रोहित पवारांचा ‘राऊत पॅटर्न’

    18-Nov-2026

Rohit Pawar Raut Pattern
 
रोहित पवारांची उथळ वक्तव्ये पाहता, त्यांनी संजय राऊतांना आपला आदर्श मानला असावा, असे वाटते. कसलाही शेंडाबुडखा नसलेले आरोप करून उगाचच सनसनाटी माजविणे, हा राऊतांचा आवडता खेळ. कारण, तसे केले नाही, तर त्यांच्याकडे कोणी लक्षच देणार नाही. पण, आपल्या वक्तव्यांमुळे राऊतांनी त्यांचा उरलासुरला पक्षही संपुष्टात आणला, हे रोहित पवारांनी लक्षात घ्यावे.
 
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांकडे फारसे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. कारण, रोहित पवार यांना त्यांच्या वर्तुळातील पत्रकार-नेते सोडले, तर कोणीच गांभीर्याने घेत नाही, हे सोडा. पण, सर्वोच्च नेत्याला लक्ष्य केले की, आपोआप प्रसिद्धी मिळते, हे रोहित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. एरव्ही, त्यांना प्रसिद्धी देण्यासारखे काही काम त्यांच्या हातून घडत नाही. शिवाय, ते सध्या ज्या राजकीय संगतीत वावरत आहेत ते पाहता, त्यांच्याकडून यासारखे बिनबुडाचे आणि उथळ आरोप करणेच अपेक्षित आहे.
 
आता अजितदादा यांचा मृत्यू हा घातपात होता, असे गृहीत धरून रोहित पवार यांनी ‘व्हीसीआर’ या विमान कंपनीच्या मालकांना दोषी धरले आहे. अजितदादा हे ज्या ‘व्हीसीआर’ विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करीत होते, त्या कंपनीच्या मालकांना मुख्यमंत्री फडणवीस हे संरक्षण देत असल्याचा बिनबुडाचा आरोप रोहित पवारांनी केला. त्यासाठी या मालकांबरोबर असलेली फडणवीसांची छायाचित्रे हा पुरावा असल्यासारखे पवार यांनी म्हटले. पण, याच विमान कंपनीच्या विमानातून स्वत: रोहित पवार यांनीही अनेकदा प्रवास केला आहे, त्याच्याही व्हिडिओ फिती उपलब्ध आहेत. त्यावर रोहित पवार यांना काय म्हणायचे आहे? आणि वादग्रस्त व्यक्तींबरोबर छायाचित्रे असलेले अनेक नेते देशात आहेत. त्याचा अर्थ, हे नेते या व्यक्तींच्या गुन्ह्यात सहभागी होते, असा होत नाही.
 
नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात अजितदादांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण झाले. तेव्हाही फडणवीस यांनी ही गोष्ट स्पष्ट केली की, या दुर्घटनेच्या चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तरीही, रोहित पवार यांनी हे आरोप केले आहेत. यावरून त्यांना या मृत्यूचे राजकीय भांडवल करायचे आहे, हे अगदी स्पष्ट होते.
 
मुळात अजितदादा पवार यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात, ही गोष्टच अजून स्पष्ट झालेली नाही. ज्याप्रकारे ही दुर्घटना घडली ते पाहता, हा एक अपघातच होता, असेच म्हणावे लागेल. त्या दुर्घटनेची चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशीचा अहवाल सादर झाला की, सत्य काय ते कळेलच. पण, तोपर्यंत राजकीय कुरघोडी करण्याची घाई झालेले रोहित पवार यांच्यासारखे नेते वारंवार त्याबद्दल पूर्वग्रहदूषित आणि राजकीय स्वरूपाची वक्तव्ये करीत आहेत. वास्तविक, अजितदादांच्या मृत्यूनंतर स्वत: शरद पवारांनीच हा फक्त अपघातच होता, असे जाहीर केले होते. त्यामुळे खरेतर हा वाद उत्पन्नच होण्याची गरज नव्हती. सुप्रिया सुळे यांनीही याबाबत शंका व्यक्त केलेली नाही. पण, रोहित पवार यांना प्रसिद्धीझोतात राहण्याची लालसा निर्माण झाली आहे. त्यामुळे ते सतत कोणत्या ना कोणत्या निमित्ताने झळकण्यासाठी सरकारविरोधात भूमिका घेताना दिसतात.
 
