
मुंबई, दि. १९ : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई मंडळ आणि KINTEL यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वारसा सप्ताह २०२६ च्या निमित्ताने ‘भारत गर्व’ उपक्रमांतर्गत ‘एन्शियंट वंडर्स ऑफ मुंबई’ अर्थात ‘मुंबईतील प्राचीन वास्तू वैभव’ या ऑनलाइन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम बृहन्मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. ही स्पर्धा १९ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार असून, मुंबईतील इयत्ता ५वी ते ९वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल.
जागतिक वारसा सप्ताह २०२६ च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले आणि स्पर्धेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई मंडळाचे अधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. अभिजीत आंबेकर यांनी या उपक्रमामागील संकल्पना आणि डिजिटल माध्यमांद्वारे नव्या पिढीला मुंबईच्या समृद्ध वारशाची ओळख करून देण्याचा उद्देश स्पष्ट केला. KINTEL चे डॉ. आशय सहस्रबुद्धे यांनी ‘भारत गर्व’ उपक्रमाविषयी तसेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणासोबतच्या त्याच्या सहकार्याविषयी माहिती दिली.
मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांनी या उपक्रमासाठी महानगरपालिकेने दिलेल्या सहकार्याची माहिती दिली. मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश खामकर तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे हेही यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई महानगरपालिका आणि KINTEL येथील अनेक प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या वतीने सहाय्यक पुरातत्त्वज्ञ रविराज, संशोधन सहयोगी डॉ. सिद्धी भाठगरा, सर्वेक्षक निलेश सोनवणे आणि छायाचित्रकार राजेश चंदनशिवे, संशोधन सहाय्यक रिया कांबळे उपस्थित होते. स्पर्धेसाठी विषयवस्तूचे संकलन आणि प्रश्नमंजुषेची प्रश्नावली तयार करण्यात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या या पथकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नगरसेवक नवनाथ बन आणि शिक्षण अधिकारी कीर्तिवर्धन किरतकुडवे आणि ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांच्यासह शिक्षण विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते. KINTEL च्या वतीने वेब पोर्टलची रचना करणारे शॉनक देवल आणि माहितीपत्रक तसेच इतर सर्जनशील साहित्याच्या रचनेत योगदान देणाऱ्या समृद्धी चाचड उपस्थित होत्या.
सहा वारसा स्थळांची ओळख
जागतिक वारसा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना मुंबईतील सहा महत्त्वपूर्ण वारसा स्थळांची ओळख करून दिली जाणार आहे. यासाठी विशेष स्वरूपात सहा माहितीपट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक माहितीपट पाहिल्यानंतर त्यातील विषयावर आधारित प्रश्नमंजुषेत विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. या स्पर्धेत एकूण ६० प्रश्नांचा समावेश असेल. पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन दृकश्राव्य सामग्री आणि ऑडिओ गाईड यांच्या माध्यमातून इतिहास व वारसा याविषयीचे शिक्षण अधिक रंजक करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. माहितीपट आणि प्रश्नमंजुषा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये उपलब्ध असतील. दिव्यांग विद्यार्थ्यांनाही या स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी भारतीय सांकेतिक भाषा आणि उपशीर्षकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
स्पर्धेत कसे सहभागी होणार?
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही विशेष उपकरणांची आवश्यकता नाही. संगणक, लॅपटॉप, टॅबलेट किंवा स्मार्टफोन अशा इंटरनेटची सुविधा असलेल्या कोणत्याही उपकरणाद्वारे www.bharatgarv.com या संकेतस्थळावर स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेतील सहभाग पूर्णपणे विनामूल्य असून, ती ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत खुली राहणार आहे. सहभागी शाळांना विविध पुरस्कारांच्या माध्यमातून गौरविण्यात येणार असून, मुंबईत विशेष पुरस्कार वितरण समारंभही आयोजित करण्यात येणार आहे. भविष्यात ‘भारत गर्व’ हा उपक्रम मुंबईच्या पलीकडे नेऊन इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आयोजकांचा मानस आहे.