मुंबई (Karbi Folk Dance Guinness World Record) : आसामच्या पारंपरिक कार्बी नृत्याने राज्याची मान अभिमानाने उंचावली असून, या नृत्याची जागतिक स्तरावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. आसाममधील कार्बी आंगलाँग जिल्ह्याने एक ऐतिहासिक क्षण अनुभवला. कार्बी आंगलाँग दिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त दिफू येथील कासा स्टेडियममध्ये १५ हजारांहून अधिक नृत्यकलाकारांनी एकत्र येत पारंपरिक ‘निमसो केरुंग’ हे लोकनृत्य सादर केले. या सामूहिक नृत्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली.
या विक्रमी नृत्यप्रस्तुतीमध्ये विविध समुदायांतील हजारो नागरिक सहभागी झाले होते. सर्वांनी एकाच तालात आणि सुरात पारंपरिक नृत्य सादर केले. या माध्यमातून कार्बी आंगलाँगचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, विविधता आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे वरिष्ठ अधिकृत परीक्षक स्वप्नील डांगरीकर यांनी या भव्य आयोजनाचे आणि कलाकारांच्या उत्साहाचे कौतुक केले. कला, संस्कृती आणि सामुदायिक एकतेचा हा एक अनोखा उत्सव असल्याचे त्यांनी म्हटले.(Karbi Folk Dance Guinness World Record)
विविध समुदायांसह तरुण पिढीनेही या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. हे एकात्मतेचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे त्यांना सांगितले. या विक्रमी कामगिरीमुळे कार्बी आंगलाँगच्या सांस्कृतिक परंपरांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मानाचे स्थान मिळाले आहे. हजारो नागरिकांनी एकत्र येऊन सादर केलेल्या या पारंपरिक लोकनृत्याने आसामच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जगभरात ओळख निर्माण केली आहे.(Karbi Folk Dance Guinness World Record)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक