गीतासार- भाग ३१

    19-Nov-2026

Bhagavad Gita Spiritual Interpretation
 
पुरुजित ‘पुर’ म्हणजे गाव अथवा पिंड शरीर. त्याला उकार लागून ‘पुरु’ शब्द झाला, ‘उ’ म्हणजे श्रेष्ठ अवस्था! जसे पंडपासून पंडु. या पुरुला जिंकून जो आपल्या पिंडाचा स्वामी होतो, त्यास व्यास ‘पुरुजित’ म्हणतात. याच ‘पुरु’ला ‘अव्य’ प्रत्यय लावून, व्यासांनी त्या पुरुरव्याला कौरवांचा पूर्वज दाखविला आहे, जो उर्वशीसाठी वेडा होतो. ‘उरुः + वशी’ म्हणजे उर्वशी, जी श्रेष्ठ साधकालाही वश करते. उर्वशी म्हणजे माया. ‘वेदा’त इंद्रास पुरांचे बांध फोडून, त्यांना वाहविणारा दाखविला आहे. त्यावर तर्क-वितर्क करून विद्वान असे सांगतात की, इंद्र एक जल-अभियंता होता, ज्याने तलावातील पाणी बांध फोडून बाहेर काढले आणि शेतीसाठी मुक्त केले. साधनाहीन तर्क-वितर्क अर्थाचा काय अनर्थ करतील ते सांगता येत नाही. सर्व ‘वेद’, ‘उपनिषदे’, ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘भागवत’ आणि ‘पुराणां’च्या बाबतीत हाच अनर्थ घडला आहे. त्यामुळे प्राचीन वैदिक समाज गुलाम, बुद्धिहीन आणि पौरुषहीन झाला. इंद्र म्हणजे इंद्रियांचा स्वामी, जीवात्मा जो पिंडरूप अवस्थेतील बंदिस्त शक्तींचे बांध फोडून, जीवात्म्याला ज्ञान देतो आणि मुक्त करतो.
 
इंद्रास दहा गावांचा राजा दाखविला आहे. दहा गावे म्हणजे दशेंद्रिये, ज्यांना तो मायेतून मुक्त करतो. स्वर्ग जो ‘सु’ म्हणजे ‘चांगली’, ‘अर्’ म्हणजे गतिमानता आणि ‘गः’ म्हणजेच गमनशील अवस्थेचा निर्देशक. पाश्चिमात्यांनी काहीही कल्पना करावी आणि आपण ती डोक्यावर घ्यावी, हे थांबले पाहिजे. पाश्चिमात्य विद्वानांजवळ वैदिक परंपरेपासून प्राप्त झालेले साधनेचे मुळीच ज्ञान नाही; परंतु वैदिक परंपरेतील आपले विद्वान साधनेने ज्ञान मिळवू शकतात. मग हे अंधानुकरण का? आणि कोठवर चालणार?
 
अशा तर्‍हेने दहा पुरे किंवा गावे म्हणजे ‘दशेंद्रिये’ होत. दशेंद्रियांच्या मर्यादित शक्तींचा बांध फोडून, तो श्रेष्ठ साधक आपल्या इंद्रिय शक्ती वाढवितो. त्यालाच प्रत्येक पुरागणिक, प्रत्येक इंद्रियामार्फत स्वर्गीय सुख प्राप्त होते आणि म्हणून ‘वेद’ अशा दशेंद्रिय शक्तिसंपन्न साधकालाच स्वर्गाचा अधिपती ‘इंद्र’ मानतात. व्यासांचा पुरुजित असाच दशेंद्रिय विजेता इंद्र आहे. प्रचंड शक्तिसामर्थ्याचा पुरुजित पांडव पक्षाकडून उभा राहिल्यास, मग वृत्तीयुद्धात विजय मिळविणे पांडवांना काय कठीण आहे?
 
कुंतिभोज ‘कुंत’ म्हणजे भाल्यासारखे तीक्ष्ण शस्त्र, ज्याद्वारे आपण समोरील कठीण स्तर चिरून पलीकडील सत्यावस्था पाहू शकतो. ‘कुंत’ म्हणजे तीक्ष्ण शस्त्र आणि ‘कुंत’ म्हणजे तीक्ष्ण बुद्धी असलेला, या दृश्य पसार्‍याला चिरून पलीकडील सत्य जाणणारा श्रेष्ठ साधक. याच शब्दातून पांडवांची माता वृत्तीरूप ‘कुंती’ झाली आणि ‘कुंती’ शब्दापासूनच ‘कुंतिभोज’ शब्द उत्पन्न झाला. ‘कुंतिभोज’ म्हणजे ‘परा’ अवस्थेतील ज्ञानरूप भोज सेवन करणारा महान साधक. असला ‘कुंतिभोज’ प्रत्येकजण होऊ शकतो; परंतु त्याकरिता त्यास वृत्तीयुद्धात पांडवांचाच पक्ष घ्यावा लागेल. असा हस्तिनापूर राज्याचा व्यासकृत इतिहास आहे. ‘महाभारता’तील सर्व कथा अशाच अद्वितीय ज्ञानाने ओतप्रोत आहेत. त्यांचा व्यास-आशय मात्र आम्हाला कळायला हवा.
 
