कल्याण : मोरीवली, अंबरनाथ येथील मे. ॲन्सापक (एफसी) प्रा. लि. कंपनीतील १४२ कायम कामगारांना एकूण ३ कोटी ४२ लाख १ हजार ८५६ रुपयांची थकीत रक्कम मिळवून देण्यात सहाय्यक कामगार आयुक्त, कल्याण कार्यालयाला यश आले आहे. सहाय्यक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर-कार्ले यांच्या पुढाकारातून आणि कामगार विभागाच्या प्रयत्नांतून कामगारांना ही रक्कम मिळाली आहे.
यातील १२७ कामगारांना ३ नोव्हेंबर २०२६ रोजी उभयपक्षांच्या मान्यतेने ३ कोटी १८ लाख ६९ हजार ३०५ रुपयांची रक्कम अदा करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी (१७ नोव्हेंबर) उर्वरित १५ कायम कामगारांना २३ लाख ३२ हजार ५५१ रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे यशस्वीरित्या देण्यात आली.
अशा प्रकारे कंपनीतील सर्व १४२ कायम कामगारांना मिळून ३ कोटी ४२ लाख १ हजार ८५६ रुपयांची थकीत रक्कम मिळाली आहे. कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यातील समन्वयातून ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कामगारांना त्यांची देय रक्कम मिळवून देण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर-कार्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे संबंधित कामगारांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.