‘हलाल’ सक्तीचा उघड खेळ!

    18-Nov-2026   

Halal Food Controversy in UK
 
ब्रिटनमध्ये ‘हलाल’ खाद्यपदार्थांचा प्रश्न केवळ धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो ग्राहकांचा माहितीपूर्ण निवडीचा अधिकार, व्यावसायिकांचे स्वातंत्र्य आणि सार्वजनिक जीवनात धार्मिक नियमांचा किती प्रभाव असावा, या प्रश्नांशी जोडला गेला आहे. लंडनमधील हॅमरस्मिथ परिसरात नुकतीच घडलेली एक घटना या विषयाचे गांभीर्य दाखवून देते. शीख व्यावसायिक हरमन सिंह कपूर यांनी आपल्या रेस्टॉरंटबाहेर ‘आम्ही अभिमानाने हलाल मांस विकत नाही,’ असा फलक लावला. त्यांच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी मोठा जमाव रेस्टॉरंटबाहेर जमला. एखाद्या व्यक्तीच्या धार्मिक अथवा वैयक्तिक तत्त्वांनुसार व्यवसाय करण्याच्या अधिकाराला अशाप्रकारे जमावाच्या दबावाखाली आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो ब्रिटनच्या उदारमतवादी लोकशाहीसाठी धोयाचा इशाराच!
 
एखाद्या मुस्लीम ग्राहकाला ‘हलाल’ मांस हवे असेल, तर त्याला ते निवडण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे शीख व्यावसायिकाला ‘झटका’ पद्धतीचे मांस विकायचे असेल किंवा ‘हलाल’ मांस विकायचेच नसेल; तर त्याचाही अधिकार मान्य केलाच पाहिजे. धार्मिक स्वातंत्र्य हे एकतर्फी असू शकत नाही.
 
ब्रिटनने बहुसांस्कृतिकतेचा स्वीकार केला. जगभरातून आलेल्या स्थलांतरितांना रोजगार, व्यवसाय आणि धार्मिक आचरणाचे स्वातंत्र्य दिले. ही लोकशाहीची ताकदच. मात्र, बहुसांस्कृतिकतेचा अर्थ, केवळ स्थलांतरित समुदायांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक मागण्यांशी जुळवून घेणे, असा मुळीच नाही. स्थानिक समाजाच्या परंपरा, कायदे, मूल्ये आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांचाही तितकाच आदर राखला गेला पाहिजे. धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्या समुदायाच्या नियमांचा सार्वजनिक जीवनावर दबाव निर्माण होत असेल; तर त्यावर प्रश्न विचारणे, हा कोणत्याही प्रकारचा धार्मिक द्वेष ठरत नाही. त्यामुळे ‘हलाल’ खाद्यपदार्थ विकायचे की नाही, हा व्यावसायिकाचा वैयक्तिक निर्णय. त्याचप्रमाणे ग्राहकांनाही आपल्याला हवा तो पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. परंतु, एका बाजूला ‘हलाल’ खाद्यपदार्थांची मागणी मान्य करावीच लागेल, असा दबाव आणि दुसर्‍या बाजूला ‘हलाल’ न विकण्याच्या निर्णयाला विरोध म्हणून रस्त्यावर उतरलेला धर्मांधांचा जमाव, या दोन्ही गोष्टी लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत आहेत.
 
या घटनेतील एक महत्त्वाची बाबही लक्षात घेतली पाहिजे. दि. १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या निदर्शनांमागे केवळ ‘हलाल’ मांसाचा मुद्दा नव्हता. कपूर यांच्या मुस्लीम समाज, प्रेषित आणि गाझा संघर्षासंदर्भातील समाजमाध्यमावरील ‘पोस्ट’वरही आंदोलकांनी आक्षेप घेतला होता. त्याच दिवशी कपूर यांना एका कथित आक्षेपार्ह प्रतिमेच्या प्रकरणात अटक झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे संपूर्ण निदर्शनांना केवळ ‘हलाल’विरोधी भूमिकेची प्रतिक्रिया म्हणून मांडणे, वस्तुस्थितीचे अपुरे चित्र ठरेल. त्याचप्रमाणे कपूर यांनी कुटुंबाला धमया मिळाल्याचे केलेले दावे स्वतंत्रपणे तपासले जाणे आवश्यक आहे.
 
‘ग्रूमिंग गँग्ज’च्या प्रकरणांत जशी राजकीय शुद्धतेच्या भीतीने सत्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक झाली, तशीच चूक धार्मिक दबावाच्या बाबतीतही होता कामा नये. ब्रिटनला इस्लामीकरणाच्या भीतीतून बाहेर काढायचे असेल, तर त्यासाठी मुस्लीमविरोधी द्वेष नव्हे; तर धार्मिक कट्टरतेविरोधात ठाम भूमिका, कायद्याचे समान राज्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे संरक्षण आवश्यक आहे.
धार्मिक श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे; ती इतरांवर लादण्याचा अधिकार कोणालाही नाही. ब्रिटनने बहुसांस्कृतिकतेचा स्वीकार केला, तो परस्पर आदरासाठी; एका समुदायाच्या धार्मिक आग्रहापुढे दुसर्‍या समुदायाने माघार घ्यावी यासाठी नव्हे. त्यामुळे ‘हलाल’ असो वा ‘झटका’, निवड ग्राहकाची आणि व्यवसायाचे धोरण व्यावसायिकाचे असले पाहिजे. या साध्या तत्त्वाचे संरक्षण करण्यात ब्रिटिश प्रशासन अपयशी ठरले, तर उद्या कोणत्या दुकानात काय विकले जावे, कोणत्या व्यक्तीने काय बोलावे आणि समाजाने कोणत्या श्रद्धा स्वीकाराव्यात, हेही रस्त्यावर उतरलेले जमाव ठरवू लागतील. ब्रिटनला बहुसांस्कृतिक देश म्हणून टिकायचे असेल, तर त्याने ‘सर्व धर्मांना समान स्वातंत्र्य आणि सर्व नागरिकांना समान कायदा’ ही तत्त्वे केवळ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्षातही जपली पाहिजेत, अन्यथा, सहिष्णुतेच्या नावाखाली असहिष्णुतेलाच मोकळे रान मिळेल.
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर