मनुष्य जन्माची इतिकर्तव्यता परमेश्वराशी असलेले नाते अधिक दृढ करण्यात आहे. संसाराच्या असंख्य जबाबदार्या, सुख-दुःखाच्या प्रसंगात मनाची भगवंताशी असलेली एकरूपता टिकवणे, हेच खरे अध्यात्म! बाह्य साधनेपेक्षा अंतःकरणातील नामस्मरणालाच अधिक महत्त्व आहे. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांनी नाममाहात्म्याचा आधार देत, प्रपंचालाच परमार्थाचे अधिष्ठान देणारा मार्ग म्हटले. नामसाधनेचे मर्म आणि जीवनाच्या आध्यात्मिक प्रयोजनाचा मागोवा घेणारा हा लेख...
सकाळी देवापुढे बसून ‘श्रीराम’ म्हणावं, तर काल राहिलेलं काम आठवतं. अशा वेळी नवख्या साधकाला वाटतं, आपल्याला कुठे जमणार साधना? ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांचं हे ‘कवन’ अशांसाठीच आहे. देवापुढून उठून तुम्ही घरच्या कामाला लागता, तिथेही रामाचं स्मरण कसं सांभाळता येईल, हेच महाराज सांगतात. त्यांच्या शिकवणीत नामाइतकंच,आपण घरातल्या माणसाशी कसं बोलतो, यालाही महत्त्व आहे.
नाम सदा बोलावे, गावे भावे, जनांसि सांगावे|
हाचि सुबोध गुरूंचा, नामापरते न सत्य मानावे॥१॥
सुरुवात अगदी साधी करावी. सकाळी उठल्यावर क्षणभर स्वस्थ बसावं आणि हळू आवाजात प्रेमाने ‘श्रीराम’ म्हणावं. मन दुसरीकडे गेल्यास, लक्षात आल्याक्षणी पुन्हा नाम घ्यावं. यासाठी गळा गोड असण्याची गरज कुठे आहे? आईला हाक मारतान बाळाला सूर सांभाळावा लागत नाही! नामामध्येही हीच भावना अपेक्षित आहे. ‘नामापरते न सत्य मानावे’ म्हणजे, सुखदुःखात अखेरचा भरवसा हा भगवंतावरच ठेवावा. आपल्यालाही त्याचा अनुभव येईल, तसा तो इतरांनाही सांगावा.
नामात रंगुनिया, व्यवहारी सर्व भोग सेवावे|
हाचि सुबोध गुरूंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे॥२॥
साधनेमुळे, म्हणून आवडीचा पदार्थ ताटातून काढून टाकायचा का? तर, नाही! महाराज म्हणतात, आनंदाने खा. घरातील मंगलकार्यातही मनापासून रमा. फक्त एखाद्या दिवशी आवडीचा पदार्थ मिळाला नाही, म्हणून चिडचिड झाल्यास मन कुठे गुंतलं आहे, ते ओळखण्यास शिका. मिळालं त्याचा आनंद घेता यावा आणि मिळालं नाही, तरी मनाची गोडी टिकावी, एवढंच नामाने साधायचं आहे.
आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे|
हाचि सुबोध गुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे॥३॥
‘अनुसंधान’ हा शब्द अवघड वाटतो, पण त्याचा अनुभव परिचयाचाच आहे. लेकरू शाळेत असतं, आई घरच्या कामात असते, तरी वेळ झाली की तिला लेकराची आठवण ही होते. भगवंताशी अशीच जवळीक जडावी. एखादं काम भीतीपोटी लांबणीवर टाकलं असेल, तर रामाचं नाव घेऊन त्याला हात घालावा. ज्याच्यावर राग आहे, त्याचं भलं व्हावं, एवढंच त्याच्याजवळ मागावं.
गोड सदा बोलावे, नम्रपणें, सर्व लोकप्रिय व्हावे|
हाचि सुबोध गुरूंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे॥४॥
देवघरात रघुपतीला प्रेमाने आळवावं आणि बाहेर येताच एखाद्याची चारचौघांत हेटाळणी करावी, यातली विसंगती आपल्याला नेमकी जाणवली पाहिजे. कुणाचीही चूक त्याचा मान राखूनही सांगता येते. आपल्या सहवासात दुसर्यालाही मोकळेपणाने बोलावंसं वाटलं पाहिजे.
स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे|
हाचि सुबोध गुरूंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे॥५॥
‘स्वांतर’ म्हणजे आपलं स्वतःचं अंतःकरण. वर गोड बोलताना काही डाव साधायचा असेल, तर तो आपल्यालाच ठावूक असतो. रात्री नाम घेण्यापूर्वी दिवसातला एखादा प्रसंग आठवावा. कुणाला मुद्दाम टोचून बोललो का? तसं असेल, तर दुसर्या दिवशी त्याची माफी मागावी. अंतःकरण स्वच्छ ठेवण्याचा हा अगदी जवळचा मार्ग आहे.
‘माझा राम सखा, मी रामाचा दास,’ नित्य बोलावे|
हाचि सुबोध गुरूंचा, रामापाशी अनन्य वागावे॥६॥
राम सखा आहे, म्हणून मनातलं सगळं त्याला सांगता येतं. ‘रामा, आज मला मत्सर वाटला,’ एवढंही! मी त्याचा दास असल्याने, त्याला आवडेल असं वागण्याची जबाबदारीही माझीच आहे. सख्याने प्रार्थनेतला संकोच जातो, दास्याने वागण्यात नम्रता येते. असे घेतलेले नाम हळूहळू आपलं वाटू लागतं.
यत्न कसून करिन मी, यश दे, रामा, न दे, तुझी सत्ता|
हाचि सुबोध गुरूंचा, मानावा राम सर्वथा कर्ता॥७॥
या कडव्यात पहिला शब्द आहे, ‘यत्न’. परीक्षार्थीने कसून अभ्यास करावा. आजारी माणसाची सुश्रुषा करणार्याने, औषधाची वेळ सांभाळावी. आपल्या हातचं सगळं केल्यावर ‘आता तुझी सत्ता’ असं रामाला म्हणावं. मग, यश आलं तर कृतज्ञताच वाटते आणि अपयश आलं, तर सुधारण्याची उमेदही शिल्लक राहते.
आचारसंयमाने युक्त असा नीतिधर्म पाळावा|
हाचि सुबोध गुरूंचा, खेळाऐसा प्रपंच मानावा॥८॥
चांगला खेळाडू मन लावून खेळतो आणि डाव हरला, तरी प्रतिस्पर्ध्याशी हात मिळवतोच. प्रपंचात हीच वृत्ती कामाची आहे! व्यवहार चोख करावा, दिलेला शब्द पाळावा. पण, प्रत्येक वादात माझंच खरं, या हट्टापायी जवळचं माणूस गमावू नये.
दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभूसेवा|
हाचि सुबोध गुरूंचा, संतोषा सर्वदा मनी ठेवा॥९॥
वृद्ध वडिलांना जेवायला घालताना देवपूजेला उशीर झाला, तर मनाला हुरहूर लागते. महाराज त्याकडे पाहण्याची दृष्टी देतात. प्रेमाने भरवलेला तो घासही प्रभूसेवाच आहे. घरच्या माणसांची सेवा केली, आज आपल्याकडे त्यासाठीची वेळ आणि बळ होतं ही जाणीव म्हणजेच संतोष!
स्वार्थ खरा साधा रे, नित्य तुम्ही नामगायनी जागा|
हाचि सुबोध गुरूंचा, मीपण जाळोनिया जगी वागा॥१०॥
‘स्वार्थ खरा साधा रे’ म्हणताना महाराज विचारतात, आपलं खरं हित कशात आहे? एखाद्याला आपण मदत केली, नंतर त्याने आपलं नाव घेतलं नाही, म्हणून मन खट्टू झालं. तर सेवेचा आनंदच आपण घालवला. अशावेळी त्याचे हसणं आठवावं, म्हणजे अपेक्षाच सुटेल.
अभिमान शत्रु मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने|
हाचि सुबोध गुरूंचा, मारावा तो समूळ नामाने॥११॥
अभिमान देवघरातही पाठ सोडत नाही. ‘माझा नेम कधी चुकत नाही,’ असं वाटतानाच, दुसर्याच्या भक्तीची परीक्षा घेण्याचा मोह होतो. त्याक्षणी ‘रामा, आज नाम घ्यायची बुद्धी तूच दिलीस,’ एवढंच म्हणावं.
राज्याधिकार येवो, किंवा जावो समस्त धन मान|
हाचि सुबोध गुरूंचा, भंगावे ना कदा समाधान॥१२॥
मान मिळाला की राम विसरायचा आणि अडचण आली की त्याच्याशी अबोला धरायचा, असं आपल्याकडून सहज होतं. महाराज सांगतात, दोन्ही दिवसांत रामाशी बोला. दु:खातही ‘रामा, तू जवळ आहेस,’ असं म्हणता येणं हेच समाधानाचं पहिलं पाऊल.
प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी|
हाचि सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची॥१३॥
१३ कडव्यांचा शेवट महाराज प्रेमाशी करतात. जप किती झाला, मन किती वेळ स्थिर होतं, हे प्रश्न नवख्या साधकाला पडणारच. त्याने सकाळी उठल्यावर रामाचं नाव प्रेमाने घ्यावं. मग, घरात समोर येईल त्या माणसाशी त्याच प्रेमाने बोलावं. यालाही गुरुरायांच्या मनात जागा आहे. इतया साध्या पद्धतीने आध्यात्मिक उन्नती शय आहे. कलियुगात भक्तिचा महिमा सांगितला आहे. नामस्मरणापेक्षा उत्तम साधना नाही, हे तर प्रत्येक सद्गुरूंनी सांगितले आहे. नामाधारे भावसागर पार करण्याची ही सोपी पायवाट, भगवंताचे नाम हृदयस्थ करूनच पार पाडावी, हीच जीवनाची इतिकर्तव्यता!
लेखक- ब्रह्मचैतन्य उदयनाथ महाराज