व्यासांचा नियोग आणि वैदिक ‘पितृसावर्ण्य’ पद्धती
 
व्यासांनी वर्णन केलेला कौरव कुलवृत्तांत वाचल्यास असे दिसेल की, पित्याचे जे कुल आणि वर्ण (जात) असेल, तोच वर्ण अथवा जात त्याच्याद्वारे उत्पन्न संततीला लागू पडते. म्हणजे, संततीकरिता ‘पितृसावर्ण्य’ पद्धतीचाच त्यात स्वीकार आहे. भीष्माचार्यांचे पिता शंतनुने प्रथम ‘गंगा’ नामक अप्सरेशी लग्न केले. गंगेपासून झालेला आठवा भीष्म ‘पितृसावर्ण्य’ पद्धतीला धरून, शंतनुप्रमाणे क्षत्रिय मानला गेला. शंतनुची दुसरी पत्नी ‘मत्स्यगंधा’ म्हणजे एक कोळीण. तिच्यापासून झालेले पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्यही शंतनुप्रमाणे क्षत्रियच मानले आहेत. परंतु, व्यासांपासून झालेली संतती मात्र वैदिक परंपरेला सोडून, ‘मातृसावर्ण्य’ दिसते. प्रत्यक्ष व्यास हे पराशर ऋषींचे पुत्र असल्याने, ब्राह्मणच दाखविले गेले आहेत. व्यासांनी अपहारित केलेल्या ‘अंबिका’, ‘अंबालिका’ आणि दासीपुत्रीशी नियोग केल्यावर, त्यापासून उत्पन्न प्रजा धृतराष्ट्र, पंडू आणि विदूर व्यासांप्रमाणे ब्राह्मण न होता, त्यांच्या आईप्रमाणे क्रमशः क्षत्रिय आणि दासीपुत्र झाले. ‘अंबिका’ व ‘अंबालिका’ क्षत्रिय म्हणून धृतराष्ट्र व पंडू क्षत्रिय दाखविले आहेत. त्यांना त्याकाळच्या समाज नियमानुसार हस्तिनापूरचे राज्य मिळता कामा नये; परंतु अंध धृतराष्ट्र राजा होतो. पांडवांनाही त्या राज्याचा थोडा भाग मिळतो. दासीपासून झालेला विदूर दासीपुत्र म्हणून राज्याला अयोग्य घोषित केला गेला; परंतु वैदिक परंपरेने स्वीकारलेल्या ‘पितृसावर्ण्य’ पद्धतीला धरून धृतराष्ट्र हस्तिनापूरच्या गादीवर बसूच शकत नव्हता. कारण, तो व्यासपुत्र ब्राह्मण होता. एकाच कुलात ‘पितृसावर्ण्य’ आणि ‘मातृसावर्ण्य’ पद्धती राहू शकत नाही; पण व्यासांनी तसे दाखविले आहे, ज्याचा खरा व्यास-आशय आम्ही जाणला पाहिजे. तद्वत् पांडवही कौरव वंशाचे असून, त्यांना कौरव न संबोधता ‘पंडुपुत्र पांडव’ असे म्हटले आहे. हाच नियम धृतराष्ट्राच्या पुत्रांना का लागू नाही? अर्जुनाला ‘कौंतेय’ आणि ‘पांडव’ म्हटले आहे, तसे कौरवांना का म्हटले नाही? ही ‘मातृसावर्ण्य’ पद्धती म्हणायची की ‘पितृसावर्ण्य’?
 
‘नरपुंगव’ शैब्य
 
पुराणातील शिबी राजाची कथा सर्वांना माहीत आहे. एका अतिथी कपोताकरिता आपल्या शरीराचे मांसखंड कापून, त्यात स्वदेह विसर्जन करणारा राजा शिबी! त्याचा पुत्र म्हणजे शैब्य. शैब्य म्हणजे सत्याकरिता, अतिथीकरिता सर्व स्वार्थत्याग करणारा श्रेष्ठ साधक. असल्या त्यागाला कौरव पक्षात स्थान नसल्याने, शैब्य सत्य पंथ पांडवांकडून लढतो. असल्या शैब्याला गीता ‘नरपुंगव’ म्हणते. असला ‘नरपुंगव’ शैब्य कौरववृत्ती पक्षाचा अवश्य बीमोड करेल.
 
युधामन्यु
 
‘युध’ शब्दापासून ‘युद्ध’, ‘योद्धा’, ‘योध्या’, ‘अयोध्या’ असे शब्द निर्माण झाले. त्याच ‘युध’ शब्दापासून ‘युधामन्यु’ उपशब्द तयार होऊन, असला वीर युधामन्यु पांडव पक्षाचा महाभारत युद्धात साथी झाला. ‘युध’ म्हणजे संघर्ष आणि ‘मन्यु’ म्हणजे क्रोधाला मान्यता देणारा. महाभारत युद्धात असल्या ‘युधामन्यु’ला पांडव पक्षाकडून लढावेच लागते. पांडव आणि कौरव पक्षाकडून लढणारे सर्व योद्धे म्हणजे, त्या पक्षाच्या वृत्तीला साजेशा अशा वृत्ती साधकात असतात, त्यांची ती सुयोग्य व्यासकृत नावे होत. याच ‘मन्यु’ उपशब्दापासून श्रीकृष्णभगिनी सुभद्रेपासून अर्जुनाला झालेला पुत्र अभिमन्यू होय, जो द्रोणाचार्य रचित चक्रव्यूहात मारला गेला.
 
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
लेखक- योगिराज हरकरे
 




संबंधित मजकूर