दादर मेट्रो स्थानकाचे ‘चैत्यभूमी’ नामकरण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती!

 
Dadar Metro Chaityabhoomi Renaming
 
मुंबई (Dadar Metro Chaityabhoomi Renaming) : दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या मागणीला राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली असून, केंद्र सरकारला पत्र पाठविण्यात आले आहे. या प्रक्रियेसंदर्भात केंद्राकडून विधानमंडळाच्या समितीबाबत मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून स्थानकाच्या नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी सुविधा, सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे आढावा बैठक पार पडली. (Dadar Metro Chaityabhoomi Renaming)
 
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने अनुयायी अभिवादनासाठी येत असतात. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षांच्या अनुभवातून निदर्शनास आलेल्या त्रुटी दूर करून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. अनुयायांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. (Dadar Metro Chaityabhoomi Renaming)
 
चैत्यभूमी परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ऑटोरिक्षांच्या प्रवेशावर मर्यादा, अनुयायांच्या पुढील प्रवासासाठी सुविधा आणि वाहतुकीचे पूर्वनियोजन करण्यावर भर देण्यात आला. रेल्वे, रस्ते वाहतूक, स्थानिक वाहतूक व्यवस्था आणि पोलीस यंत्रणांनी एकत्रित नियोजन करून अनुयायांचा प्रवास सुलभ करावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
 
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून मुख्य पुतळ्याच्या कामासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी त्याची भरपाई करण्यास सरकार तयार आहे. उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Dadar Metro Chaityabhoomi Renaming)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर