दाऊदच्या घरावर पालिकेचा बुलडोझर! भेंडीबाजारमधील मुसाफिरखान्यावर तोडक कारवाई

    18-Nov-2026   

Dawood Ibrahim House Demolition in Mumbai
 
मुंबई (Dawood Ibrahim House Demolition in Mumbai) : मुंबईच्या भेंडीबाजार परिसरातील अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेली ‘हाजी इस्माइल हाजी हबीब मुसाफिरखाना’ ही इमारत सुमारे ८० वर्षांहून अधिक जुनी असून अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. ही इमारत दाऊद इब्राहिमचे निवासस्थान तसेच त्याच्या बेकायदेशीर धंद्यांचे मुख्य केंद्र म्हणूनही ओळखली जात होती. दाऊदच्या या वडिलोपार्जित घरावर अखेर पालिकेकडून बुधवारी बुलडोझर फिरवण्यात आला. दोन दिवस ही तोडक कारवाई सुरु राहणार आहे.
 
मुंबई उच्च न्यायालयाने २०२० मध्ये या जीर्ण इमारतीचा पहिला आणि दुसरा मजला पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने इमारत रिकामी करून पाडण्याची प्रक्रिया सुरू केली. गेल्या काही वर्षांत इमारतीचे वरचे मजले आणि निवासी खोल्या रिकाम्या करून त्यांचा काही भाग पाडण्यात आला. इमारतीची अवस्था अत्यंत धोकादायक झाली होती. दाऊद वापरत असलेल्या मुख्य खोल्याही अलीकडच्या काळात पाडण्यात आल्या आहेत. आता तळमजल्यावरील प्रार्थनागृह आणि पहिल्या मजल्यावरील सुमारे १० खोल्या एवढाच भाग शिल्लक आहे.(Dawood Ibrahim House Demolition in Mumbai)
 
रस्ता रुंदीकरण आणि इमारतीची धोकादायक अवस्था लक्षात घेता आता संपूर्ण इमारत पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उर्वरित भागामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा प्रार्थनागृहाचा आहे. स्थानिक नागरिक या जागेला मशीद असल्याचे सांगत आहेत. हे प्रार्थनास्थळ पाडण्यावरूनच मोठा वाद निर्माण झाला असून त्यामुळे संपूर्ण कारवाई रखडली होती. आता मुंबई महापालिकेच्या नव्या नोटिशीनंतर हा वाद पुन्हा चिघळला.
 
महापालिकेच्या 'सी' विभागाने १६ नोव्हेंबर रोजी नोटीस जारी करून उर्वरित संपूर्ण जीर्ण इमारत पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी १८ आणि १९ नोव्हेंबर या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रार्थनागृहाचा वापर करणाऱ्यांना पर्यायी जागी स्थलांतरित होण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत. मात्र, ही जागा वक्फ मालमत्ता असल्याचा तसेच येथे मशीद असल्याचा दावा करत स्थानिक नागरिकांनी या कारवाईला विरोध केला. काँग्रेस आणि एआयएमआयएमचे नेतेही या विरोधात सहभागी झाले आहेत.(Dawood Ibrahim House Demolition in Mumbai)
 
कायदेशीर कागदपत्रे आणि ऐतिहासिक नोंदींनुसार, भेंडीबाजारमधील या इमारतीवर दाऊदचा बेकायदेशीर ताबा होता. मात्र, इमारतीची मालकी सुरुवातीपासूनच एका सार्वजनिक ट्रस्टकडे होती. हज यात्रेकरूंना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १९३९ च्या सुमारास या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते.
 
अशी माहिती आहे की, १९८० च्या दशकापर्यंत हा परिसर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीचा बेकायदेशील अड्डा म्हणून ओळखला जात असे. दाऊदचे बेकायदेशीर व्यवहार आणि तस्करीचा माल याच ठिकाणी साठवला जात असल्याचेही सांगितले जाते. १९८६ मध्ये भारत सोडण्यापूर्वी दाऊद आणि त्याचे कुटुंबीय याच मुसाफिरखान्यातील दुसऱ्या मजल्यावर राहत होते. याच इमारतीत त्याचे कार्यालयही होते. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा कट याच कार्यालयात रचण्यात आल्याचे सांगितले जाते. दाऊद इब्राहिम आणि त्याचे भाऊ-बहीण देश सोडण्यापूर्वी याच इमारतीत राहत होते. दाऊदच्या भारतातून पलायनानंतरही त्याची आई अमीना बी याच इमारतीत वास्तव्यास होती. पुढील काळात त्याचा भाऊ इक्बाल कासकर याच्याकडून इमारतीचा वापर केला जात असल्याच्या तसेच इमारतीतील सदनिका आणि दुकानांमध्ये भाडेकरू राहत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या इमारतीच्या तळमजल्यावर एकूण ३२ व्यावसायिक दुकाने, तर वरच्या मजल्यांवर १९ निवासी खोल्या होत्या.(Dawood Ibrahim House Demolition in Mumbai)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर