंदू महिलांचा प्रजननदर प्रति महिला ३.३ अपत्ये इतका होता. त्यातही मोठी घट झाली आहे. लोकसंख्येतील एखाद्या समुदायाचे प्रमाण केवळ त्याच्या एकूण संख्येवर अवलंबून नसते, तर अन्य समुदायांच्या तुलनेत त्या समुदायाच्या लोकसंख्येचा वाढीचा वेग किती आहे, यावरही ते ठरते. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणातील बदल समजून घेताना या दोन्ही बाबी महत्त्वाच्या ठरतात. (India Hindu Population Projections 2070)
 
जागतिक लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाणही घटण्याचा अंदाज
 
भारतातील हिंदूंच्या लोकसंख्येच्या प्रमाणात होणारी संभाव्य घट केवळ भारतापुरती मर्यादित नाही. जागतिक स्तरावरही हिंदूंच्या लोकसंख्येचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज प्यू रिसर्च सेंटरने व्यक्त केला आहे. २०२० ते २०७० या काळात जगभरातील हिंदूंची लोकसंख्या सुमारे १९.९ कोटींनी वाढून जवळपास १४० कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, जागतिक लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण २०२० मधील १५ टक्क्यांवरून २०७० मध्ये १४ टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. यामागे हिंदूंव्यतिरिक्त अन्य समुदायांच्या लोकसंख्येचा वाढीचा वेग अधिक असणे हे कारण असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. जागतिक हिंदू लोकसंख्येचे प्रमुख केंद्र भारतच आहे. २०२० मध्ये भारतात सुमारे ११० कोटी हिंदू राहत होते. ही संख्या जगातील एकूण हिंदू लोकसंख्येच्या जवळपास ९५ टक्के होती. भारतानंतर नेपाळमध्ये सुमारे २.४ कोटी हिंदू आहेत. त्याखालोखाल बांगलादेश, पाकिस्तान आणि इंडोनेशिया या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदू लोकसंख्या आहे. या अभ्यासानुसार, २०७० मध्येही भारत आणि नेपाळ हे जगातील हिंदूबहुल लोकसंख्या असलेले एकमेव दोन देश राहण्याची शक्यता आहे. (India Hindu Population Projections 2070)
 
अमेरिकेतही हिंदू लोकसंख्येत मोठी वाढ होण्याचा अंदाज
 
भारताबाहेरील हिंदू लोकसंख्येच्या भौगोलिक वितरणातही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता या अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. २०७० पर्यंत अमेरिकेत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असण्याचा अंदाज आहे. प्रामुख्याने स्थलांतरामुळे अमेरिकेतील हिंदू समुदायाच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचाही जगातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेल्या पहिल्या दहा देशांच्या यादीत समावेश होण्याचा अंदाज आहे. २०७० पर्यंत ऑस्ट्रेलियातील हिंदूंची लोकसंख्या सुमारे ३० लाखांवर पोहोचू शकते.
 
भारताच्या लोकसंख्येच्या भवितव्याबाबत नव्याने चर्चा
 
प्यू रिसर्च सेंटरच्या या निष्कर्षांमुळे भारतातील धार्मिक समुदायांच्या लोकसंख्यावाढीच्या प्रवाहांचा अभ्यास करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. विशेषतः विविध धार्मिक समुदायांच्या प्रजननदरातील आणि वयोगटांतील फरक यांचा देशाच्या भविष्यातील लोकसंख्येच्या रचनेवर होणारा परिणाम महत्त्वाचा ठरणार आहे. २०७० मध्येही भारताच्या एकूण लोकसंख्येत हिंदूंचे प्रमाण तीन-चतुर्थांशपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज असला, तरी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात होणारी संभाव्य घट हा चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, हिंदूंची एकूण लोकसंख्या कमी होणार नसून ती वाढणार आहे. इतर धार्मिक समुदायांच्या तुलनेत हिंदू लोकसंख्येचा वाढीचा वेग कमी राहण्याचा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लोकसंख्येतील बदलांचा मुद्दा सामाजिक आणि राजकीयदृष्ट्याही संवेदनशील राहण्याची शक्यता आहे. हिंदू समाजातील अनेकांसाठी हा प्रश्न केवळ लोकसंख्येच्या आकडेवारीपुरता मर्यादित नसून, देशात आपल्या धार्मिक श्रद्धांचे पालन करण्याचे, परंपरांचे जतन करण्याचे आणि सण-उत्सव निर्भयपणे साजरे करण्याचे स्वातंत्र्य भविष्यातही अबाधित राहील का, या व्यापक चिंतेशीही जोडला गेला आहे. (India Hindu Population Projections 2070)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर