ओटीटी, साहित्य आणि अभिनयाच्या त्रिवेणीने ‘चित्रपताका’चा समारोप!

    18-Nov-2026

mohan
 
 
 
 


मुंबई (विशेष प्रतिनिधी ): Chitrapataka Film Festival 2026 मराठी चित्रपटसृष्टीसमोरील बदलती आव्हाने, ओटीटीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या नव्या संधी, साहित्यकृतींचे चित्रपटात होणारे रूपांतर आणि अभिनयाच्या कलेतील बारकावे अशा विविध विषयांवर सखोल विचारमंथन घडवून आणत ‘चित्रपताका–२०२६’ मराठी चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवसाची सांगता झाली. ‘मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र ओटीटी व्यासपीठ असायला हवे’, ‘साहित्याचे चित्रपटात रूपांतर करताना स्वतंत्र दृश्यभाषा महत्त्वाची’ आणि ‘अभिनयासाठी मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण आवश्यक’ अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ आणि कलाकारांनी आपली मते मांडली. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या प्रकट मुलाखतीने या दिवसातील कार्यक्रमांना विशेष रंगत आणली.‘गोंधळ’ या भारतातर्फे ऑस्करसाठी अधिकृत नामांकन प्रवेशिका मिळालेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचा समारोप करण्यापूर्वी रवींद्र नाट्यमंदिर येथे समारोप सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महोत्सवाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे, क्युरेटर डॉ. संतोष पाठारे, तसेच सिनेकर्मी आणि सिनेरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. तर नृत्यदिग्दर्शक सोनिया परचुरे यांच्या ‘शरयू नृत्य कला मंदिरा’तर्फे ‘हे नदे सरिते’ हा नृत्याविष्कार यावेळी सादर करण्यात आला.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात १५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या चार दिवसीय महोत्सवात ३३ मराठी चित्रपटांचे प्रदर्शन, तसेच परिसंवाद, मास्टरक्लास, मुलाखती अशी १५ हून अधिक संवादसत्रे आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे पाच हजार प्रेक्षकांनी महोत्सवाला उपस्थिती लावत दिलेला प्रतिसाद हे यंदाच्या पर्वाचे ठळक यश ठरले.या महोत्सवासाठी संकलित झालेले नोंदणी शुल्काची रक्कम ५ लक्ष रुपये दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची घोषणा स्वाती म्हसे-पाटील यांनी यावेळी केली.Chitrapataka Film Festival 2026


बदलत्या मनोरंजनविश्वात ओटीटी हे प्रेक्षकांचे महत्त्वाचे माध्यम बनले असून, मराठी चित्रपटसृष्टीनेही या बदलांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ दिग्दर्शक केदार शिंदे, सिनेमाध्यम तज्ज्ञ निखिल साने यांनी व्यक्त केले. ‘ओटीटीवर मराठी असावे! – ओटीटीवरील संधी आणि शक्यता’ या परिसंवादात त्यांनी मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र ओटीटी व्यासपीठ, चित्रपटांच्या हक्कांचे व्यवस्थापन आणि प्रभावी विपणन याविषयी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.Chitrapataka Film Festival 2026

केदार शिंदे यांनी मराठीसाठी स्वतंत्र ओटीटी व्यासपीठाची मागणी करावी लागते, हीच खेदाची बाब असल्याचे सांगितले. मुंबईसारख्या शहरात अनेक ओटीटी व्यासपीठांची कार्यालये असूनही मराठी चित्रपटांना अपेक्षित स्थान मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. चित्रपटाच्या चित्रीकरणापासून ते वितरण आणि प्रदर्शनापर्यंत निर्मात्याला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे निर्माता आर्थिकदृष्ट्या सक्षम राहणे हे चित्रपटसृष्टीच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. मराठी चित्रपटसृष्टीने स्वतःचे ओटीटी व्यासपीठ उभारण्याचा विचार करावा. ‘चित्रपताका’च्या माध्यमातूनही असे व्यासपीठ उभे राहू शकते, अशी सूचना त्यांनी केली.Chitrapataka Film Festival 2026

साहित्यकृतीचे चित्रपटात रूपांतर करताना मूळ साहित्याचा आशय जपण्याबरोबरच चित्रपट माध्यमाची स्वतंत्र भाषा समजून घेणे आवश्यक असल्याचे मत लेखक-पटकथाकार श्रीकांत बोजेवार, दिग्दर्शक सुजय डहाके आणि अभिनेत्री-लेखक डॉ. श्वेता पेंडसे यांनी व्यक्त केले. ‘साहित्य ते सिनेमा : मराठी साहित्याचे माध्यमांतर’ या परिसंवादाचे सूत्रसंचालन लेखक अरविंद जगताप यांनी केले.Chitrapataka Film Festival 2026

‘काटकोनी त्रिकोण… नाटक ते सिनेमा व्हाया बी.जे. मेडिकल!’ या विशेष प्रकट मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणापासून नाटक आणि चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास उलगडला. अभिनय ही केवळ संवादफेक किंवा व्यक्तिरेखेची बाह्य नक्कल नसून, मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण आणि भावविश्व समजून घेण्याची प्रक्रिया असल्याचे डॉ. आगाशे यांनी सांगितले. अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या कलागुणांना लहानपणापासून प्रोत्साहन मिळायला हवे. त्यांना केवळ पुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता नाटक, कला आणि विविध उपक्रमांमधून व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
Chitrapataka Film Festival 2026

या महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र माझ्या नजरेतून’ या लघुपट स्पर्धेतील विजेते कृष्णा लिंबराज ओव्हाळ आणि ऐइबत शेख या दोन लघुपटकर्त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. समारोप सोहळ्याला ‘गणा धावरे’ या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह या चित्रपटातील कलाकार सूरज सिंग, अवनी सक्सेना, प्रणाली घोगरे, चैतन्य राणे उपस्थित होते.Chitrapataka Film Festival 2026
 




संबंधित मजकूर