सह्याद्रीच्या व्याघ्र रक्षणासाठी यापुढे वणवा लावणार नाही: ग्रामस्थांनी घेतली सामूहिक शपथ

    18-Nov-2026

sahyadri tiger reserve


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे (sahyadri tiger reserve). आंबा वनपरिक्षेत्रातील उखळू पैकी आंबाईवाडा धनगरवाड्यातील ग्रामस्थांनी जंगलात वनवा न लावण्याची सामूहिक शपथ बुधवार दि. १८ नोव्हेंबर रोजी आंबाई देवीच्या मंदिरासमोर घेतली (sahyadri tiger reserve). तसेच वनवा लावण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास तातडीने वनविभागाला कळविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. (sahyadri tiger reserve)
 
सह्याद्री व्याघ्र राखीव अंतर्गत आंबा वनपरिक्षेत्रातील जंगलांमध्ये वनवा प्रतिबंध आणि वनसंपत्तीचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने वनविभागाच्या वतीने आंबाईवाडा धनगरवाड्यात जनजागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मागील वर्षी या परिसरातील वनक्षेत्रात आग लागण्याची घटना घडली होती. या प्रकरणी वनविभागाने संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली होती. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि ग्रामस्थांमध्ये वनसंरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.
 
या बैठकीत वनव्यामुळे जंगलातील मोठ्या वृक्षांसह लहान रोपे, वन्यप्राणी आणि पक्ष्यांच्या अधिवासाचे नुकसान होते. तसेच जंगलातील जैवविविधता आणि नैसर्गिक जलस्रोतांवरही त्याचे गंभीर परिणाम होतात, याविषयी ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. जंगलाला लागणारी आग ही केवळ वनसंपत्तीची हानी नसून सह्याद्रीतील वन्यजीवांच्या अस्तित्वासाठीही धोकादायक असल्याचे पटवून देण्यात आले. यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी भविष्यात जंगलात कोणत्याही प्रकारे आग लावणार नाही, अशी सामूहिक शपथ घेतली. तसेच अन्य कोणी वनवा लावत असल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने वनविभागाला माहिती देऊन वनवा प्रतिबंधाच्या कामात सहकार्य करण्याची ग्वाही दिली. जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ वनविभागाची जबाबदारी नसून स्थानिक नागरिकांच्या सहभागातूनच ते अधिक प्रभावीपणे साध्य होऊ शकते, हा संदेश या बैठकीतून देण्यात आला.

या बैठकीस आंबा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक सुभाष वसावे, माजी सरपंच राजाराम मुटल, विलास पाटील, विकास पाटील, विठ्ठल झोरे, माजी उपसरपंच निवृत्ती खोत, दीपक गावडे, ग्रामपंचायत सदस्य नथूराम खोत, जनार्दन गावडे, तुकाराम झोरे गुरुजी यांच्यासह धनगरवाड्यातील ग्रामस्थ आणि वनसेवक उपस्थित होते.




संबंधित मजकूर