मुंबई (Torres Scam Main Accused Arrested) : मुंबईतील टोरेस ज्वेलरीशी संबंधित गुंतवणूक फसवणूक आणि मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने युक्रेनचा नागरिक ओलेक्सांद्र झापिचेंको उर्फ अॅलेक्स याला रोमानियातून भारतात आणले. या प्रकरणाच्या तपासात तो प्रमुख आरोपींपैकी एक आहे. ईडीच्या तीन सदस्यीय पथकाने संयुक्त अरब अमिरातीमार्गे रोमानियातून आरोपीला भारतात आणले.
टोरेस ज्वेलरी या नावाने व्यवसाय करणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात सुरू असलेल्या तपासात झापिचेंको हा प्रमुख आरोपी आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आंतरराष्ट्रीय समन्वयासाठी नोडल यंत्रणा म्हणून काम पाहिले. सीबीआयच्या मदतीने प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर झापिचेंकोला भारतात आणण्यात आले.(Torres Scam Main Accused Arrested)
२०२५ मध्ये मुंबईत उघडकीस आलेल्या गुंतवणूक फसवणूकप्रकरणी झापिचेंकोचा शोध सुरू होता. त्याला शोधून भारतात आणण्यासाठी इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईडीच्या पथकाने त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले.
गुंतवणूकदारांकडून जमा झालेली रोख रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित करण्याचे काम झापिचेंको करत असल्याचा आरोप आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर रोख आर्थिक व्यवहार सुलभ करण्यातही त्याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. या व्यवहारांचा संबंध आर्थिक फसवणुकीशी निगडित मोठ्या मनी लाँडरिंग नेटवर्कशी असल्याचा ईडीला संशय आहे.(Torres Scam Main Accused Arrested)
गुंतवणूकदारांकडून जमा झालेली रक्कम अन्यत्र कशी वळवण्यात आली, परदेशातील क्रिप्टोकरन्सी वॉलेट कोणाच्या नियंत्रणाखाली होती आणि हवालाच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार कसे करण्यात आले, याबाबत ईडी त्याची चौकशी करणार आहे. याशिवाय फरार असलेल्या ओलेना स्टोयानसह अन्य आरोपींचा ठावठिकाणा शोधण्याचाही ईडीचा प्रयत्न आहे. गुन्ह्यातून मिळालेली रक्कम परदेशात पाठवण्यासाठी कोणत्या आर्थिक मार्गांचा वापर करण्यात आला, याचाही तपास सुरू आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक