करिता कुळाचा असा उद्धार!

    18-Nov-2026   

Rahul Gandhi Controversial Statement
 
घरातल्या बर्‍यावाईट गोष्टी, पैशाअडक्याच्या चर्चा या चार भिंतींमध्येच राहाव्या, तसेच एरव्ही संवाद साधताना वाणीवर संयम ठेवावा, असा अगदी चाणक्यांपासून उपदेश देणारी आपली भारतीय संस्कृती. कारण, अशा कौटुंबिक, वैयक्तिक बाबी जेव्हा घराबाहेर चर्चिल्या जातात, सार्वजनिक होतात, तेव्हा कुटुंबही नाहक संकटात सापडू शकते. पण, गांधी कुटुंबाचे कुलदीपक राहुल गांधी यांचा म्हणा भारतीय संस्कृतीशी मुळी दुरान्वयेही संबंध नसल्यामुळे संस्कार वगैरेची अपेक्षाही करणे गैरच! कारण, ५६ वर्षीय राहुल गांधींना खरोखरच भारतीय संस्कार, नीतिमूल्ये आणि नैतिकतेचे यत्किंचितही भान असते, तर आपल्या आईच्या आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात त्यांची जीभ अशी घसरली नसती! कारण, परवा त्या सोहळ्यात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "माझी आई घरी जेवताना माझ्या वडिलांच्या मांडीवर बसायची. मात्र, जेव्हा मी इतर मित्रांच्या घरी जायचो, तेव्हा त्यांच्या घरी असे चित्र मला कधीही दिसायचे नाही. मग मी त्यांना याबाबत विचारणा करायचो.” राहुल गांधींचे हे विधान ऐकल्यानंतर सोनिया गांधींसह उपस्थितांच्या चेहर्‍यावरचा रंगच उडाला. पहिल्या रांगेत बसलेल्या माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांचा चेहरा तर असे काही विचित्र, अभद्र ऐकल्याचे क्षणभरही लपवू शकला नाही. पण, आपल्याच सुपुत्राने आपल्याच आयुष्यातील इतकी खासगी बाब सार्वजनिक केल्याने सोनिया गांधींनाही मनातल्या मनात शरमेने मेल्याहून मेल्यासारखे झाले असेल; पण त्यांनी ते हसण्यावारी कसेबसे निभावून नेले.
 
खरेतर कोणाच्याही खासगी आयुष्यात डोकावण्याचा कुणाला अधिकार नाहीच. पण, प्रश्न जेव्हा देशाच्या राजकीय परिघात केंद्रस्थानी असलेल्या कुटुंबाचा येतो, तेव्हा त्याचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अन्वयार्थही ध्यानात घ्यावे लागतात. सोनिया आणि राजीव गांधींवरील पाश्चात्त्य जीवनशैलीचा पगडा हा तसा सर्वश्रुत. साहजिकच, तेच संस्कार पुढे दोन्ही मुलांवरही झाले. मग पाश्चात्त्य जीवनपद्धती अंगात भिनलेले हे कुटुंब भारतीय संस्कार, जीवनमूल्यांचा सन्मान करून, त्यांना केंद्रस्थानी ठेवून सरकारी नीतिधोरणे ठरवेल, ही अपेक्षाच मुळी फोल ठरावी आणि काँग्रेसच्या आजवरच्या शासनकाळात झालेही अगदी तसेच!
 
वाचाळवीराचा हा आजार...
 
त्यामुळे ‘सेक्युलॅरिझम’चे भूत, हिंदू संस्कृतीला मागास समजून त्याचा पराकोटीचा द्वेष, रामाचे अस्तित्वच अमान्य असणे, मुस्लिमांचे तुष्टीकरण या सगळ्याचे मूळ कुठे असेल; तर ते गांधी कुटुंबाच्या पाश्चात्त्य विचारसरणीत! आधीही म्हटल्याप्रमाणे, कुणी कुठली जीवनपद्धती अंगीकारावी, हा ज्याचा-त्याचा प्रश्न. परंतु, सार्वजनिक आयुष्यातील, भारतीयांसाठीचे निर्णय जेव्हा अशा पाश्चात्त्य चष्म्यातून घेतले जातात, तेव्हा त्याचे आघात देशालाही सहन करावे लागतात. कारण, हे पाश्चात्त्यीकरण केवळ गांधी घराण्यापुरते मर्यादित न राहता, काँग्रेस पक्षात, नेत्यांमध्ये आणि देशाच्या सांस्कृतिक धोरणांतही आपसूकच झिरपले. त्यामुळे संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ ऐकून सोनिया गांधींचा पराकोटीचा जळफळाट का झाला असेल, त्याचे उत्तर हे इथे दडलेले! असो. राहता राहिला प्रश्न राहुल गांधींचा; तर कुठे, काय, किती बोलावे आणि काय अजिबात बोलू नये, याचे साधे भानही या विरोधी पक्षनेत्याला नाही. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत असे अपरिपक्वतेचे दर्शन वारंवार घडल्यामुळे त्यांच्यावर ‘पप्पू’चा शिक्का बसला तो कायमचाच! ते म्हणतात ना, ‘वाचः शौचं च मनसः शौचमिन्द्रियनिग्रहः|’ म्हणजेच, वाणीची शुद्धता आणि संयम हेच सर्वांत मोठे तप आहे. कारण, अनियंत्रित वाणीने माणसाचा नाश होतो. पण, राहुल गांधींना पंतप्रधानपदी बसवू पाहणार्‍यांनी आतातरी हे लक्षात घ्यावे की, अशी वाचाळवाणी असणारी व्यक्ती केवळ स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबाचाच नव्हे; तर अगदी देशाचाही नाश घडवून आणू शकते. कारण, देशाविषयीची संवेदनशील, गुप्त माहिती उघड केल्यास, त्याचे संपूर्ण देशालाच गंभीर परिणाम भोगावे लागतील.
 
म्हणूनच तर, भारताच्या हितशत्रूंना राहुल गांधींसारखा विवेकशून्य, वाचाळ आणि पाश्चिमात्य विचारांवर पोसलेला एक ‘कठपुतळी पंतप्रधान’ खुर्चीवर बसवायचा आहे. देशाला अस्थिरतेच्या दरीत ढकलून, भारतालाच उद्ध्वस्त करण्याचेच हे एक षड्यंत्र! एकूणच काय, तर जो आपल्या आईच्या आयुष्यातील खासगी प्रसंग भाबडेपणाच्या बुरख्याआड असा सार्वजनिक करू शकतो, त्याच्या हाती खरोखरच देशाची सूत्रे सुरक्षित राहतील, अशी आशा बाळगणार्‍यांचे डोळे आतातरी उघडतील का?
 




विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची
संबंधित मजकूर