‘जेन-झी’मधील भावनिक अस्थिरता : ‘ओव्हर पॅरेंटिंग’ची भूमिका

    18-Nov-2026

Overparenting and Gen Z Mental Health
 
किशोरवयीन मुलांमध्ये ताणतणाव आणि चिंता आढळतात; हे आपण अनेक वर्षांपासून जाणतो. मात्र, ‘जेन-झी’मधील म्हणजेच, तारुण्यातून प्रौढत्वाकडे वाटचाल करणार्‍या उदयोन्मुख प्रौढ तरुणांमध्येही ताण, एकटेपणा आणि सामाजिक एकटेपणा मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. त्यानिमित्ताने...
 
अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन’च्या (२०२०) सर्वेक्षणानुसार, ‘जेन-झी’, १३ ते १७ वर्षे वयोगटांतील किशोरवयीन आणि १८ ते २३ वर्षे वयोगटांतील तरुण, अभूतपूर्व अनिश्चिततेचा सामना करत आहेत. त्यांच्यामध्ये वाढलेला मानसिक ताण, नैराश्याची लक्षणे आणि भविष्याबद्दलची असुरक्षितता प्रकर्षाने दिसते. अशा परिस्थितीत त्यांच्या भावनिक विकासाचा विचार करताना बाह्य सामाजिक घटकांबरोबरच; कुटुंबातील वातावरण, पालकांच्या अपेक्षा, अतिसंरक्षण आणि मुलांच्या आयुष्यातील वाढता हस्तक्षेपाचाही विचार करणे आवश्यक ठरते. विशेषतः मुलांना प्रत्येक अडचणीपासून वाचवण्याच्या प्रयत्नात पालक त्यांच्या भावनिक स्वावलंबनाच्या विकासात अडथळा निर्माण करत आहेत का, हा प्रश्न महत्त्वाचाच!
 
आजच्या पालकत्वात ‘हेलिकॉप्टर पालकत्व’ आणि ‘स्नोप्लो पालकत्व’ या दोन संकल्पना विशेषत्वाने चर्चेत आहेत. ‘हेलिकॉप्टर पालकत्वा’मध्ये पालक मुलांच्या आयुष्याभोवती सतत घिरट्या घालत असतात. कोणतीही अडचण दिसताच हस्तक्षेप करतात, तर ‘स्नोप्लो पालकत्वा’मध्ये मुलांच्या मार्गातील प्रत्येक अडथळा आधीच दूर करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून त्यांना कोणत्याही संघर्षाला सामोरेच जावे लागू नये. या दोन्ही प्रवृत्तींच्या मुळाशी जरी मुलांविषयीचे प्रेम असले, तरी यामुळे मुलांची संकटांना तोंड देण्याची नैसर्गिक क्षमताच बाधित होऊ शकते. एका अभ्यासात असेही आढळले की, अतिसंरक्षणात्मक वातावरणात वाढलेल्या मुलांना स्वतःच्या भावना आणि वर्तन नियंत्रित करण्यात, सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेण्यात आणि स्वतंत्र निर्णय घेण्यात अडचणी येऊ शकतात. याचप्रमाणे विविध युरोपीय देशांमध्ये केलेल्या अभ्यासात पालकांचे अतिसंरक्षण आणि किशोरवयीन मुलांमधील चिंताविकार यांच्यात सातत्यपूर्ण संबंध आढळला. पालकांच्या अतिसंरक्षणाला प्रतिसाद म्हणून मुले अनेकदा स्वतःच्या इच्छांपेक्षा पालकांच्या अपेक्षांना प्राधान्य देतात आणि त्यांचे म्हणणे निमूटपणे मान्य करतात. या बदलांमागील हेतू मुलांचे हित जपण्याचा असला, तरी त्यातून त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याच्या क्षमतेवर मर्यादा येण्याची शक्यता आहे. त्यांच्या सामाजिक आणि मानसिक विकासावर प्रतिकूल परिणाम करू शकते.
 
आव्हाने : व्यक्तिमत्त्व विकासाची संधी
 
संशोधकांच्या मते, बालविकासाच्या प्रक्रियेत आव्हाने, अडचणी आणि अपयश यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलांना प्रत्येक संकटापासून वाचवण्याऐवजी, योग्य मार्गदर्शनाखाली त्यांना अडचणींचा सामना करू देणे आवश्यक आहे. कारण, अशा अनुभवांतूनच स्वायत्तता, निर्णयक्षमता, आत्मविश्वास आणि परिपक्वता त्यांना शिकता येते.
 
याउलट, अतिसंरक्षणाला प्राधान्य देणारा समाज नकळत प्रौढ आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाणे कठीण जाईल, अशी पिढी घडवू शकतो. दैनंदिन जीवनातील सामान्य अडचणींसाठीही विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्यविषयक मदतीची आवश्यकता भासत असल्याचे चित्र यासंदर्भात विचार करायला लावणारे आहे. पालकांच्या सतत हस्तक्षेपाशिवाय आव्हानांना सामोरे जाणार्‍या मुलांमध्ये परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि भावनिक स्थैर्य अधिक प्रमाणात विकसित होऊ शकते. थोडक्यात, लवचीकता ही केवळ शिकवून विकसित होत नाही; ती अनुभवातून घडते.
 
युरोपीय संशोधकांनी अलीकडेच ‘जेन-झी’साठी ‘स्ट्रॉबेरी पिढी’ (Strawberry Generation) ही संज्ञा वापरली आहे. दिसायला आकर्षक आणि रंगीबेरंगी असते. मात्र, ती नाजूक असल्याने सहज दबली जाऊ शकते किंवा जखमी होऊ शकते. याच उपमेच्या माध्यमातून या पिढीतील भावनिक नाजूकपणाकडे लक्ष वेधले गेले आहे. अतिसंरक्षण, अवाजवी कौतुक आणि अतिमोकळीक अशा परस्परविरोधी पालकत्वाच्या पद्धतींमुळे मुलांमध्ये भावनिक नाजूकपणा निर्माण होऊ शकतो आणि प्रत्यक्ष जीवनातील ताणतणावांना सामोरे जाणे आव्हानात्मक होऊ शकते.
 
विशेष म्हणजे, आजची तरुणपिढी आपल्या पालकांबद्दलच्या भावना आणि अनुभव केवळ जवळच्या व्यक्तींपुरते मर्यादित न ठेवता, लाखो लोकांपर्यंत समाजमाध्यमांच्या माध्यमातून उघडपणे व्यक्त करत आहे.
 
‘ओव्हर पॅरेंटिंग’चा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम
 
‘ओव्हर पॅरेंटिंग’चा मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर नेमका कसा परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी संशोधकांनी महत्त्वपूर्ण मानसशास्त्रीय सिद्धान्ताचा आधार घेतला आहे. या सिद्धान्तानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या निरोगी मानसिक विकासासाठी तीन मूलभूत मानसिक गरजा महत्त्वाच्या असतात ः
 
१. स्वायत्तता (autonomy) : स्वतःच्या आयुष्याबाबत निर्णय घेण्याचे आणि स्वतःच्या निवडींनुसार वागण्याचे स्वातंत्र्य असल्याची जाणीव.
२. क्षमता (Competence) : आपण एखादी गोष्ट करू शकतो, आव्हानांना सामोरे जाऊ शकतो आणि परिस्थिती प्रभावीपणे हाताळू शकतो, असा आत्मविश्वास.
३. भावनिक नाते (Relatedness) : इतरांशी भावनिक नाते जोडलेले असणे, आपलेपणा आणि स्वीकारलेपणाची भावना अनुभवणे.
 
जेव्हा पालक सतत मुलांच्या निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करतात, त्यांच्या समस्या स्वतः सोडवतात किंवा त्यांच्या वतीने निर्णय घेतात, तेव्हा मुलांच्या स्वायत्ततेची आणि स्वतःच्या क्षमतेची जाणीव विकसित होण्यास मर्यादा येऊ शकतात. पालक आणि मुलांमधील नाते वरकरणी अतिशय जवळचे आणि प्रेमळ असले, तरी मुलांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या विकासात बाधा निर्माण होऊ शकते. कालांतराने यामुळे निराशा, आत्मविश्वासाचा अभाव, चिंता आणि नैराश्य यांसारख्या समस्या उद्भवण्याची शयता असते.
 
मुलांना आधार देणे आवश्यक आहे; पण त्यांच्या जागी प्रत्येक गोष्ट स्वतः करणे नव्हे. पालकांचे खरे कर्तव्य मुलांना आयुष्यभर संकटांपासून सुरक्षित ठेवणे नसून, संकटांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनवणे, हे आहे. प्रत्येक अडचणीत त्यांच्यासाठी धावून जाण्याऐवजी, स्वतः मार्ग शोधण्याचा विश्वास त्यांच्यात निर्माण करणे गरजेचे आहे. त्यांना निर्णय घेऊ द्यावेत, चुका करण्याची मुभा द्यावी आणि त्या चुकांमधून शिकताना त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहावे. अपयश आले, तरी त्यांचा आत्मविश्वास ढळू नये, यासाठी त्यांना भावनिक आधार द्यावा. मात्र, त्यांच्या प्रत्येक अपयशापासून त्यांना वाचवू नये.
 
थोडयात, मुलांना स्वतः शिकण्याची, अनुभव घेण्याची, चुका करण्याची आणि त्यातून सावरण्याची संधी मिळाली नाही; तर त्यांच्या मूलभूत मानसिक गरजांची पूर्तता अपुरी राहू शकते. कारण, मुलांना आपण किती सुरक्षित ठेवले, यापेक्षा आपण त्यांच्या मनात स्वतःच्या क्षमतेवर किती विश्वास निर्माण केला, हे त्यांच्या भविष्यासाठी अधिक महत्त्वाचे असते. पालकांनी मुलांचे आयुष्य जगू नये; तर त्यांना स्वतःचे आयुष्य समर्थपणे जगण्यासाठी तयार करावे. 
 
लेखिका- डॉ. शुभांगी पारकर
 




संबंधित मजकूर