फडणवीस आणि अजितदादांचे संबंध हे सौहार्दाचे आणि मित्रत्वाचे होते. त्यामुळेच अजितदादा हे महायुतीत सहभागी झाले. शिवाय, शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्याशिवाय आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होणार नाहीत, हे लक्षात आल्यावर ते फडणवीस यांच्याकडे आले. वास्तविक, विधानसभेतील बहुमतासाठी अजित पवार यांच्या गटातील आमदारांची तत्कालीन फडणवीस सरकारला गरज नव्हती. कारण, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी त्यांची युती होती आणि त्यांच्याकडे बहुमत होते. मात्र, अमित शाह यांनी रास्तपणे म्हटले की, "अजितदादांच्या सहभागामुळे युती सरकारला ठाम स्थैर्य लाभले.” आपल्या मनातील ‘विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न हे फडणवीस सरकारशी सहयोग करूनच प्रत्यक्षात उतरेल, हे अजितदादा यांना जाणवले, तेव्हा ते या युतीत आले. पण, त्यामुळे शरद पवार यांच्याबरोबर राहिलेल्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे महत्त्वच संपुष्टात आल्याने या गटात अस्वस्थता निर्माण झाली. रोहित पवार यांचेही राजकीय भवितव्य अधांतरी झाल्याने ते आता संधी मिळेल, तेव्हा फडणवीस सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवाय, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाल्यामुळे त्यात खोडा घालण्यासाठी रोहित पवारांनी हे आरोप केले असावेत, असे मानण्यास जागा आहे. पण, रोहित पवारांच्या या आरोपांचे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील कोणत्याही नेत्यांनी समर्थन केलेले नाही, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. तसे पाहिले, तर रोहित पवारांना त्यांच्या काकांबद्दल इतकीच आस्था होती, तर ते हयात असताना त्यांच्यावर त्यांनी इतके आरोप का केले? याचेही उत्तर द्यावे.
 
एकूणच रोहित पवारांची वक्तव्ये आणि त्यांनी केलेले आरोप पाहता, त्यांनी संजय राऊतांना आपला आदर्श मानला आहे की काय, अशी शंका येते. कसलाही शेंडाबुडखा नसलेले आरोप करून उगाचच सनसनाटी माजविणे, हा राऊतांचा आवडता खेळ आहे. तसे केले नाही, तर आपल्याकडे कोणीच लक्ष देणार नाही, हे राऊत यांना पक्के ठाऊक आहे. परिणामी, प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी त्यांना रोज उठून अशी वक्तव्ये करावी लागतात. मराठी इलेट्रॉनिक वृत्तवाहिन्यांना फक्त सवंग आणि स्वस्त करमणूक हवी असते. कारण, ‘शोध पत्रकारिता’ करण्याची क्षमता त्यांच्याकडील कथित पत्रकारांमध्ये नाही. तेव्हा अशा अकलेचे दिवाळे निघालेल्या राऊतांसारख्या नेत्यांच्या उथळ आरोपांना प्रसिद्धी देऊन चर्चेत राहण्याचा सोपा पर्याय त्यांनी निवडला आहे. पण, संजय राऊतांनी आपल्या वक्तव्यांनी त्यांचा उरलासुरला पक्षही संपुष्टात आणला, हे रोहित पवार यांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्यांनाही राऊतांप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे विसर्जन अपेक्षित आहे का? आपल्या बेलगाम आरोपांच्या विना‘ब्रेक’च्या ‘एसप्रेस’ गाडीमुळे आपले राजकीय करिअर कायमचे रुळांवरून घसरेल, हे रोहित पवारांच्या जितके लवकर लक्षात येईल, तितकेच ते त्यांच्या हिताचे!
 




संबंधित मजकूर