कीर्तनपरंपरेचा संस्कारदीप

    19-Nov-2026


Dombivli Kirtan Kul
 
भारतीय भक्तिपरंपरेत कीर्तनाला आत्मिक उन्नतीचा मार्ग म्हणूनही स्थान लाभले आहे. कीर्तन हा भक्तिप्रकार मनाला भक्तिरसात न्हाऊ घालतो. काळाच्या प्रवाहात याचे सातत्य टिकविण्यासाठी, तिचे जतन आवश्यक आहे. याच जाणीवेतून कीर्तन प्रसाराचे कार्य करणार्‍या डोंबिवली कीर्तन कुल संस्थेच्या कार्याचा आढवा घेणारा हा लेख...
 
भारतीय भक्तिपरंपरेत श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन अशा नवविधा भक्तीतून परमेश्वराशी नाते जोडले जाते. यातील ‘कीर्तन’ हा भक्तिप्रकार विशेष वैशिष्ट्यपूर्ण. कीर्तनातून ईश्वराचे नामस्मरण घडते, संतवाङ्मयाचे श्रवण होते आणि तसेच मानवी जीवनाला दिशा देणार्‍या सद्विचारांचे प्रबोधनही होते. देवर्षी नारदांपासून अनेक संतांनी कीर्तनातून भक्तिमार्गाचा प्रसार केला. परमेश्वराचे गुणसंकीर्तन, संतविचारांचे निरूपण, अभंगवाणीतील तत्त्वज्ञान आणि त्यातून होणारे मूल्यशिक्षण यांचा सुरेख संगमच कीर्तनातून मिळतो. म्हणूनच कीर्तनभक्ती, ज्ञान आणि समाजप्रबोधन यांचा त्रिवेणी संगम आहे. या परंपरेचे पावित्र्य जपत तिचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आणि नव्या कीर्तनकारांना घडविणे, या भावनेतून डोंबिवलीत दि. १३ जुलै २०१५ रोजी ‘डोंबिवली कीर्तन कुल’ या संस्थेची स्थापना झाली.
 
संस्थेच्या स्थापनेमागे कीर्तनपरंपरा संवर्धनाची एक पार्श्वभूमी आहे. ठाणे जिल्ह्यातील ’अखिल भारतीय कीर्तन कुला’ची डोंबिवली शाखा १९९४-९५ पासून कार्यरत होती. मात्र, शासनाच्या अटींनुसार, सर्वत्र अखिल भारतीय कीर्तन कुलाचे कामकाज बंद झाले. त्यानंतरही कीर्तनाचा प्रचार अविरत सुरू राहावा, तसेच नव्या पिढीचे कीर्तनकार घडविता यावेत, अशी आवश्यकता भासू लागली. याच जाणिवेतून डोंबिवलीतील सहा-सात कीर्तनकारांच्या सामूहिक प्रयत्नांतून ‘डोंबिवली कीर्तन कुला’ची स्थापना झाली. समाजात कीर्तनाची रुची असणारी पिढी निर्माण करणे, विविध ठिकाणी कीर्तन महोत्सवांचे आयोजन करून समाजप्रबोधन करणे आणि नवोदित कीर्तनकारांना प्रशिक्षण देणे, हा संस्थेच्या कार्याचा मूलाधार.
 
कीर्तन ही केवळ उपजत प्रतिभेच्या बळावर साकार होणारी कला नसून, तिच्या पाठीशी अभ्यास, संगीताचे ज्ञान, संतसाहित्याची जाण आणि निरूपणाची बैठक आवश्यकच. यातूनच संस्थेने नवोदित कीर्तनकारांसाठी तीन वर्षांचा अभ्यासक्रम निश्चित केला. कीर्तनातील नमनापासून विविध अंगांचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते. तसेच, तबला आणि पेटीच्या साथीनेही कीर्तनाचा नियमित सराव केला जातो. पहिल्या वर्षापासूनच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कीर्तनाचा सराव मिळाल्याने, संकल्पना आणि प्रत्यक्ष सादरीकरणाचा मेळ साधला जातो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या मूल्यमापनासाठी दरवर्षी सहामाही आणि वार्षिक अशा लेखी, तसेच प्रात्यक्षिक परीक्षांचाही होतात. तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना, बाहेर कीर्तन सादर करण्याची संधीही संस्थेकडून दिली जाते. अनेक कीर्तनकार घडवणार्‍या या संस्थेत सध्या आठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या संस्थेचे प्रशिक्षणवर्ग श्रीधर निवास, चार रस्ता, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, डोंबिवली येथे चालतात. ‘हभप’ सुहासबुवा सरपोतदार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तीनही वर्षांच्या विद्यार्थ्यांचे आठवड्यातील वेगवेगळ्या वारी प्रशिक्षणवर्ग घेतले जातात. शनिवार आणि रविवारी संगीत सरावही घेतला जातो. कीर्तनाच्या सादरीकरणात शब्द, स्वर आणि ताल यांचे महत्त्व अनन्यसाधारण! त्यामुळेच या तिन्ही अंगांचा समन्वय प्रशिक्षणातून साधण्याचा प्रयत्न संस्था करते.
 
कीर्तनपरंपरेचे संवर्धन करताना पूर्वसुरींच्या कार्याचे स्मरण आणि नवोदितांना प्रोत्साहन या दोन्ही गोष्टी संस्थेने जपल्या. जानेवारी महिन्यात डोंबिवली पश्चिम येथे ‘मराठा हितवर्धक मंडळ’ आणि ‘डोंबिवली कीर्तन कुल’ यांच्या संयुक्त विद्यमाने, दरवर्षी ‘देवर्षी नारद कीर्तन महोत्सवा’चे आयोजन होते. देवर्षी नारद हे आद्य कीर्तनकार! त्यांच्या नावे आयोजित महोत्सवात, संध्याकाळच्या सत्रात नवोदित कीर्तनकारांना संधी दिली जाते, तर रात्रीच्या सत्रात गेली १५ ते २० वर्षे कीर्तनसेवा करणार्‍या प्रतिष्ठित कीर्तनकारांची कीर्तने आयोजित केली जातात.
 
या महोत्सवात समाजात उत्तम कार्य करणार्‍या कीर्तनकार, प्रवचनकार आणि अन्य व्यक्तींना ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पाच हजार रुपये रोख, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप. या महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, दिवंगत कीर्तनकारांच्या स्मृतींचे जतन. ज्या दिवंगत कीर्तनकारांच्या घराण्यातील पुढील पिढी कीर्तनाचा वारसा चालवत आहे, त्यांनाही या महोत्सवात कीर्तन सादर करण्याची संधी दिली जाते. तसेच संबंधित दिवंगत कीर्तनकारांची माहिती, त्यावर्षीच्या महोत्सवाच्या पत्रिकेत प्रसिद्ध केली जाते. कीर्तन क्षेत्रात आयुष्य वेचणार्‍या या व्यक्तींचे योगदान विस्मृतीत जाऊ नये, हाच त्यामागील उदात्त हेतू. परंपरा ही केवळ वर्तमानात जगण्याची गोष्ट नसते; तिच्या मुळाशी असलेल्या पूर्वसुरींच्या तपश्चर्येचे स्मरण आणि त्यांनी जपलेल्या मूल्यांचे संवर्धनही तितकेच महत्त्वाचे. या महोत्सवातून संस्थेने ही जाणीव जपली आहे.
 
गेल्या सहा-सात वर्षांपासून ‘एमआयडीसी’तील सिद्धिविनायक गणेश मंदिरात, माघी गणेश जन्मोत्सवाच्या आधी सात दिवस कीर्तन महोत्सव आयोजित केला जातो. डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या फडके मार्गावरील गणेश मंदिराशी तर संस्थेचे जिव्हाळ्याचे नाते. ‘अखिल भारतीय कीर्तन कुला’च्या डोंबिवली शाखेपासून, आजच्या ‘डोंबिवली कीर्तन कुला’पर्यंत मंदिराने कायमच संस्थेला प्रोत्साहन दिले. पितृ-पंधरवड्यात संस्थेच्या विद्यार्थ्यांना मंदिराकडून कीर्तनसेवेची संधी दिली जाते. गेली १२ वर्षे ही सेवा अव्याहत सुरू आहे.
 
पितृ-पंधरवड्यानंतर ठाकुर्ली येथील साईबाबा मंदिरात संस्थेच्या वतीने, नवरात्रोत्सवाची कीर्तनसेवा केली जाते. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी काळात कीर्तनांचे आयोजनही संस्थेकडूनच केले जाते. याशिवाय, गेल्या दोन वर्षांपासून संस्थेने एकादशी कीर्तनसेवाही सुरू केली आहे. ‘स्वामींचे घर’ येथे प्रत्येक महिन्यातील पहिली एकादशी साजरी होते. यानिमित्ताने विविध कीर्तनांचे आयोजन केले जाते. धार्मिक उत्सवांना कीर्तनसेवेची जोड देत संस्थेने, वर्षभर विविध ठिकाणी कार्यक्रमांची परंपरा जपली आहे.
आषाढी एकादशीनिमित्ताने डोंबिवली पूर्व येथील शास्त्री सभागृहात ‘पर्वकाळ कीर्तन महोत्सवा’चे आयोजन संस्था करते.
 
डोंबिवलीकरांना नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनश्रवणाचा लाभ मिळावा, या उद्देशाने नामवंत कीर्तनकारांना निमंत्रित केले जाते. आषाढी एकादशी हा अत्यंत महत्त्वाचा पर्वकाळ. अशा वेळी कीर्तनाच्या माध्यमातून संतविचारांचे श्रवण घडविण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. याशिवाय राष्ट्रीय सण, देवर्षी नारद जयंती आणि आद्य शंकराचार्य जयंती असे विविध दिवसही संस्था साजरी करते. संस्थेचा वर्धापन दिनही कीर्तनमय वातावरणाच साजरा केला जातो. या दिवशी डोंबिवलीतील संबंधित कीर्तनकार एकत्र येऊन कीर्तनातील विविध भागांचे सादरीकरण करतात. तसेच संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या चक्रीकीर्तनांचे आयोजनही केले जाते.
 
संस्थेचे हे सर्व उपक्रम सातत्याने सुरू राहावेत, यासाठी आर्थिक व्यवस्थेची उभारणीही करण्यात आली आहे. संस्थेचा कारभार मुख्यतः कीर्तनातील आरतीतून मिळणारी रक्कम, सभासद शुल्क आणि समाजातील दानशूर व्यक्तींकडून मिळणार्‍या आर्थिक सहकार्यातून चालतो. सभासद शुल्क कायमस्वरूपी ५०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. अलीकडे पक्ष अथवा श्राद्धविधी कमी प्रमाणात केले जातात. अशा वेळी जर कोणा दात्यांना श्राद्धविधींऐवजी कीर्तन प्रायोजकत्व घ्यायचे असल्यास, संस्थेने २५ हजार रुपयांची रक्कम निश्चित केली असून, त्याची मुदत ठेव केली जाते. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नाचा उपयोग कीर्तन महोत्सवांच्या आयोजनासाठी केला जातो. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. समाजातील कीर्तनप्रेमी आणि दानशूर व्यक्तींच्या प्रेमबळावरच हा ‘जगन्नाथाचा रथ’ हाकला जात आहे. संस्थेच्या या कार्यासाठी अलीकडेच दि. २५ ऑक्टोबर रोजी ‘वैष्णवी फाऊंडेशन’ने पुरस्कार देऊन गौरवले.
 
कीर्तन ही संतविचारांचा प्रसार करणारी, भक्तिभाव जागविणारी आणि समाजाला सदाचाराची दिशा देणारी परंपरा आहे. नवविधा भक्तीतील कीर्तनाचे स्थान केवळ नामस्मरणापुरते मर्यादित नसून त्यातून श्रवण, चिंतन आणि आचरण यांचीही प्रेरणा मिळते. संतांच्या अभंगवाणीतील तत्त्वज्ञान जीवनात उतरविण्याची आणि अध्यात्माची ओढ निर्माण करण्याची सामर्थ्यशाली परंपरा कीर्तनाने जपली आहे. याचे संवर्धन करण्याचे कार्य संस्था करते आहे. या कार्याला अधिक बळ मिळण्यासाठी कीर्तनावर प्रेम करणार्‍या नागरिकांनी संस्थेला आर्थिक आणि सामाजिक सहकार्य द्यावे, असे आवाहन संस्था कायमच करते. तसेच संस्थेला तरुण आणि समाजातील कीर्तनप्रेमींच्या सेवाकार्याचीही मनीषा आहे. संतवाणीचा स्वर, हरिनामाचा गजर आणि भक्तिरसाचा प्रवाह समाजमनात अखंड राहावा, कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्माचे संस्कार पिढ्यान्पिढ्या रुजत राहावेत आणि या भक्तिपरंपरेचा ज्ञानदीप असाच तेवत राहावा, हीच डोंबिवली कीर्तन कुलाची अपेक्षा.
 
(लेखिका डोंबिवली कीर्तन कुलाच्या अध्यक्षा आहेत.)
लेखिका- अस्मिता देशपांडे
 




संबंधित मजकूर