मुंबई (India vs Pakistan SAFF Championship Final 2026) : साफ (एसएएफएफ) चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताने पुनरागमन करत पाकिस्तानचा २-१ असा पराभव केला. सामन्याच्या ८८व्या मिनिटाला संदीप मंडीने निर्णायक गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारतीय संघाने विक्रमी दहाव्यांदा साफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, सलग तीन स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवण्याचा ऐतिहासिक पराक्रमही भारताने प्रथमच केला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे.
नौशाद मूसा यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाला सामन्याच्या सुरुवातीला चांगली लय सापडली नाही. पहिल्या हाफमध्ये पाकिस्तानने आक्रमक खेळ करत भारतीय बचावफळीवर सातत्याने दबाव निर्माण केला. अखेर पहिल्या हाफच्या भरपाई वेळेत आलमगीर गाझीने अप्रतिम गोल करत पाकिस्तानला आघाडी मिळवून दिली. मात्र, व्हीएआरच्या हस्तक्षेपानंतर जुनैद शाहला लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर पाठवण्यात आले आणि सामन्याचे चित्रच पालटले. सुहैल अहमद भटने भारताला बरोबरी साधून दिली, तर ८८व्या मिनिटाला संदीप मंडीने विजयी गोल केला. अतिरिक्त वेळेत सामना जाण्याची शक्यता असतानाच भारताने बाजी मारली.(India vs Pakistan SAFF Championship Final 2026)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक