प्रदूषणाने वाढला ‘टाइप-२’ मधुमेहाचा धोका!

    18-Nov-2026

Air Pollution and Type 2 Diabetes
 
वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि वाहनांची बेसुमार वाढ यामुळे वायुप्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. प्रदूषित हवेमुळे श्वसनविकार आणि हृदयविकारांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा सातत्याने होतेच. मात्र, या प्रदूषणाचे परिणाम मानवी शरीरातील अंतर्गत जैविक प्रक्रियांपर्यंत पोहोचत असून, मधुमेहासारख्या चयापचय-विकारांच्या वाढत्या धोक्याशीही त्याचा संबंध जोडला जात आहे. विशेषतः वातावरणातील अतिसूक्ष्म धूलिकणांचा दीर्घकालीन संपर्क ‘टाइप-२’ मधुमेहासाठी एक महत्त्वाचा कारक ठरू शकतो, असे नव्या संशोधनातून समोर आले.
 
जगभरातील २०० दशलक्षांहून अधिक सहभागींवरील संशोधनातून सूक्ष्मकणांचे प्रदूषण आणि मधुमेह यांच्यातील संबंध अधोरेखित करण्यात आला. ‘पीएम २.५’ हे २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यासाचे कण श्वसनमार्गातून फुप्फुसांच्या वायुकोशांपर्यंत पोहोचतात. त्यांच्यामुळे निर्माण होणारी दाहप्रक्रिया आणि ‘ऑसिडेटिव्ह स्ट्रेस’ शरीरातील पेशीकार्यावर परिणाम करू शकतात. विशेषतः इन्सुलिनची संवेदनशीलता कमी झाल्यास इन्सुलिनचा प्रतिरोध निर्माण होतो. परिणामी, रक्तातील ग्लुकोजचे नियंत्रण बिघडते. या प्रक्रियेत स्वादुपिंडातील इन्सुलिननिर्मिती करणार्‍या ‘बीटा’ पेशींवरही अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असते.
 
संशोधनातील निष्कर्षानुसार, ‘पीएम २.५’च्या प्रमाणात प्रत्येक १० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर वाढीमागे ‘टाइप-२’ मधुमेहाचा धोका १० ते १६ टक्क्यांनी वाढलेला आढळला. वाहनांचा धूर, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामांमधील धूळ आणि इंधनाचे ज्वलन हे या प्रदूषणाचे प्रमुख स्रोत आहेत. विशेषतः महानगरांमध्ये दीर्घकाळ प्रदूषित हवेच्या संपर्कात राहणार्‍या नागरिकांच्या दृष्टीने तर हा निष्कर्ष महत्त्वाचा असाच.
 
मानवी शरीरातील प्रत्येक पेशीचे कार्य पर्यावरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जोडलेले असते. श्वासातून शरीरात जाणारे सूक्ष्म प्रदूषक घटक चयापचयाच्या सूक्ष्म प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करू शकत असतील, तर त्याचे परिणाम वर्षानुवर्षे संचित स्वरूपात दिसू शकतात. विशेषतः मधुमेहासारख्या दीर्घकालीन विकारांच्या बाबतीत हा पैलू अधिकच गंभीर आहे. आहार आणि व्यायामाच्या माध्यमातून व्यक्ती स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ शकते. मात्र, श्वासावाटे शरीरात प्रवेश करणार्‍या प्रदूषकांपासून स्वतःचे संरक्षण करणे, तिच्या वैयक्तिक नियंत्रणापलीकडचे आहे. म्हणूनच, स्वच्छ हवा ही केवळ पर्यावरणीय सुविधा नसून, शरीरातील चयापचयसंतुलन आणि दीर्घकालीन आरोग्य टिकवून ठेवण्यासाठीचीही मूलभूत गरज झाली आहे.
 




संबंधित मजकूर