जिद्द, चिकाटी आणि शिस्तीच्या जोरावर वयाच्या कोवळ्या टप्प्यातच राष्ट्रीयस्तरावर कर्तृत्वाची मोहोर उमटवणार्या सार्थक गावडे याच्याविषयी...
देशाच्या प्रगतीची चर्चा करताना रस्ते, इमारती, उद्योग आणि तंत्रज्ञानाचा उल्लेख आवर्जून होतो. पण, या सगळ्यांच्या जोडीला देशाला पुढे घेऊन जाणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुणाई! या पिढीच्या डोळ्यांत स्वप्ने असतात, मनात काहीतरी करून दाखवण्याची ऊर्मी असते आणि त्या स्वप्नांच्या मागे धावण्याची उमेदही. भारताच्या बाबतीत तरुणाईचे हे सामर्थ्य विशेष महत्त्वाचे. आज भारतीय तरुण शिक्षणापासून संशोधनापर्यंत आणि कलेपासून क्रीडा क्षेत्रापर्यंत, आपापल्या परीने नवी वाट चोखंदळत आहेत. खेळाच्या मैदानावर उतरलेला तरुण एखादे पदक जिंकतो, तेव्हा त्याचे यश व्यक्तिगत नसते. राष्ट्रालाही त्याच्या यशाने आनंद होतो. अशाच क्रीडा क्षेत्रात स्वतःची वाट शोधणार्या तरुणांपैकी एक म्हणजे सार्थक गावडे!
सार्थकचा जन्म वडाळ्यातला. २००८ मध्ये जन्मलेल्या सार्थकचे बालपण वडाळ्यातील सरकारी क्वार्टर्समध्येच गेले. सार्थकचे वडील शरद हे ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’मध्ये सरकारी नोकरीमध्ये, तर आई शिवानी गृहिणी. सुरुवातीपासूनच शिक्षणाची आवड असलेल्या सार्थकच्या पालकांनी दादरच्या प्रसिद्ध बालमोहन विद्यामंदिरमध्ये प्रवेश घेतला. सार्थकला बालपणापासूनच खेळाची आवड प्रचंड. शाळेतही त्याचे मन अभ्यासापेक्षा खेळातच अधिक रमे. पण, पाचवीपर्यंत त्याची खेळाची ही आवड सीमितच होती. खेळाच्या तासाला मैदानावर जावे आणि तास संपेपर्यंत मनसोक्त खेळावे, हाच त्याचा शिरस्ता!
त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, ती इयत्ता सहावीत. क्रिकेटची आवड असलेल्या सार्थकने थोडी वेगळी वाट निवडली. सार्थकने क्रिकेटचे कौशल्य सुधारावे, या विचाराने ‘बेसबॉल’ शिकण्यास सुरुवात केली. बालमोहन विद्यामंदिरमधील इखणकर सर आणि सरोदे यांनीच त्याच्यातील प्रतिभा हेरली. त्यांनीच सार्थकला या खेळाचे धडेही दिले. मात्र, जसजसा सार्थक खेळू लागला, तसे त्याच्या मनातील क्रिकेट खेळण्याचे विचार बाजूला पडले व ‘बेसबॉल’च त्याचा आवडता खेळ ठरला. सहावीमध्ये खेळण्यास सुरुवात केलेला सार्थक नित्यनेमाने सरावास प्राधान्य देत असे. त्यामुळे अल्पावधीतच त्याने खेळातील बारकावे आत्मसात केले. सार्थक ‘कॅचर’ असून, प्रसंगी तो खेळातील पडेल ती भूमिका निभावण्यासाठी सज्ज असतो.
सार्थकचा सराव उत्तम सुरू होता. भविष्यात काही संधी आणि मोठ्या स्पर्धा खेळण्याची स्वप्ने सार्थकला पडू लागली आणि जगभरात ‘कोविड’ने हाहाकार माजवला. ‘कोविड’मुळे देशातही ‘लॉकडाऊन’ लागला. परिणामी, शाळा-महाविद्यालये बंद आणि खेळाचा सरावही. याकाळात शाळा ‘ऑनलाईन’ सुरू असल्याने अभ्यास होत होता. मात्र, खेळाचा सराव मात्र रखडलाच होता. ‘लॉकडाऊन’नंतर शाळा सुरू झाली, तेव्हा सार्थक होता इयत्ता नववीमध्ये!
मधला काळ घरी बसून आलेली मरगळ झटकत सार्थक पुन्हा सरावाला लागला. यावेळी आव्हान अधिक मोठे होते. नववीसारखे अभ्यासाचे वर्ष आणि दुसरीकडे खेळात यश संपादण्याचे स्वप्न. यशाला मेहनतीशिवाय पर्याय नसतो, हेच सार्थकने लक्षात ठेवले. सकाळी ५ वाजता उठून शाळेत जाणे, त्यानंतर सराव आणि अभ्यास असे करून रात्री ९ वाजता घरी येणे, अशीच दिनचर्चा दीर्घकाळ सार्थकची होती. या सगळ्या काळात मनाबरोबरच त्याच्या शारीरिक कणखरतेसाठी सार्थकच्या आईने विशेष मेहनत घेतली होती.
मात्र, ही त्याची मेहनत सार्थकी लागली. शालेयस्तरावरील सामन्यातून सार्थकची राज्यस्तरीय सराव चाचणीसाठी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यातील चांगल्या कामगिरीमुळे त्याला पुढील वर्षी छत्तीसगढ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतही सहभागी होण्याची संधी मिळाली. पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली, ते वर्ष हे सार्थकच्या दहावीचे वर्ष होते. समोर असलेली दहावीची पूर्वपरीक्षा आणि राष्ट्रीय स्पर्धा यांपैकी एक निवडण्याचा यक्षप्रश्न सार्थकसमोर उभा ठाकलाच होता. मात्र, शाळेने पुढाकार घेत, सार्थकची पूर्वपरीक्षा नंतर घेण्यास मान्यता देत, त्याला राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहन दिले. हा क्षण प्रेरणादायी असल्याचे सार्थक नम्रपणे नमूद करतो. आजवर सार्थकने ‘बेसबॉल’च्या तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, त्यांपैकी एकामध्ये सुवर्णपदकही मिळवले आहे, तर अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत, रौप्यपदके पटकावली आहेत.
खेळातच मन रमत असलेल्या सार्थकने दहावीमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांची कमाई केली, हे विशेष असेच. सध्या त्याने रूपारेल महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतला असून, पुढे खेळातच करिअर करण्याचे त्याचे ध्येय आहे. आज ‘बेसबॉल’ हा खेळ भारतात लोकप्रिय होत असून, त्यात असंख्य संधी आहेत. त्यामुळे भविष्यात या संधी साधत, आंतराष्ट्रीय स्तरावर देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न सार्थकने बाळगले आहे. सार्थक गावडे याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
लेखक- कौेस्तुभ वीरकर