डॉ. थंगजम यांचे कार्य समाजाप्रती कर्तव्यभावनेचा आदर्श! तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे प्रतिपादन

    18-Nov-2026   
 
Thangjam Dhabali Singh One India Award
 
मुंबई (Thangjam Dhabali Singh One India Award) : ‘मानव सेवा हीच माधव सेवा’ या विचाराचे मूर्तिमंत उदाहरण डॉ. थंगजम धबाली सिंह यांच्या कार्यातून पाहायला मिळते. समाजाने आपल्याला दिले आहे, त्यामुळे समाजासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे, ही भावना प्रत्येकाच्या मनात जागृत होणे आवश्यक आहे. मानवतेला स्पर्श करणारे थंगजम यांचे जीवन आणि कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नसून समाजाप्रती असलेल्या कर्तव्यभावनेचा आणि सेवाभावाचा आदर्श आहे, असे प्रतिपादन तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.
 
ईशान्य भारतातील नागरिकांशी देशबंधाचा धागा अधिक मजबूत करणाऱ्या आणि सामाजिक एकात्मतेसाठी कार्यरत असलेल्या 'माय होम इंडिया' या संस्थेला यंदा २१ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संस्थेचा अत्यंत प्रतिष्ठित असा १७ वा 'वन इंडिया अवॉर्ड' सोहळा आगामी मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:०० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर येथे पार पडला.(Thangjam Dhabali Singh One India Award)
 
याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री भाई गिरकर, प्रसिद्ध एंडोक्राइनोलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट आणि संशोधक पद्मश्री डॉ. शशांक जोशी, माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर, संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी उपस्थित होते. मणिपूरचे ख्यातनाम पॅथॉलॉजिस्ट, उद्योजक आणि संस्था-निर्माते डॉ. थंगजम धबाली सिंह यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल यावर्षीचा 'वन इंडिया अवॉर्ड' प्रदान करण्यात आला.
 
उपस्थितांना संबोधित करताना राजेंद्र आर्लेकर पुढे म्हणाले, मणिपूरमधील थंगजम यांचा ‘हॉस्पिटल ते हॉस्पिटॅलिटी’ हा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. इम्फाळमधून वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांना अमेरिकेत जाऊन काम करण्याची संधी उपलब्ध होती. मात्र, परदेशातील आकर्षक संधी नाकारून त्यांनी मणिपूरसारख्या आपल्या मायभूमीतच कार्य करण्याचा निर्णय घेतला. आर्थिक स्थैर्य आणि उज्ज्वल भविष्याच्या अपेक्षेने अनेक डॉक्टर आणि अभियंते परदेशाची वाट धरतात. मात्र, थंगजम यांनी आपल्या मातृभूमीशी असलेली नाळ जपली आणि समाजासाठी योगदान देण्याचा मार्ग निवडला.(Thangjam Dhabali Singh One India Award)
 
माजी मंत्री भाई गिरकर यावेळी म्हणाले की, देशभक्ती आणि सामाजिक समरसतेचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य सुनीलजी ‘माय होम इंडिया’ या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सातत्याने करीत आहेत. एखादे सामाजिक कार्य उभे करणे ही एक गोष्ट असते; परंतु अनेक वर्षांच्या परिश्रमातून उभा केलेला हा कार्याचा प्रपंच नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि तरुण-तरुणींना या कार्याशी जोडून घेणे, हे त्याहून मोठे आव्हान असते. सुनीलजींनी हे आव्हान समर्थपणे पेलले आहे. ईशान्य भारतातील नागरिकांमध्ये भारतीयत्वाची भावना अधिक दृढ करणे, त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव निर्माण करणे आणि देशाच्या मुख्य प्रवाहाशी भावनिक नाते जोडणे, हे महत्त्वपूर्ण कार्य ते करीत आहेत. आजच्या काळात तरुण पिढीला राष्ट्रनिर्माणाच्या कार्याशी जोडणारे आणि ईशान्य भारत व उर्वरित भारत यांच्यात भावनिक एकात्मतेचा सेतू निर्माण करणारे हे कार्य निश्चितच अत्यंत मोलाचे आणि अभिनंदनीय आहे.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील देवधर यांनी केले. ते म्हणाले, मणिपूरची भौगोलिक रचना समजून घेतली, तर मणिपूर हे एखाद्या बाऊलसारखे आहे. चारही बाजूंनी डोंगराळ प्रदेश आणि मध्यभागी दरीत वसलेली लोकवस्ती, अशी त्याची रचना आहे. आज मणिपूर एका गंभीर संकटातून जात आहे. तेथील सामाजिक सलोखा आणि शांतता धोक्यात आली आहे. हिंसाचारामुळे अनेक कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले आहे. हिंदू समाजातील अनेक नागरिकांनाही आपली घरे सोडून पलायन करावे लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटामागील विविध राजकीय, सामाजिक आणि संघटित घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. मणिपूरमध्ये सुमारे ४५ आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे. एवढी मोठी सांस्कृतिक आणि वांशिक विविधता असलेल्या या प्रदेशात शांतता, परस्पर विश्वास आणि सामाजिक ऐक्य टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.(Thangjam Dhabali Singh One India Award)
 
ते म्हणाले, दहशतवाद, अमली पदार्थांची तस्करी आणि इतर समाजविघातक घटनांमुळे मणिपूरसमोर अनेक गंभीर आव्हाने उभी आहेत. त्यातच आरोग्य सुविधांचा अभाव ही एक मोठी समस्या आहे. अनेक भागांमध्ये मूलभूत वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत थंगजम यांनी आरोग्य क्षेत्रात पुढाकार घेऊन आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. संकटग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. मणिपूरमधील परिस्थिती केवळ एका राज्यापुरती मर्यादित समस्या नाही. ईशान्य भारतातील सामाजिक स्थैर्य, राष्ट्रीय एकात्मता आणि सीमावर्ती भागांची सुरक्षितता या व्यापक दृष्टिकोनातूनही तिच्याकडे पाहण्याची गरज आहे.
 
मणिपूरचे सुपुत्र थंगजम यांचा कार्यानुभव ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक सभागृहात उपस्थित होते
 
माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि माझ्याशी संबंधित सर्व संस्थांच्या वतीने हा पुरस्कार मी अत्यंत नम्रतेने स्वीकारतो. माझ्या जीवनप्रवासात ज्यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिले, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि ज्यांच्या पाठिंब्यामुळे मी आजवरचा प्रवास करू शकलो. मी मणिपूरमधील इम्फाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर चंदीगड येथील पीजीआयमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९७० च्या दशकात मणिपूरमध्ये केवळ एकच वैद्यकीय महाविद्यालय होते. मात्र, आज या छोट्याशा राज्यात चार वैद्यकीय महाविद्यालये आहेत. सुमारे ३० लाख लोकसंख्या असलेल्या मणिपूरसाठी ही निश्चितच उल्लेखनीय प्रगती आहे. गेल्या काही दशकांत वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात झालेला हा विकास समाधानकारक आहे. इम्फाळ येथील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महत्त्वाची वैद्यकीय संस्था आहे. या संस्थेने ईशान्य भारतातील वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे.(Thangjam Dhabali Singh One India Award)
- डॉ. थंगजम धबाली सिंह
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर